दिसपूर : (India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून सोडले आहे. तरीही पाकिस्तानचे वारंवार भारताविरुद्ध चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता चीनचे नाव पुढे करुन पुन्हा एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने दिली आहे. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी पाकिस्तानला वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन देत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
"जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर काय होईल?" पाकिस्तानच्या या नव्या धमकीला हिमंता बिस्वा शर्मा यांनी तथ्ये आणि योग्य स्पष्टीकरणासह प्रत्युत्तर दिले. सोमवार, दि. २ जून रोजी केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, "ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात आकुंचन पावत नाही तर वाढते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा प्रवाह चीनवर अवलंबून नाही, तर भारतातील मान्सूनच्या पावसावर आणि उपनद्यांवर अधिक अवलंबून आहे. सरमा म्हणाले की, ब्रह्मपुत्रा नदीच्या एकूण प्रवाहात चीनचे योगदान फक्त ३० ते ३५ टक्के आहे, जे प्रामुख्याने हिमनद्या वितळण्यापासून आणि मर्यादित तिबेटी पावसामुळे येते."
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी पुढे स्पष्ट केले की ब्रह्मपुत्रेच्या उर्वरित ६५ ते ७०% प्रवाह अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि मेघालयातील मुसळधार पावसामुळे भारतात निर्माण होतो. याशिवाय, सुबानसिरी, लोहित, कामेंग, मानस, धनसिरी, जिया-भराली, कोपिली यासारख्या उपनद्या आणि खासी, गारो आणि जैंतिया टेकड्यांमधून कृष्णाई, दिगारू आणि कुल्सी यासारख्या नद्यांमधून येणारा प्रवाह भारतीय हद्दीतील ब्रह्मपुत्रेला मिळतो." भारत-चीन सीमेवर ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह किती कमी आहे, हे स्पष्ट करताना आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, "भारत-चीन सीमेवर प्रवाह २,०००-३,००० चौरस मीटर/सेकंद आहे. तर आसामच्या मैदानी भागात (उदा. गुवाहाटी) पावसाळ्यात प्रवाह १५,०००-२०,००० चौरस मीटर/सेकंद पर्यंत वाढतो."
ब्रह्मपुत्रेच्या पाण्यासाठी भारत चीनवर अवलंबून नाही
ब्रह्मपुत्रा नदीच्या अखंड प्रवाहासाठी भारत चीनवर अवलंबून नाही आणि ब्रह्मपुत्रा भारतात वाढते हे पुन्हा सांगताना, मुख्यमंत्री शर्मा म्हणाले की, “ब्रह्मपुत्रा ही वरुन येणाऱ्या प्रवाहावर अवलंबून असलेली भारतीय नदी नाही. ती पावसावर अवलंबून असलेली भारतीय नदी प्रणाली आहे, जी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर मजबूत होते.” पुढे ते म्हणाले, "जरी चीनने पाण्याचा प्रवाह कमी केला (चीनने कधीही धमकी दिलेली नाही किंवा कोणत्याही अधिकृत व्यासपीठावर सूचित केलेले नाही), तरी ते प्रत्यक्षात आसाममधील वार्षिक पूर कमी करण्यास भारताला मदत करू शकते, ज्यामुळे दरवर्षी लाखो लोक विस्थापित होतात आणि उपजीविका नष्ट होते."
ब्रह्मपुत्रा ही एकाच स्रोताद्वारे नियंत्रित नदी नाही
त्यांनी पुढे म्हटले की, "सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानने ७४ वर्षांच्या पसंतीच्या पाणी उपलब्धतेचा गैरफायदा घेतला, परंतु भारताने आपले सार्वभौम हक्क योग्यरित्या परत मिळवल्यामुळे शेजारील शत्रू आता घाबरलेल्या स्थितीत आहे. त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे, की ब्रह्मपुत्रा ही एकाच स्रोताद्वारे नियंत्रित नाही, ती आपल्या भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान यांसह अन्य घटकांद्वारे नियंत्रित आहे. त्यामुळे पाकिस्तानने दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवणे थांबवावे आणि वस्तुस्थिती समजून घ्यावी", असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\