कोहली अडचणीत! बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल : वाचा सविस्तर
03-Jun-2025
Total Views | 20
बंगळुरू: विराट कोहलीच्या बेंगळुरूस्थित पबमध्ये स्मोकिंग झोन नसल्याने गुन्हा दाखल झाला आहे. कोहलीच्या वन८ कम्युन पबला स्मोकिंग झोनच नसल्याने हा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. क्यूबन पार्क पोलिसांनी सिगारेट आणि तंबाखू उत्पादन कायदा अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
कोहलीची मालकी असलेल्या बंगळुरूमधील वन८ कम्युन पब व रेस्टॉरंट स्मोकिंग झोन नसल्याने आता पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. पबमध्ये स्मोकिंग करण्यासाठी स्वतंत्र क्षेत्र नसल्याने सिगारेट आणि तंबाखू उत्पादन कायद्याच्या कलमा अंतर्गत पबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमां अंतर्गत पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि विमानतळांसारख्या काही ठिकाणी स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध असणे बंधनकारक आहे.
शनिवारी क्यूबन पार्क पोलिसांनकडून वन८ कम्युन पब विरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनकडून दाखल केला गेलेला गुन्हा हा सार्वजनिक धूम्रपान नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी बेंगळुरू शहर पोलिसांनी चालवलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे. कर्नाटक सरकारने हुक्का , बार यांवर पूर्णपणे बंदी आणल्यानंतर तंबाखू उत्पादने विकत घेण्यासाठी कायद्यानुसार व्यक्तीचे वय हे १८ वरून २१ वर्षे केल्यानंतर एका दिवसातच हा गुन्हा नोंदवला गेला आहे.
अलीकडेच कर्नाटक राज्य सरकारच्या सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थं उत्पादने सुधारणा कायदा २०२४ ला राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आहे. कोहलीची मालकी असलेल्या बेंगळुरूमधील वन८ कम्युन पब व रेस्टॉरंट हे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२४ साली जूनमध्ये पब व रेस्टॉरंटवर निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, डिसेंबरमध्ये बेंगळुरू महानगरपालिकेने अग्निसुरक्षा उल्लंघन आणि अग्निशमन विभागाकडून मंजुरी प्रमाणपत्र घेतले नसल्याच्या आरोपातून वन८ कम्युन पबला नोटीस बजावली होती.