51वे राज्य म्हणून अमेरिकेत सामील व्हा, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाला वारंवार हिणवण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कॅनडाची निवडणूक राष्ट्रवादाच्या प्रमुख मुद्द्याभोवती केंद्रित होती. या निवडणुकीत अखेरीस लिबरल पक्षाचा विजय झाला आणि पक्षाचे नेते मार्क कार्नी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. त्यानिमित्ताने कॅनडातील निवडणुकांचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
कॅनडामध्ये संसदेची निवडणूक दि. 28 एप्रिल रोजी पार पडली. खलिस्तानचे खंदे समर्थक आणि न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे जगमीत सिंग यांचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला. त्यांच्या पक्षाला केवळ सात जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत याच पक्षाला 24 जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे न्यू डेमोक्रॅटिक पक्षाची ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता रद्द होणार आहे. कारण, किमान 12 जागा मिळवण्याची अट राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निश्चित केलेली आहे. कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियातील बर्नबी येथील पक्षाच्या कार्यालयात जगमीत सिंग यांनी पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.
या अगोदरच्या निवडणुकीत जगमीत सिंग आणि त्यांचा न्यू डेमोक्रॅटिक पक्ष ‘किंग मेकर’ ठरला होता. या पार्श्वभूमीवर हा पराभव नाचक्की करणाराच म्हणावा लागेल. लिबरल पक्षाचे नेते व कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तानचे खंदे समर्थक जगमीत सिंग यांनी पाठिंब्याच्या मोबदल्यात आपल्या तालावर नाचविले होते. भारताविरुद्ध भूमिका घेण्यास भाग पाडले होते. भारत आणि कॅनडा यांचे संबंध ताणले गेले होते, इतके की ते तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. याहीवेळी आपल्याला गेल्या वेळेप्रमाणे चांगले यश मिळेल, अशी जगमीत सिंग यांची अपेक्षा होती.
पण, कॅनेडियन मतदारांनी आणि विशेषतः भारतीय मूळ असलेल्या मतदारांनी (यात विशेष म्हणजे शीख मतदारही येतात) जगमीत सिंग यांना पार लोळण घेण्यास भाग पाडलेले दिसते. जगमीत सिंग आणि त्यांचा पक्ष यांचा पराभव का झाला? तसे पाहिले तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी होते. नीटनेटकी वेशभूषा करून वावरणारे पहिल्या क्रमांकाचे राजकीय कार्यकर्ते असा त्यांचा लौकिक होता. भारतातून कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्या जुन्या शिखांमध्ये त्यांच्या वडिलांची गणना होते. ग्रेटर टोरोंटो भागातील ओन्टोरियो प्रांतातील स्कारबरो हे त्यांचे जन्मगाव. त्यांनी जीवशास्त्र विषयात पदवी संपादन केली. नंतर कायद्याचे शिक्षण घेतले आणि फौजदारी वकील म्हणून व्यवसायाला प्रारंभ केला. हळूहळू ते स्थानिक राजकारणात रस घेऊ लागले. अशीच दरकोस दरमजल करीत ते ऑन्टोरियो प्रांताच्या विधानसभेवर निवडून आले. हे 2011 साल होते. 2019 साली ते कॅनडाच्या संसदेवर एका मध्यावधी निवडणुकीत विजयी झाले.
जगमीत सिंग यांच्या पत्नी गुरकिरण कौर सिंधू यांची त्यांना मनापासून साथ असते. 2025 सालच्या पराभवाचे वृत्त कानी पडत होते, तेव्हा गुरकिरण त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या. नवर्याचा दारुण पराभव, पक्षाची फक्त सात जागी बोळवण आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेलेली, हे धक्के एकापाठोपाठ एक बसत असताना गुरकिरण कौर यांची सोबत जगमीत सिंगांसाठी धीर देणारी आणि सांत्वन करणारी ठरली. 2025 सालच्या निवडणुकीत आपला पक्ष 24 पेक्षा जास्त जागा मिळवील, अशी जगमीत सिंग यांना खात्री वाटत होती. लिबरल पक्ष आणि कन्झर्व्हेटिव्ह पक्ष यापैकी कुणीही आघाडी घेतली, तरी त्यांना बहुमतासाठी आपली मनधरणी करावी लागेल, या भ्रमात ते होते. आपण म्हणू ते काम करण्यास, तसे निर्णय घेण्यास ते तयार असतील, अशा खात्रीने जगमीत सिंग वावरत होते. प्रत्यक्षात असे संकेत मतदारांकडून मिळत नव्हते, पण, ते जगमीत सिंगांना जाणवले नाहीत. ते आपल्याच स्वप्नसृष्टीत वावरत होते, असे म्हणतात. पण, हे स्वप्न विरले आणि जगमीत सिंग यांच्यावर पक्षनेतृत्वाचा त्याग करण्याची वेळ आली.
