वक्फ हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही – केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
21-May-2025
Total Views | 15
नवी दिल्ली, इस्लामिक संकल्पना असली तरी ती इस्लामचा अविभाज्य भाग नाही. वक्फ बोर्ड धर्मनिरपेक्ष कामे करतात, म्हणूनच वक्फ बोर्डांमध्ये गैर-मुस्लिमांचा समावेश करण्यास परवानगी आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद केला.
वक्फ ही एक इस्लामिक संकल्पना आहे. पण ती इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही. जोपर्यंत ती दाखवली जात नाही तोपर्यंत इतर युक्तिवाद अपयशी ठरतात. दानधर्म हा प्रत्येक धर्माचा भाग आहे. तो ख्रिश्चन धर्माचाही भाग आहे, परंतु सर्वोच्च न्यायालय म्हणते की तो अत्यावश्यक भाग नाही. हिंदूंमध्ये दानधर्माची व्यवस्था आहे, शीखांमध्येही (दानधर्म) आहे. पण तो अत्यावश्यक भाग नाही. वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करणे, (खाते योग्य आहे याची खात्री करणे), खात्यांचे ऑडिट करण हे वक्फ मंडळाचे काम आहे. त्यामुळे हे पूर्णपणे धर्मनिरपेक्ष काम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दोन बिगर-मुस्लिम सदस्य असण्याने कोणताही फरक पडणार नाही. कारण वक्फ बोर्ड कोणत्याही वक्फच्या कोणत्याही धार्मिक कार्याला स्पर्श करत नाही, असेही एसजी मेहता यांनी सांगितले.