मुंबई,दि.२५: घाटकोपरपूर्वेतील माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ६.९५ हेक्टर जागेत ५६२३ भाडेकरूंची पुनर्वसन केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शनिवार दि.२४ रोजी प्रकल्पाच्या कामासाठी ई-निविदा जारी केली आहे. तत्पूर्वी,१३ जून रोजी निविदा पूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे.
घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरसाठी ८ हजार ४९८ कोटींच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला राज्य सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. या पुनर्वसन योजनेअंतगर्त १७००० लाभार्थ्यांना ३०० चौरस फुटांची १ बीएचके सदनिका मिळणार आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी, उद्यान, आरोग्य केंद्र आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. काम दिल्यानंतर पुढील ३६ महिन्यात ही घर बांधण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजना तब्बल ३१.८३ हेक्टर जमिनीवर विस्तारलेली आहे. यामध्ये १७००० झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ३० पुनर्वसन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक इमारत ही ७० फुटांची असून तळमजल्यावर पार्किंग, ग्राउंड फ्लोअरवर व्यावसायिक गाळे आणि निवासी २२ माळे असणार आहे. यामध्ये प्रत्येकी ३०० चौरस फुटांची एक सदनिका असेल. डीसीपीआर,२०२४मधील ३३ (१०) नुसार सर्व पुनर्वसन इमारतींमध्ये अंगणवाडी, आरोग्य केंद्र, सामाजिक केंद्र, फिटनेस सेंटर, युवा केंद्र, वाचनालय आणि सोसायटी कार्यालय इत्यादी सुविधा पुरविण्यात येतील.
पहिला टप्पा
क्षेत्रफळ : ६.९५ हेक्टर
पुनर्वसन : ५६२३
इमारतींची संख्या : एकूण ११ इमारती (६ इमारतींना प्रत्येकी २ विंग आणि ५ इमारती एक विंग)
कार्पेट एरिया : ३०० चौ. फूट
उंची : ७० मीटर
इमारतींचे वैशिष्ट्ये तपशील:
१. सर्व खोल्यांमध्ये विट्रीफाइड टाइल्स फ्लोअरिंग.
२. स्वयंपाकघरात अँटीस्किड सिरेमिक टाइल्सचे फ्लोअरिंग.
३. सिंकसह ग्रॅनाइट किचन ओटा
४. शौचालयाच्या भिंतींसाठी रंगीत ग्लेझ्ड सिरेमिक टाइल्स.
५. शौचालयाच्या फ्लोअरिंगसाठी अँटीस्किड सिरेमिक टाइल्स.
६. एनोडाइज्ड खिडक्या
७. मुख्य प्रवेशद्वार आणि बेडरूमसाठी लाकडी दरवाजाची चौकट
८. पुरेशी प्रवासी आणि स्ट्रेचर लिफ्ट
९. सोलर पॅनेल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची तरतूद.
१०. सर्व पुनर्वसन इमारती भूकंप प्रतिरोधक असतील.