शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "सरकारने दिलेला..."
21-Jun-2025
Total Views | 18
पुणे : सरकारने दिलेला एकही शब्द फिरवणार नाही. उचित आणि योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णयसुद्धा राज्य सरकार घेईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. शनिवार, २१ जून रोजी पुण्यात जागतिक योगदिनानिमित्त 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी माध्मांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कर्जमाफी कधी करायची यासंदर्भात काही नियम आणि पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द फिरवणार नाही. उचित आणि योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णयसुद्धा राज्य सरकार घेईल," असे ते म्हणाले.
"योग विद्या ही आपली प्राचिन संस्कृती आणि आपली जीवनपद्धती आहे. ही योगविद्या आणि आसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात पोहोचवण्याचे काम केले. जगातील सर्व देशांमध्ये आज योग दिनाच्या निमित्ताने योगासन करण्याचे काम तिथले लोक करत आहेत. पुण्यात आज अतिशय अभिनव कार्यक्रम झाला. योगदिनाच्या दिवशी पुण्यात वारी आली आहे. त्यामुळे वारकरी बंधू-भगिनींसोबत भक्तियोगाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत ७०० महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला. अतिशय आनंद देणारा हा कार्यक्रम होता," असे त्यांनी सांगितले.
आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही!
"आळंदीच्या विकास आराखड्यात आळंदीत एक आरक्षण कत्तलखान्याकरिता दाखवले आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. त्यामुळे मी स्वत: कत्तलखान्याचे आरक्षण वगळण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलाखाना करु दिला जाणार नाही," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पुणे विद्यापीठाचे अभिनंदन!
"जगातील पहिल्या ६०० विद्यापीठांमध्ये आता पुणे विद्यापीठ आले आहे. जगामध्ये पहिल्या पाचशे विद्यापीठांना मान असतो. त्यामुळे पुढच्या वर्षी किंवा येत्या दोन वर्षात पहिल्या पाचशे विद्यापीठात आपली विद्यापीठे असावीत, हे आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे येथील कुलगुरू, व्यवस्थापन परिषद आणि प्राध्यापकांचेसुद्धा अभिनंदन करतो," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.