नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत रविवार, दि. 1 जून रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 2027 साली होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधू-महंतांच्या विविध समस्या आणि म्हणणे ऐकून घेत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सदर बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नानाच्या तारखादेखील जाहीर करण्यात आल्या.
नाशिकच्या सिंहस्थाचे प्रथम अमृतस्नान दि. 2 ऑगस्ट 2027ला होणार आहे. द्वितीय अमृतस्नान दि. 31 ऑगस्ट 2027
आणि तृतीय अमृतस्नान दि. 11 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे, त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थाचे प्रथम अमृतस्नान दि. 2 ऑगस्ट 2027ला होईल. द्वितीय अमृतस्नान दि. 31 ऑगस्ट 2027ला आणि तृतीय अमृतस्नान दि. 12 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे. दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभपर्व सुरू होणार असून दि. 24 जुलै 2028 रोजी कुंभपर्व समाप्त होईल. या कालावधीत एकूण 42 ते 45 अमृतस्नान पर्व पार पडणार आहेत. या बैठकीला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महंत भक्तीचरणदास, सतीश शुक्ल यांच्यासह दहा शैव आखाड्यांचे 20 महंत, तर तीन वैष्णव आखाड्यांचे सहा महंत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ पर्वातील प्रमुख धार्मिक विधींच्या मुहूर्तांची माहिती असलेले अधिकृत वेळापत्रक, ताम्रपत्र आणि व्हिडिओचे अनावरण करण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी विविध महंतांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
पालकमंत्री नसल्यामुळे काही अडत नाही
“नाशिकला पालकमंत्री नसले, तरी कुंभमंत्री गिरीश महाजन आणि बाकीचे मंत्रीदेखील आहेत. तसेच, मीदेखील आहे. त्यामुळे पालकमंत्री नसल्यामुळे काही अडत नाही,” असेदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याचे वेळापत्रक
सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी सुरुवात होणार आहे. या दिवशी दुपारी 12 वाजता रामकुंडावर ध्वजारोहण करून कुंभमेळा पर्वाचा शुभारंभ होईल, तर साधुग्राममध्ये दि. 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. दि. 24 जुलै 2028 रोजी कुंभमेळ्याचे ध्वज अवतरण होऊन कुंभपर्वाचा समारोप होणार आहे, तर नगर प्रदक्षिणा दि. 29 जुलै 2027 रोजी होईल. दि. 31 ऑक्टोबर 2026 ते दि. 24 जुलै 2028 पर्यंत चालणार्या या सिंहस्थ कुंभपर्वात एकूण 42 ते 45 अमृतस्नानाचे पर्व असतील.
‘कुंभमेळा प्राधिकरणा’चे लवकरच गठन
बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंत यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत 13 आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते. यावेळी सर्व महंतांचे म्हणणे ऐकून घेतले. आतापर्यंत कोणती कार्यवाही केली, याची माहिती आखाड्यांना देण्यात आली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जवळपास चार हजार कोटींच्या वेगवेगळ्या कामांच्या निविदा आम्ही काढल्या असून त्यातील काही अंतिम टप्प्यात आहेत. आणखी दोन हजार कोटींच्या निविदा काढत आहोत. प्रामुख्याने गोदावरी स्वच्छ आणि प्रवाही राहिली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त परिसरात जागा अपुरी आहे, त्यावरील पर्यायांची चाचपणी करण्यात आली. साधू-महंतांनी केलेल्या मागणीची दखल घेतली असून सदर बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले. साधुग्रामसाठी जागा अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कुंभमेळा प्राधिकरणाला मान्यता देण्यात आली असून लवकरच त्याचे गठन करण्यात येईल.”