सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

    02-Jun-2025
Total Views |

RSS and comunity building


नाशिक : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक प्रणव माजगावकर व वर्गाचे सर्वाधिकारी विष्णु वझे उपस्थित होते.

अनिल जोशी पुढे बोलताना म्हणाले की, “स्वयंसेवकांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या समर्पित जीवन व योगदानाने संघाचा 100 वर्षांचा प्रवास यशस्वी झाला आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे दूरदर्शी होते. संघाच्या कार्याचे ध्येय आणि ते साध्य करण्याच्या योजनेत त्यांना स्पष्टता होती. स्वतःचे जीवन पूर्ण करण्यापूर्वी, त्यांनी आपल्या अनुयायांना भविष्याकडे पाहण्याची व ते समजून घेण्याची दृष्टी दिली. संघ शताब्दी साजरी करण्याची कोणतीही योजना नाही. तथापि, संघटनेचे काम अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी तसेच, ते अधिक बळकट करण्यासाठी योजना आणि कार्यक्रमांचा विचार केला आहे. शताब्दीनिमित्त, संघटनेने दोन प्रमुख उद्दिष्टे ठेवली आहेत. शाखांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवणे आणि अंतिम वैभवाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पंच परिवर्तनाची कल्पना राबवणे.”

“उद्देश पवित्र असेल, तर विकासाचा मार्ग सोपा होतो. याच मंत्राने राष्ट्राला महान बनवण्याचे कार्य संघाने केले आहे,” असे यावेळी प्रमुख पाहुणे प्रणव माजगावकर म्हणाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त प्रारंभी विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच, शिक्षार्थी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध स्वरूपात शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली.

“राष्ट्राचे अंतिम वैभव प्राप्त करण्याच्या दिशेने संघाचा प्रवास हळूहळू वैयक्तिक विकास, व्यवस्था परिवर्तन आणि सामाजिक परिवर्तनाच्या मार्गाने पुढे जात आहे. शताब्दी वर्षासाठी प्रामुख्याने संस्कारक्षम कुटुंब, सामाजिक समरसता, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी कर्तव्यांचे पालन, स्वदेशी जीवनशैलीचे पालन करणे हे सामाजिक परिवर्तनाचे पाच विषय निवडण्यात आले आहेत,” असेही अनिल जोशी यांनी सांगितले.