धारावी मास्टरप्लान टप्प्याटप्प्याने राबवणार

डीआरपी सीईओ एस. श्रीनिवास यांची माहिती

    10-Jun-2025
Total Views |

dharavi redevelopment project



मुंबई,दि.१०:प्रतिनिधी 
"धारावी पुनर्विकास प्रकल्पाला शासन निर्णयांनी घालून दिलेल्या ठोस धोरणात्मक चौकटीचे आणि नियमांचे पाठबळ आहे. हा मास्टरप्लान २०१६च्या विकास आराखड्यावर (डेव्हलपमेंट प्लॅन) आधारित आहे. हा मास्टर प्लॅन विकास आराखड्याशी सुसंगत आहे. त्यामुळे धारावी मास्टरप्लान टप्प्याटप्प्याने राबविला जाईल.


अंमलबजावणीदरम्यान कोणतेही मोठे बदल प्रस्तावित नाहीत. नवीन बाबी ज्या विकास आराखड्यात उल्लेखित नाहीत किंवा विकास आराखड्याच्या विरुद्ध आहेत अशावेळीच सूचना आणि हरकतींची प्रक्रिया आवश्यक ठरेल”, असे धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे. याचसोबत, “सर्व प्रमुख भागीदारांना, स्थानिक लोक आणि सरकार याना एकत्र आणूनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल”, असेही श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक माहिती देताना श्रीनिवास यांनी आश्वासन दिले की, प्रत्येक धारावीकरांना घर दिले जाईल. कोणाचेही विस्थापन होणार नाही. या प्रकल्पाचे उद्दिष्ट सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणे आहे. इतर सर्व आधुनिक गृहनिर्माण संस्थांप्रमाणे येथे बहुस्तरीय तळघर पार्किंग असेल. पोडियमच्या मजल्यांवर व्यवसाय आणि व्यावसायिक युनिट्स सामावून घेतल्या जातील. लोक वरच्या मजल्यावर राहतील आणि खालच्या मजल्यावर त्यांचा व्यवसाय चालवू शकतील. म्हणून आम्ही शक्य तितक्या प्रमाणात रहिवाशांची व्यावसायिक इको-सिस्टम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे," असेही ते म्हणाले.


पुढे त्यांनी असेही सांगितले की, माटुंगा रेल्वे जमिनीवर बांधकाम सुरु झाले आहे. रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांना योग्यरित्या सामावून घेतल्यानंतर तेथील इमारतीत धारावीकरांना सामावून घेतले जाईल. आम्हाला अपेक्षा आहे की पुढील दोन ते तीन वर्षांत रेल्वे इमारती पूर्ण होतील. बरेच बांधकाम आणि विकास कामे ही समांतरपणे केली जातील. हा ब्राउनेस्ट ऑफ ब्राऊनफिल्ड प्रकल्प आहे आणि येत्या काही महिन्यांत प्रकल्पाला अधिक गती मिळेल.