नवी दिल्ली, देशातून नक्षल समस्या कायमची संपविण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ अशी अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या पॉलिटब्युरोतील १० पैकी ८ जणांचा खात्मा झाला असून, उर्वरित २ जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत सीपीआय (माओवादी) संघटनेच्या केंद्रीय समितीतील अनेकांचा खात्मा करण्यात आला आहे. गडचिरोलीत केंद्रीय समिती सदस्य दीपक तेलतुंबडे ठार झाला, तर २०२४ मध्ये गरियाबंद (छत्तीसगड) येथे केंद्रीय समिती सदस्य आणि १ कोटीच्या इनामी चलपति याचा मृतदेह आढळला. याचबरोबर २१ मे रोजी अबूझमाडमध्ये राबविण्यात आलेल्या निर्णायक कारवाईत माओवादी सरगना बसवराजू ठार झाला. झारखंडमध्ये पोलिट ब्युरो सदस्य प्रशांत आणि त्याची पत्नी शैला (केंद्रीय समिती सदस्य) यांना अटक करण्यात आली. दक्षिण बस्तरमध्ये रमण्णा, रामकृष्ण, हरिभूषण आणि सुदर्शन या चार केंद्रीय समिती सदस्यांचा वेगवेगळ्या कारवाईत मृत्यू झाला. झारखंडमध्ये अरविंदजीचा मृतदेह आढळला, त्याचा मृत्यू आजारामुळे झाला होता.
केंद्र सरकारच्या निश्चित वेळापत्रकानुसार देशातील नक्षल समस्या संपविण्याच्या मोहिमेत आतापर्यंत माओवादी संघटनेच्या ५० टक्क्यांहून अधिक वरिष्ठ नेतृत्वाचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या सीपीआय माओवादीचे अजून १५ महत्त्वाचे सदस्य सुरक्षादलांच्या रडारवर आहेत. त्यापैकी काहीजण वयस्कर झाले असून काहीजण संघटना सोडण्याच्या तयारीत आहेत. सुरक्षादलांनी अशा लोकांना मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन केले आहे.
सुरक्षादलांच्या १५ मोस्ट वांटेड नक्षलवाद्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर संघटनेचे माजी महासचिव मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती याचे नाव आहे. गणपतीवर १ कोटी रुपयांचे इनाम जाहीर आहे. तर बस्तरचा रहिवासी आणि सर्वाधिक धोकादायक मानला जाणारा माडवी हिडमा याचे नाव यादीत शेवटच्या क्रमांकावर असून त्याच्यावर ४० लाख रुपयांचे इनाम आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या एकूण नक्षल नेत्यांवर ८ कोटी ४० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. त्यात पहिल्या चारजणांवर प्रत्येकी १ कोटी रुपये, तर उर्वरित ११ जणांवर प्रत्येकी ४० लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे.
नक्षलविरोधी मोहिमांचा वेग वाढला
२०२४ पासून नक्षलविरोधी कारवाया झपाट्याने वाढल्या आहेत. डीआरजी, सीआरपीएफ आणि राज्य पोलिस एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवत आहेत. कर्रेगुट्टा टेकड्यांसारख्या नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यांतूनही त्यांना हुसकावण्यात आले आहे.