नवी दिल्ली: (IAF Jaguar Fighter Jet Crashes)भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान बुधवारी ९ जुलैला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोधमोहिम आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. रतनगड तहसीलमधील भानोदा गावातील राजलदेसर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातावेळी दोन वैमानिक विमानात उपस्थित होते.
राजस्थानच्या सुरतगड हवाई दलाच्या तळावरुन विमानाने उड्डाण केले होते आणि दुपारी १.२५ च्या दरम्यान ते भानोदा गावातील शेतात कोसळले, अशी माहिती एसएचओ कमलेश यांनी दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हवाई दलाकडून चौकशी केल्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
या वर्षातील जग्वार लढाऊ विमानाचा हा तिसरा अपघात आहे. पहिला अपघात ७ मार्च रोजी हरियाणाच्या पंचकुला येथे झाला होता आणि दुसरा अपघात २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगरजवळ झाला होता. एप्रिलमध्ये गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आयएएफचे आणखी एक जग्वार विमान कोसळले होते. ते विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुवर्दा गावाजवळील एका मोकळ्या मैदानात कोसळले होते.