‘स्टार्टअप्स’ हे आता अगदी गल्लोगल्ली उभे राहिलेले दिसतात. पण, हे स्टार्टअप्स सुरु करणे आणि महत्त्वाचे म्हणजे ते यशस्वी करणे, हे तितकेच आव्हानात्मक. पण, एकमेकांच्या बर्यावाईट अनुभवांतून स्टार्टअप्सनाही बरेच काही शिकण्यासारखे असते. तेव्हा, स्टार्टअप्स सुरु केलेल्या उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि स्टार्टअप सुरु करण्याचे नियोजन करणार्या मंडळींचेही मार्गदर्शन व्हावे, या दुहेरी हेतूने महेंद्रन सुब्रमणियन यांनी ‘बिझनेस अरेना 365’ या युट्यूब चॅनेलची मुहूर्तमेढ रोवली. त्यानिमित्ताने स्टार्टअप्सना प्रकाशझोतात आणणार्या महेंद्रन सुब्रमणियन यांच्या युट्यूब चॅनेलचा प्रवास उलगडणारी ही मुलाखत...
आपला एक उद्योग असावा आणि तो युट्यूब चॅनेलच्या स्वरुपात असावा, असे आपल्याला कधी वाटले आणि ‘बिझनेस अरेना 365’ची सुरुवात कशी झाली?
माझा उद्योजकीय प्रवास काही अचानक सुरू झालेला नाही. 2020 पर्यंत मी मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये उच्चपदांवर काम केले. त्याचवेळी माझ्या डोक्यात सातत्याने हाच विचार चालू असायचा की, आपला स्वतःचा काहीतरी उद्योग-व्यवसाय असावा. याच विचारातून मी जुलै 2020 मध्ये माझी नोकरी सोडली आणि स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच मी काही प्रयत्न करून बघितले. जसे की, ‘क्लाऊड किचन’, ‘स्टाफ मॅनेजिंग’ यांसारखे व्यवसाय मी सुरू करून पाहिले; पण त्यात यश आले नाही. त्यामुळे पुढे काय करावे, हा विचार माझ्या मनात होता. मला फिल्ममेकिंगची आवड होती. जसे की, लघुपट, त्यासाठी लागणारे कथालेखन, तसेच कुठे छोटी-मोठी कामे करणे मला नेहमी आवडायचे. त्यामुळे या आवडीतूनच माझ्या मनात अशी संकल्पना आली की, आपण युट्यूब चॅनेल सुरू करूया. त्यासाठी काही मित्रांचा सल्ला मी घेतला, त्यातूनच मला युट्यूब चॅनेलची संकल्पना सूचली आणि मी ‘बिझनेस अरेना 365’ हे युट्यूब चॅनेल सुरु केले.
उद्योगाबरोबरच त्या कंपनीचे नावही तितकेच महत्त्वाचे, तर ‘बिझनेस अरेना 365’ या नावामागचे रहस्य काय आहे?
युट्यूब चॅनेलचा विचार करत असताना एक विचार मनात आला की, आपण स्टार्टअपवर काम का करू नये? आज स्टार्टअप्स वेगाने वाढत आहेत. आज बघितले तर, दर तीन माणसांपैकी एकजण हा स्वतःचे काहीतरी सुरू करत असतो आणि स्टार्टअप तयार करत असतो. त्यामुळे आपण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून स्टार्टअप्सना समोर ठेवून काम का करू नये, असा विचार आला. त्यातूनच हे चॅनेल स्टार्टअप्सनाच केंद्रस्थानी ठेवून काम करेल, असे ठरले आणि म्हणूनच नाव ‘बिझनेस अरेना.’ मुळात बिझनेस या गोष्टीला काहीच अंत नाही. उद्योजक कायम कार्यरत असतो, त्यामुळे ‘365.’ यात माझ्या मुलीचेसुद्धा मला सहकार्य लाभले. सुरुवातीला मी माझ्या मित्रांसोबतच सुरुवात केली. जे मित्र माझ्या परिचयाचे आहेत, जे मला माझ्या कामात मदत करतील, अशाच मित्रांना मी प्रथम मुलाखतीसाठी विचारणा केली. त्यांनीही माझा उत्साह वाढावा म्हणून मला प्रोत्साहनच दिले. त्यामुळे अशी माझ्या चॅनेलची सुरुवात झाली.
युट्यूब चॅनेलवर कंटेट क्रीएशनला आता एकप्रकारे व्यवसाय म्हणून समाजमान्यता मिळालेली दिसते. तेव्हा, या नवतंत्रज्ञानाला आपण कसे आत्मसात केले?
या कामात मला माझ्या चित्रपट क्षेत्रात काम करणार्या मित्रांचा फायदा झाला. त्यांनी मला या तंत्राशी निगडित मदतही केली. सुरुवातीच्या काळात आणि आजही मला कुठलीही अडचण असल्यास माझ्या मित्रांकडे जातो आणि ते मला माझे प्रश्न सोडवायला मदत करतात. मला एका तत्त्वावर खूप विश्वास आहे की, आपण कधीच ‘मला सगळं येतं’ हे म्हणू शकत नाही. कारण, प्रत्येक वेळी एखादी नवीन गोष्ट आपल्यासमोर येते आणि आपल्याला आपले आतापर्यंतचे सर्व ज्ञान विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. तेच मी माझे हे युट्यूब चॅनेल चालू करताना केले.
