असे म्हणतात की, राजकारणात कुठे थांबायचे ते कळले की मग प्रश्न आपोआप सुटतात, अन्यथा गुंता वाढतच जातो. शरद पवारांना बहुधा ते कळल्यामुळेच त्यांनी थांबायचे संकेत दिले असावेत. “यापुढे विरोधात बसायचे की सत्तेत, याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे,” असे विधान करून त्यांनी चर्चांना वाट मोकळी करून दिली. शिवाय पक्षातील अनेक नेत्यांचा कल अजित पवारांसोबत एकत्र राहण्याकडे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, असे तर्क लढवले जात आहेत. मात्र, ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा बाणा असलेले पवार, एकाएकी हतबल का झाले? मुलीला राजकीयदृष्ट्या स्थिर करून देण्यासाठी की, अन्य कोणत्या कारणाने?
पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सत्ताकारणावर पवारांचा वरचश्मा राहिला. पण, केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आल्यापासून त्यांची चाणक्यनीती फसत गेली. 2019 साली महाविकास आघाडीचा प्रयोग करून त्यांनी मोदी, शाह आणि फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न पवारांनी केला खरा, पण खेळी अंगाशी आली. शिवसेनेची दोन शकले झालीच. जोडीला शरद पवारांच्या निष्ठावंतांनीदेखील वेगळी चूल मांडली. त्यात आता जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्याने पवार अधिक अस्वस्थ झाले. कारण, जयंतरावांच्या मागे पक्ष सांभाळेल, असा एकही नेता सध्या त्यांच्याकडे नाही. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला. महाविकास आघाडी किंवा स्वबळावर या निवडणुका जिंकणे जवळपास अशक्य असल्याचा अंदाज आल्याने पवारांनी तलवार म्यान केली असावी. दुसरे म्हणजे, स्वतः निवृत्ती घेऊन मुलीला राजकीयदृष्ट्या स्थिर करण्याचा प्रयत्न यामागे दिसतो. अजित पवारांकडे पक्षाची सूत्रे दिल्यास गळती थांबेल आणि सुप्रियाला केंद्रात स्थिर होता येईल. अशाने कुटुंबही एकत्र राहील आणि पक्षदेखील. शिवाय अजित पवारांच्या मागे भाजपचे बळ असल्यामुळे त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करून घेता येईल, अशी पवारांची योजना दिसते. असो! पवारांना थांबण्याची उपरती सुचली, हेच याक्षणी महत्त्वाचे. पण, आता त्या विचारांवरही पवार किती काळ कायम राहतात, हे बघायचे. कारण, पवार बोलतात एक आणि वागतात तिसरेच, हे महाराष्ट्रासाठी नवीन नाहीच!
अस्ताकडे वाटचाल...
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच राहते, असे म्हणतात. खा. संजय राऊतांचा स्वभावही अगदी तसाच! कितीही बदलायचा म्हटला, तरी काही उपजत गुणांमुळे त्यात सुधारणा होणे शक्य नाही. असो! डोनाल्ड ट्रम्पपासून ते शाहबाज शरीफ यांच्यापर्यंत प्रत्येकाला ‘भांडुप’मधून सल्ला देणार्या राऊतांनी परवा कहरच केला. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असताना, यांनी त्यात राजकारण आणून फजिती करून घेतली. मोदी म्हणे शत्रूराष्ट्रांवर कारवाई करण्यास हलगर्जीपणा करतात. त्यामुळे भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास शिकावा, असे विधान त्यांनी केले. बरे, तिकडे पाकिस्तान मोदींच्या नावाने थराथरा कापत असताना, संजय राऊतांनी मोदींना सल्ला द्यावा, म्हणजे अगदीच हास्यास्पद. मोदींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सेनादलांनी पाकड्यांना घरात घुसून प्रत्युत्तर दिले. त्या जखमा इतक्या जबर आहेत, की मलमपट्टी करायलाही फुरसत मिळू नये. पण, राऊत हे विसरले की, केवळ इंदिरा गांधींची इच्छाशक्तीच नव्हे, तर तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या सैन्यशक्तीने आणि समयसूचकतेने त्यावेळी पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. उलट त्यावेळी इंदिरा गांधींनी लष्करावरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, जो माणेकशॉ यांनी पद्धतशीरपणे हाणून पाडला.
याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सेनादले, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला सोबत घेऊन नियोजनबद्ध कारवाईचे नियोजन आखले आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केलेली ही पहिलीच लष्करी कारवाई. आजवर एकाही पंतप्रधानाने इतके मोठे धाडस दाखवले नाही. तरीदेखील राऊत भाजपला इंदिरा गांधींचाच आदर्श घ्यायला सांगत असतील, तर त्यांचे अज्ञान त्यांना लखलाभ. आणीबाणीमुळे ज्यांची कारकीर्द काळ्या अक्षरात नोंदवली गेली, ज्यांची एकाधिकारशाही स्वपक्षीयांनीच नाकारली, त्यांचा इतिहास राऊतांना प्रिय वाटत असेल, तर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! त्यांनी एक ध्यानात घ्यावे, काँग्रेसचे कितीही गुणगान गायले, तरी त्यांच्या मतांच्या जीवावर (2026 नंतर) राऊतांना पुन्हा खासदार होता येणार नाही. कारण, जनतेने त्यांना धडा शिकवलाय!
सुहास शेलार