योग ही आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
21-Jun-2025
Total Views |
पुणे : योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आणि चिकित्सापद्धती आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. शनिवार, २१ जून रोजी योग दिनानिमित्त पुणे येथे आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, "योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आणि चिकित्सापद्धती आहे. यात शरीर आणि मन यांचे पुनरुज्जीवन करण्याची विलक्षण क्षमता आहे. हे प्राचीन भारतीय ज्ञान जगाने स्वीकारावे या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये योगदिनाचा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात असा एकमेव प्रस्ताव आहे, ज्याला उपस्थित सर्व देशांनी पाठिंबा दिला आणि तो संमत झाला. त्यामुळे गेले ११ वर्षे आपण जागतिक योग दिन साजरा करत आहोत. योग ही अशी साधना आहे जी कुणालाही करता येते. ही आसने आपल्या शरीररचनेनुसार तयार करण्यात आलेली असून, नखांपासून केसांपर्यंत शरीरातील सर्व बाह्य आणि अंतर्गत अवयवांवर उपचारात्मक परिणाम करणारी आहेत. म्हणूनच योगाला जागतिक स्तरावर ‘हिलिंग पॉवर’ म्हणून मान्यता मिळत आहे," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘One Earth One Health’ या संकल्पनेचा उल्लेख उल्लेख केला. ते म्हणाले की, "वारकरी संप्रदाय ही संकल्पना कृतीतून जपतो. पुण्यात वारीच्या मुक्कामानंतर वारकऱ्यांसमवेत योग करण्याची संधी लाभणे, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या कार्यक्रमाचे नेतृत्व करत आहे, ही गौरवाची बाब आहे. आज सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामावर योग साधनेत सहभागी होत आहेत आणि ७०० महाविद्यालयांतील विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे," असेही ते म्हणाले. तसेच पुण्याने वारीला एक नवीन ‘रिंगण’ दिलं आहे. ही परंपरा पुढेही सुरू राहावी आणि आपण सर्वांनी ‘आरोग्यदायी आणि स्वस्थ समाज’ घडवण्यासाठी कटिबद्ध राहावे," अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या.