मार्क कार्नी हे कॅनडाच्या लिबरल पक्षाचे नेते. त्यांच्या पक्षाने जस्टिन ट्रुडो यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आणि पक्षाची धुरा मार्क कार्नी यांच्याकडे सोपविली. मार्क कार्नी हे राजकारणी म्हणून ओळखले जात नाहीत. ते ‘बँक ऑफ कॅनडा’ आणि ‘बँक ऑफ इंग्लंड’चे गव्हर्नर म्हणून सुविख्यात होते. त्यांच्यावर पक्षाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी येऊन ठेपली होती. या निवडणुकीत मार्क यांच्या राजकीय चातुर्याची परीक्षाच घेतली गेली. निवडणूक प्रचार करायचा तर मतदारांना सांभाळून जवळ ठेवणे भाग होते. कारण, कॅनडामधील निवडणुका डोनाल्ड ट्रम्प यांच्या सावटाखाली पार पडल्या आहेत. “अमेरिकेत 51वे राज्य म्हणून सामील व्हा, कॅनडाला मालेमाल करीन,” असे प्रलोभन जसे ट्रम्प यांनी कॅनडाला दिले होते; तसेच असे न केल्यास आयातशुल्काचा बडगा दाखवायलाही ट्रम्प मागेपुढे पाहत नव्हते. कॅनेडियन मतदारांना ट्रम्प यांचा अतिशय राग आला होता. मतदारांचा आणि ट्रम्प यांचाही पापड मोडणार नाही, अशा कौशल्याने मार्क कार्नी यांनी आपली निवडणूक मोहीम आखली. यानिमित्ताने मार्क कार्नी यांच्या राजकीय चातुर्याची परीक्षाच झाली, म्हणायचे. यात कार्नी यांना चांगलेच यश मिळाले, इतके की, “लिबरल पक्ष जिंकला तर ते आपल्याला आवडेल,” असे ट्रम्प यांनीही मतदानाच्या दिवशी म्हटल्याचे वृत्त आहे.
मतदारांबाबत बोलायचे तर त्यांनी लहान पक्षांना गुंडाळून ठेवले आणि ते मार्क कार्नी यांच्या पाठीशी उभे राहिले. ट्रम्प यांचा कल मार्क कार्नी यांच्याकडे जास्त आहे, अशा वावड्या उठत होत्या. पण, बहुसंख्य मतदारांनी तिकडे दुर्लक्ष करीत लिबरल पक्षाला मतदान केले. लिबरल पक्ष गेली अनेक वर्षे सत्तेत होता. त्यामुळे प्रस्थापितांबाबतची नाराजी (अॅन्टिइनकम्बन्सी) भरपूर होती. कन्झर्व्हेटिव्ह पक्ष जिंकणार असेच सर्व निरीक्षकांचे अंदाज होते. पण, ट्रम्प यांची वक्तव्ये मतदारांना आवडत नव्हती. नाराजी दूर होण्यात लिबरल पक्षातला नेतृत्व बदलही उपयोगी पडला. मार्क कार्नी यांची प्रतिमा स्वच्छ होती. ते राजकारणात नवखे होते. परंतु, मतदारांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत मतदान केले. 168 जागा पदरात टाकल्या आणि विजयाजवळ नेऊन ठेवले (बहुमत एकूण 343 पैकी 172). लिबरल पक्षाची ही खेळी जगभर मार्गदर्शक ठरावी. भारतात हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्येही निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व बदल झाले होते. त्याचा अनुकूल परिणाम दिसला होता, याची या निमित्ताने आठवण होते.
