चैतन्यमयी सावनी

    17-Jun-2025   
Total Views | 8


संगीताचा वारसा लाभलेल्या घरात उद्यमशीलतेची वेगळी वाट निर्माण करणार्‍या सावनी गोगटे यांची यशोगाथा...


माणसाच्या जीवनात प्रतिभेला जितके महत्त्व आहे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व असते ते त्याच्या प्रयत्नांना! ज्यावेळेस या दोन्ही गोष्ट एकत्र येतात, तेव्हा माणसाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सावनी गोगटे हे नाव त्या काही निवडक लोकांपैकी आहे, ज्यांनी या दोन्ही गोष्टींच्या संगमातून आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगीताचा व्यासंग असलेल्या घरामध्ये जन्माला येऊनसुद्धा उद्योजकतेची वेगळी वाट सावनी यांनी चोखाळली. त्यांचा हाच ध्यास अनेकांसाठी मार्गदर्शक तर आहेच; परंतु वेगवेगळ्या गोष्टींचा सातत्याने मागोवा घेण्याचा त्यांचा स्वभावसुद्धा आजच्या तरुणांसाठी तितकाच प्रेरणादायी आहे.


लहान वयातच सावनी कवितेच्या प्रांतात रमायला लागल्या. तोडया-मोडया चार ओळींच्या कविता करता करता आपसूकच त्या साहित्याच्या प्रांतात रमल्या. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या गुणांना पाठिंबा दर्शवला. मराठी माध्यमातून आपले शालेय शिक्षण पूर्ण करताना अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. शाळा पूर्ण केल्यानंतर त्यांनी डी. जी. रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपल्या महाविद्यालयीन जीवनकाळात अभ्यासासहित अनेक अभ्यासेत्तर उपक्रमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला. मराठी वाड्.मय मंडळाची धुरा सांभाळताना त्यांच्यातील नेतृत्व गुणांचासुद्धा विकास झाला. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरताना, अनुभवांची शिदोरी घेऊन सावनी समृद्ध होत होत्या. मातृभाषेत शिक्षण घेत असताना, त्यासोबतच आणखी एक भाषा आपण शिकायला हवी, हा विचार त्यांनी पक्का केला होता. रुपारेल महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी जर्मन भाषेची निवड केली. आपल्या या दिवसांचे स्मरण करताना सावनी म्हणतात की, "शाळेत तसेच महाविद्यालयामध्ये प्रोत्साहन देणारे शिक्षक लाभले, म्हणूनच मी इथवर पोहोचले.”


सावनी यांच्या घरातच संगीत होते. प्रख्यात बा. र. देवधर हे त्यांचे खापर पणजोबा, तर पंडित श्याम गोगटे हे त्यांचे आजोबा. त्यामुळे लहानपणापासूनच संगीताचे धडे सावनी यांनी गिरवले. उषा देशपांडे यांच्याकडे सावनी गाणं शिकल्या. संगीत हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र जरी नसले, तरी आजसुद्धा त्या गाण्यामध्ये रमतात.
‘कोविड’चा काळ अनेक आव्हाने घेऊन आपल्यासमोर उभा होता. परंतु, या आव्हानांमधून संधी शोधण्याचे काम काहींनी केले. ‘कोरोना’च्या काळात सावनी यांनी हा काळ नवनवीन गोष्टी शिकण्यात घालवला. याच काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यातूनच ‘वस्त्रदा’ या नव्या प्रवासाचा जन्म झाला.


‘वस्त्रदा’च्या माध्यमातून ‘लोथिंग अ‍ॅण्ड अ‍ॅसेसरीज’च्या नव्या ब्रॅण्डची ओळख लोकांना झाली. सावनी आणि त्यांच्या आई उमा गोगटे यांनी एकत्र मिळून हा ब्रॅण्ड घडवला. लॉकडाऊनच्या काळात सावनी यांनी लोकचित्रकलेचे शिक्षण घेतले. यामुळे भारतातील लोकचित्रांच्या विश्वाची त्यांना वेगळी ओळख झाली. ब्रॅण्डच्या निमित्ताने काम करता करता, त्यांना भारतीय वस्त्र संस्कृतीची नव्याने ओळख झाली. ‘अद्रक कलमकारी’, ‘बाटिक’, ‘कांथा’, ‘इककत’ अशा नाना कलाप्रकारांनी संपन्न असलेल्या आपल्या वस्त्र संस्कृतीची ओळख त्यांना झाली. आपली ही स्वदेशी कापड संस्कृती केवळ भारतापुरती मर्यादित न राहता, तिचा प्रसार भारताबाहेरसुद्धा व्हावा, या उद्देशाने ‘वस्त्रदा’ने कामाला सुरुवात केली. या व्यवसायाच्या मागे उद्यमशील विचार तर होताच. पण, त्याचबरोबर नवीन गोष्ट करण्याची उत्कट प्रेरणासुद्धा होती. याच प्रेरणेतून सावनी यांना इप्सित यश मिळाले. फेसबुक, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांतून अनेक लोकांशी, व्यावसायिकांशी त्या जोडल्या गेल्या. त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘वस्त्रदा’च्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आज या प्रवासाला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, यशाची नवनवीन शिखरे गाठण्यासाठी सावनी सज्ज आहेत.
उद्यमशील आणि धडपडणार्‍या व्यक्तिमत्त्वांचे वैशिष्ट्य म्हणजे, या व्यक्ती कधीही एकाच गोष्टीवर थांबून राहत नाही. सातत्याने नवीन नवीन गोष्टींचा शोध त्या घेत राहतात. सावनी आणि त्यांच्या आई याला अपवाद नाही. सध्या ‘अलगुज’ नावाचा एक उपक्रम त्या राबवत आहेत. ‘टेलिपथी’च्या माध्यमातून निसर्ग आणि प्राण्यांशी आपल्याला संवाद साधता येतो. ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडते, हा संवाद कसा घडतो, या संदर्भातील प्रशिक्षणाचे काम त्या करत असतात. शब्दांच्या पलीकडे असणारे विश्व नेमके कसे असते आणि त्यातून कुठल्या नवीन गोष्टी उलगडू शकतात, या विचारातून सुरू झालेला हा प्रवास म्हणजे, लोकांना नव्या क्षेत्राची सफर घडवणारा असेल.

सावनी यांच्याकडे असलेल्या कलात्मक दृष्टीमुळे त्यांच्या निर्मितीमध्ये वेगळेपण अगदी सहज उमटते. या सगळ्यांसोबतच त्या जर्मन भाषेच्या शिक्षिकासुद्धा आहेत. आपल्या या प्रवासाचे टप्पे सांगताना त्यांच्यातील विद्यार्थिनीचे सातत्याने आपल्याला दर्शन घडते. त्यांच्यातील हीच जिद्द त्यांना सातत्याने पुढे नेत राहते. तरुणांना मार्गदर्शन करताना सावनी म्हणतात की, "शिक्षणाबरोबर एखादा छंदसुद्धा आपण जोपासला पाहिजे. आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढून नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे.” सावनी गोगटे यांच्या भविष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

९९६७८२६९८३

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121