चांदवडमध्ये साकारणार अहिल्यादेवींचे शिल्प

- राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

    30-May-2025
Total Views | 5
 
sculpture of Ahilya Devi to be created in Chandwad
 
नाशिक: “चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 300 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना चांदवड येथील रंगमहालाची माहिती देण्यात येईल,” अशी घोषणा राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी केली.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा समिती’तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवार, दि. 29 मे रोजी सकाळी चांदवड येथील होळकर वाडा (रंगमहालात) येथे ‘जागर होळकर शाहीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आ. चित्रा वाघ, आ. डॉ. राहुल आहेर, आ. दिलीप बनकर, आ. नितीन पवार, युवराज यशवंतराव होळकर, अमरजितराजे बारगळ, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदि उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘अहिल्या सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. त्यात डॉ. श्वेता चौधरी, अंजली बारगळ, सुजाता बाबर, डॉ. मेघा मलोसे, श्वेता बोकील, संगीता पाटील, ज्योत्स्ना होळकर, आम्रपाली कोकरे, सुचेता खताळ, शैलजा जाधव, अ‍ॅड. अर्चना शर्मा आदींचा समावेश होता. यानिमित्त रंगमहाल येथे शस्त्र प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते.
 
सोनाली तेलंग यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. आ. डॉ. आहेर यांनी प्रास्ताविकात अहिल्यादेवींनी बांधलेल्या बारव पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष कासलीवाल यांनी आभार मानले. यावेळी होळकर राज परिवाराशी निगडीत व्यक्ती, नागरिक उपस्थित होते.
 
कोण काय म्हणाले...
 
पणनमंत्री जयकुमार रावल ः अहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा पदस्पर्श रंगमहाल या वास्तूला लाभला आहे. या वास्तूच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे.
 
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक विकास कामे केली. मालेगाव येथील पूल अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला आहे. शालेय विद्यार्थ्यांना रंगमहालाची सहल घडविण्यात येईल. आगामी कुंभमेळाच्या आराखड्यात रंगमहालाचा समावेश करावा.
 
युवराज यशवंतराव होळकर ः अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक होते. त्यांनी सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण याला प्राधान्य दिले. रंगमहाल या ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार करून जागतिक वारसास्थळ घोषित होण्यासाठी प्रयत्न करावेत.
 
आ. चित्रा वाघ ः अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरणाची सुरुवात केली. निसर्गाचीदेखील त्यांनी सेवा केली.
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121