तरीही आपल्याला बर्याच जणांचे सहकार्य लाभले, असे आपण म्हणता. तर आपल्या या सहकार्यांविषयी सांगा.
हे माझे सर्व तरुण सहकारी आहेत. माझ्यासाठी सुरुवातीला हे सर्व तंत्रज्ञान आत्मसात करणे अजिबात सोपे नव्हते. त्यामुळे मला बर्याच गोष्टी शिकून घ्याव्या लागल्या. मला हे लक्षात आले की, माझे जे तरुण मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडून आपल्याला बर्याच गोष्टी शिकाव्या लागतील. माझा आतापर्यंतचा सर्व अनुभव, शिक्षण सोडून मला त्यांच्यासमोर विद्यार्थी म्हणून बसावे लागले. ते सगळे कॅमेरा तंत्रज्ञान, बोलायचे कसे, ते तंत्रज्ञान हाताळायचे कसे, मुलाखतीसाठी लागणारे ‘स्क्रिप्ट’ तयार कसे करायचे, हे सर्वच मला त्यांच्याकडून शिकावे लागले. इथे एक गोष्ट मी सांगू इच्छितो की, आता आपल्याला जे शिकायचे आहे, ते या तरुण मंडळींकडूनच शिकायचे आहे. त्यामुळे मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. मुळात हे माध्यम रोज बदलणारे आहे. रोज काहीतरी नवीन गोष्ट आपल्यासमोर येते; आपल्याला ती शिकावी लागते आणि हे माझे तरुण मित्र ती पटकन शिकतात. त्यामुळे मला त्यांचे अप्रुप वाटते आणि त्यांच्याकडून शिकायलाही आवडते, तर मी आता या माझ्या तरुण मित्रांचा आभारी आहे.
युट्यूब चॅनेल्सकडेही हल्ली व्यावसायिक अंगाने बघितले जाते. त्यामुळे आपसुकच उद्योग-व्यवसायाचे सगळे नियम त्यालाही लागू होतात. तर युट्यूब चॅनेल सुरू करताना आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून या माध्यमाचा कसा विचार केला?
आपल्याला जर एखादे युट्यूब चॅनेल सुरू करायचे असेल, तर सर्वप्रथम आपले वेगळेपण तयार करावे लागेल. ते काय आणि कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल, याचाही खोलवर विचार करावा लागेल. त्यानंतर सर्वांत महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे सातत्य. आपल्याला सातत्याने आपले व्हिडिओज टाकावे लागतील. त्याची वेळ, वार ठरवून तो सातत्याने पाळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यानंतरच ते युट्यूब चॅनेल जे ‘अल्गोरिदम’ म्हणतात, त्यात बसायला लागते. त्यानंतरच युट्यूब चॅनेल हा आपला व्यवसाय म्हणून आकार घेऊ शकतो. या गोष्टी आपल्याला आपले युट्यूब चॅनेल चालू करताना लक्षात घ्यायला हव्यात.
आपण गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ युट्यूब चॅनेल यशस्वीपणे चालवत आहात; त्यात आपण आतापर्यंत 100 पेक्षा जास्त स्टार्टअप्सच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर आपल्या या संपूर्ण प्रवासातील एखादा अविस्मरणीय अनुभव सांगू शकाल का?
या संपूर्ण प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले. मी ज्या काळात माझे युट्यूब चॅनेल चालू केले, तो काळ ‘कोरोना’सारख्या महामारीचा काळ होता. त्यामुळे त्या आव्हानाला तोंड देत उभे राहणारे जिद्दी लोक मला या संपूर्ण प्रवासात भेटले. विशेषतः कित्येक महिला उद्योजिकांच्या मुलाखती मला करता आल्या, ज्यांनी अक्षरशः सगळे उद्ध्वस्त झालेले असताना तरीही जिद्दीने उभे राहून आपला व्यवसाय उभा केला. त्यामुळे मला अनेक छोट्या-मोठ्या चांगल्या उद्योजकांना भेटता आले आणि त्यांचा प्रवास समजून घेता आला. हाच माझ्यासाठीचा सगळ्यांत मोठा अनुभव होता.
स्टार्टअप्सच्या आजवर घेतलेल्या मुलाखतींचा अनुभव आणि स्वत: एक उद्योजक म्हणून, तुम्ही नवउद्योजकांना, स्टार्टअप सुरु इच्छिणार्या तरुणांना काय संदेश द्याल?
मुळात हा प्रवास सोपा नव्हता. मी माझ्या करिअरची सुरुवात ही सेल्स म्हणजे विक्रीपासून केली. त्यानंतर मी टेक्सटाईल म्हणजे कापड उद्योगाकडे वळलो, त्यानंतर मी परदेशी क्लाएंट्स हाताळायला लागलो. या सर्वांत गरजेची गोष्ट मी अंगी बाणवली ती म्हणजे, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. यांमुळेच मी इतक्या विविध क्षेत्रांत काम करू शकलो. हाच गुण मी युट्यूब चॅनेलच्या बाबतीतही अंगीकारला. मी माझ्या नवीन मित्रांना सल्ला देऊ इच्छितो की, आपल्या कामात सातत्य ठेवा. कायम नवीन गोष्टी शिकत राहाणे गरजेचे आहे. त्यातूनच आपली प्रगती होऊ शकते. त्यामुळे कायम शिकत राहा!