नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघाताबाबत एअर इंडियाने संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीला (पीएसी) आपले उत्तर सादर केले आहे. कंपनीने बोईंग ७८७-८ ड्रीमलायनरचा बचाव केला आणि म्हटले की ते सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे.
संसदीय समितीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, विमान कंपनी आणि विमानतळ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक खासदारांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले आणि त्यावरील अहवाल कधी तयार होईल अशी विचारणा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरला जाणाऱ्या विमान भाड्यात अचानक वाढ करण्यात आल्याबद्दलही सदस्यांनी चिंता व्यक्त केली.
संसदीय समितीच्या काही सदस्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (बीसीएएस)) कडून ऑडिटची मागणीही केली. ज्येष्ठ काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक लेखा समितीने एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांच्यासह एअरलाइनच्या उच्च प्रतिनिधींची भेट घेतली. संसदीय समितीच्या अनेक सदस्यांनी १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा उल्लेख केला आणि एका सदस्याने मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण पूर्ण करण्यासाठीच्या वेळेची माहिती मागितली.
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने मंगळवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला आपला प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे.