मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक आणि अवामी लीगच्या सदस्यांवरील अत्याचाराची मालिका सुरू झाली. युनूस सरकारने आता ५ ऑगस्ट रोजी 'विद्यार्थी जनआंदोलन दिन' म्हणून राष्ट्रीय सुट्टी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या सल्लागार परिषदेच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या वृत्तानुसार, बैठकीचे अध्यक्षस्थान मोहम्मद युनूस यांनी भूषविले होते. या बैठकीनंतर सांस्कृतिक कार्य सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. दि. १ जुलैपासून याची सुरुवात होईल; परंतु मुख्य कार्यक्रम १४ जुलैपासून सुरू होतील आणि ५ ऑगस्टपर्यंत चालतील. फारुकी यांच्या मते, जुलै-ऑगस्ट दरम्यान बांगलादेशातील सर्व लोकांना परत एकदा एकत्र आणण्याचे यामागील उद्दीष्ट आहे. यासोबतच, अंतरिम सरकारने टीव्ही परवाने देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याबद्दलही बैठकीत सांगण्यात आले.