डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पायदळी तुडवण्याचे काँग्रेस – राजदचे धोरण
- बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
20-Jun-2025
Total Views | 12
नवी दिल्ली : काँग्रेस आणि राजदचे धोरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पायदळी तुडविण्याचे आहे, तर मोदी मात्र बाबासाहेबांना आपल्या ह्रदयात ठेवतो; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये सिवान या लालूप्रसाद यादव यांच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शुक्रवारी फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिवानमध्ये ५ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस – राजदवर सडकून टिका केली. ते म्हणाले, भाजप – रालोआ सरकार सबका साथ – सबका विकास या भावनेने बिहारच्या विकासासाठी कार्यरत आहे. त्याचवेली परिवार का साथ – परिवारका विकास हा काँग्रेस आणि राजदच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. स्वतःच्या कुटुंबांच्या फायद्यासाठी ते देशातील, बिहारमधील कोट्यवधी कुटुंबांचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या प्रकारच्या राजकारणाच्या पूर्णपणे विरोधात होते. म्हणूनच हे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात. राजदच्या सर्वेसर्वा असलेल्या नेत्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचा कसा अपमान केला, हे देशाने बघितले आहे. या लोकांना दलित, महादलित, मागास, अत्यंत मागास लोकांबद्दल आदर नाही. राजद आणि काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या पायाशी ठेवतात, तर मोदी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हृदयात ठेवतात; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बिहारच्या प्रगतीचा वेग सतत वाढत आहे, त्याचवेळी बिहारमध्ये जंगलराज आणणारे लोक त्यांच्या जुन्या कृत्यांची पुनरावृत्ती करण्याची संधी शोधत आहेत. ते बिहारच्या आर्थिक संसाधनांवर कब्जा करण्यासाठी विविध युक्त्या अवलंबत आहेत. त्यासाठी बिहारच्या मतदारांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सावधगिरी बाळगावी लागेल. समृद्ध बिहारच्या प्रवासात ब्रेक लावण्यास तयार असलेल्यांना मैल दूर ठेवावे लागेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.