नाशिक: ( ATS arrests youth in Malegaon on suspicion searching Pakistani websites ) भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती असताना मालेगाव शहरातील एका तरुणाने संशयास्पदरित्या पाकिस्तानची वेबसाईट सर्च केल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाला बुधवार, दि. 14 मे रोजी एटीएसने ताब्यात घेत त्याची सहा तास कसून चौकशी केली. काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्याटकांचा बळी दहशतवाद्यांनी घेतल्यानंतर भारताने त्याविरोधात कठोर पावले उचलत प्रत्युत्तर दिले. भारताच्या सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांचा नायनाट करत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, या काळात मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट अॅक्टिव्हिटीमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एका ४५ वर्षीय यंत्रमाग मालक तरुणाला पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले.
त्याची सुमारे सहा तास कसून चौकशी करण्यात आली. बुधवार, दि. १४ मे रोजी सकाळपासूनच एटीएसच्या पथकातील एक वरिष्ठ अधिकारी आणि तीन कर्मचारी मालेगाव शहरात गुप्तपणे कार्यरत होते. सायबर सेलकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुरुवार वॉर्ड परिसरातील घरावर छापा टाकत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद वेबसाईट सर्च केल्याचे निष्पन्न झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. यामध्ये काही वेबसाईट्स पाकिस्तानमधील असल्याचा संशय व्यक्त केला जात असून संबंधित व्यक्तीचे पाकिस्तानात कोणासोबत संपर्क आहे, याबाबत चौकशी केली जात आहे.
संबंधितांवर कठोर कारवाई करावी
मालेगावमध्ये बांगलादेशी घुसखोरांनी जन्मदाखले मिळवत भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पाकिस्तानी वेबसाईट्स सर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब चिंताजनक असून प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलून या प्रकरणाचा सखोर तपास करत संबंधितांवर कठोर कारवाई करावी.