मुंबई,दि.२३ : विशेष प्रतिनिधी पावसाळा जवळ येत असताना मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील चालू पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार केली आहे.
पावसाळ्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कार्यालयात एक केंद्रीकृत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. ही सुविधा बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी थेट हॉटलाइनद्वारे जोडण्यात आली आहे. ही यंत्रणा नियुक्त नोडल अधिकाऱ्यांद्वारे २४/७ कार्यरत राहील. याव्यतिरिक्त, यासह सर्व प्रमुख प्रकल्प ठिकाणांवर ऑनसाईट नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अभियंते आणि कामगार गट हे २४ तास उपलब्ध असतील.
यासोबचत कोणत्याही अनुचित घटनेना रोखण्यासाठी व त्याला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एक आपत्कालीन क्रम निश्चित करण्यात आला आहे. माहिती मिळाल्यानंतर, कर्तव्यावर असलेले अभियंता परिस्थितीचे मूल्यांकन करतील. कंत्राटदाराच्या प्रतिसाद पथकाला आणि एमएमआरडीएच्या आपत्ती व्यवस्थापन युनिटला सतर्क केले जाईल. त्याचसोबत, मुंबई महानगरपालिका आपत्कालीन मदत कक्षाला माहिती दिली जाईल. ही माहिती एमएमआरडीए महानगर आयुक्त आणि पोलिस आयुक्तांसह उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. सामान्य परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत विविध आपत्कालीन समर्थन कार्ये (ESF) निश्चित केलेल्या एसओपीनुसार सक्रिय केली जातील.
मान्सूनसाठी मेट्रो सज्ज
एमएमआरडीएच्या मेट्रो ऑपरेशन्समध्ये मेट्रो लाईन २अ आणि ७ समाविष्ट आहेत. अखंडित प्रवासी सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये १० मोक्याच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग तापसणारे अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत. पूर परिस्थितीत अतिरिक्त सेवा वारंवारता सुरू केली जाईल. सुरक्षा आणि देखरेख वाढवण्यासाठी प्रत्येक स्थानकावर ६४ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. सर्व ३० स्थानके आणि चारकोप डेपो येथे डीजी सेट, यूपीएस सिस्टम आणि वीज संरक्षण यंत्रणेची व्यापक तपासणी करण्यात आली आहे. सर्व ३४ मेट्रो गाड्यांची पाण्याच्या गळतीची चाचणी घेण्यात आली आहे. ३५ किमीच्या व्हायाडक्ट आणि ३० स्थानकांमधील ड्रेनेज पायाभूत सुविधा पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या आहेत. ७५९ हून अधिक इन्सुलेटर आणि संबंधित घटकांसह संपूर्ण वीज आणि सिग्नलिंग पायाभूत सुविधांमध्ये प्रतिबंधात्मक देखभाल सुरू आहे.
उपाययोजनातील ठळक मुद्दे
एक अभियंता आणि १० कामगारांचा समावेश असणारे आपत्कालीन प्रतिसाद पथक
रस्ता सुरक्षितता राखण्यासाठी खड्डे दुरुस्त करणाऱ्या वाहनांची व्यवस्था
पाणी उपसण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसविणे
मुसळधार पावसापूर्वी पाइलिंग आणि पाइलिंग कॅपची कामे पूर्ण करणे.
धोके टाळण्यासाठी विद्युत उपकरणांची चाचणी.
गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन ची तैनाती
मेट्रो आपत्कालीन व्यवस्था
रुग्णवाहिका १९
पाणी उपसा पंप १०७
कंट्रोल रूम २०
मोबाईल रस्ते मेंटेनन्स व्हॅन १९
इमरजेंसी रिस्पॉन्स
व्हॅन २१