कॅनडाची निवडणूक प्रभावित होईल, असे भारताने काहीही केले नाही. भारताची भूमिका जगमीत सिंग यांच्या विरोधात आहे, हे कॅनडाच्या मतदारांना माहीत व्हावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नदेखील भारताने निवडणूक काळात केले नाहीत. पण, या खलिस्तानवाद्यांच्या कारवाया भारताला मान्य नाहीत, हे कॅनडाच्या मतदारांना निवडणुकीच्या बरेच अगोदर भारताने जाणवून दिले होते. याचा परिणाम कॅनेडियन मतदारांवर झाला. शीख इतर भारतीय मूळांच्या मतदारावर झाला, एवढेच नव्हे तर अनेक शीख मतदारांवरही झाला, असे निरीक्षकांचे मत आहे. सर्वच शीख खलिस्तानवादी नाहीत, हेही या निमित्ताने पुढे आले आहे.
जगमीत सिंगांना या मुद्द्यांची जाणीव शेवटी झाली होती, असे मानण्यास जागा आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅनडातील कारवायांवर बंदी घाला, अशी मागणी केली होती. भारताने आपल्याला 2013 साली व्हिसा नाकारला. 1984 सालच्या शिखांच्या हत्याकांडाला भारत वंशविच्छेद (जेनोसाईड) म्हणायला भारत तयार नाही, हे त्यांच्या निवडणूक प्रचारातले मुद्दे असत. पण, मतदारांनी या अपप्रचाराकडे दुर्लक्ष केले.
कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉलिव्हर हे स्वतःच निवडणूक जिंकू शकले नाहीत. हा त्यांच्यासाठी आणि पक्षासाठीही फार मोठा धक्का होता. प्रत्यक्ष बहुमत जरी नाही तरी निदान सर्वांत मोठा पक्ष म्हणून तरी आपण निवडणुकीत यश संपादन करू असे पक्षाला आणि निरीक्षकांनाही वाटत होते. मतपेटीतून बाहेर पडणारी रहस्ये अनेकदा कुणालाच कळत नाहीत, हेच खरे. एकूण काय की, कॅनडातील ही निवडणूक सर्वांनी अभ्यासावी अशी आहे.
कॅनडाच्या निवडणूक निकालाची ठळक वैशिष्ट्ये
- मार्क कार्नी यांच्या डावीकडे झुकलेल्या लिबरल पक्षाला 2021 मध्ये 32.62 टक्के मते आणि 160 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्यात लक्षणीय वाढ होऊन 43.52 टक्के मते व 168 जागा मिळाल्या आहेत. लिबरल पक्षाच्या जागा वाढल्या, ही भारतासकट अनेकांसाठी समाधानाची बाब.
- पियरे पॅालिव्हर यांच्या कन्झर्व्हेटिव्ह उदारमतवादी पक्षाला 2021 मध्ये 33.74 टक्के मते आणि 119 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्यात भरपूर वाढ होऊन 41.34 टक्के मते व 144 जागा मिळाल्या आहेत. तरी पॅालिव्हर मात्र स्वतः पराभूत झाले आहेत.
- जगमीत सिंग यांच्या डावीकडे झुकलेल्या खलिस्तानी पक्षाला 2021 मध्ये 17.82 टक्के मते आणि 25 जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्या कमी होऊन 6.22 टक्के मते व पाच जागा मिळाल्या आहेत
- इलिझाबेथ मे यांच्या पर्यावरणवादी पक्षाला 2021 मध्ये 2.33 टक्के मते आणि दोन जागा मिळाल्या होत्या. 2025 मध्ये त्या कमी होऊन 1.23 टक्के मते व एकच जागा मिळाली आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिकेत 51वे राज्य म्हणून सामील व्हा, मालामाल करीन’ या आमिषाचा किंवा सामील न झाल्यास आयातशुल्काचा फटका बसेल, या धमकीचा कॅनडाच्या मतदारांवर परिणाम झाला नाही.
- वसंत काणे