‘आर्यन आक्रमण सिद्धांत’ आणि सिंधू संस्कृतीचे गौडबंगाल

    05-Mar-2025
Total Views |

 
article on the fallacy of the aryan invasion theory

आर्यन युरोपातून भारतभूमीत आले, भारतीय भाषांचे मूळदेखील युरोपातच, द्रविडींना दक्षिणेला ढकलून आर्यन लोकांनी उत्तरेला वस्ती केली, यांसारख्या कपोलकल्पित कथांचा सिद्धांत म्हणजे ‘आर्यन आक्रमणाचा सिद्धांत.’ इतिहासाचे लेखन आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाचा विचार करताना, ‘आर्यन आक्रमणाच्या सिद्धांता’तील फोलपणा समजून घ्यायलाच हवा.
 
‘निर्वसाहतीकरण’ या विषयाचा प्रमुख भाग हा राष्ट्रीय इतिहासाच्या लेखनावर आधारलेला आहे, हे आपण गेल्या काही लेखांत विस्तृतपणे पाहिलेच. परंतु, इतिहास हा विषय इथे न सोडता, भारतीय इतिहासाच्या लेखनातील काही अतिशय महत्त्वाच्या त्रुटी, ज्यांच्यामुळे आपल्या आत्मबोधाच्या आणि राष्ट्रबोधाच्या संकल्पनांना मोठा अडसर निर्माण झाला आहे, त्यांचा किमान उल्लेख आणि तोंडओळख इथे आवश्यक आहे. इतिहास विषयक यापुढील लेखांचा उद्देश हा या त्रुटींचा आणि त्यातील संशोधनातील प्रवाहांचा विस्तृत आढावा असा नसून, त्यांचे वसाहतीकरणाविषयीचे परिणाम एवढाच आहे. या त्रुटींमधील सर्वांत महत्त्वाचे असे भारतीय इतिहासातील पान म्हणजे, वेदकालीन किंवा त्याही पूर्वीचा इतिहास. या इतिहासाचा परिचय शालेय वयात करून देताना वापरण्यात येणारा सिद्धांत म्हणजे ‘आर्यन आक्रमणाचा सिद्धांत.’ हा सिद्धांत आपण ऐतिहासिक सत्य म्हणून शिकतो. पण, प्रत्यक्षात हा सिद्धांत इतिहासकारांच्या जगात मान्यता पावलेला आहे का, याविषयीचे विभिन्न मतप्रवाह काय, त्यातील संशोधनात आलेली महत्त्वाची वळणे कुठली, यासंबंधीचे राष्ट्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे वाद कोणते, याविषयी आपण अनभिज्ञ असतो. याच विषयाची दुसरी बाजू म्हणजे, सिंधू नदीच्या खोर्‍यात वस्ती करून असणार्‍या एका अत्यंत प्रगत अशा नागर संस्कृतीचा पुरातत्त्व विभागाला लागलेला शोध. मोहेंजोदारो, हडप्पा, लोथळ, कालीबांगन यासारख्या नगरांच्या जवळ सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष नेमके कोणत्या समाजाचे याचा नेमका उलगडा झालेला नसताना, ‘आर्यन आक्रमणाच्या सिद्धांता’ला बळकटी देण्यास या संस्कृतीचा वापर होतो.
 
‘आर्यन आक्रमणाचा सिद्धांत’ हा एक मुळातला भाषाशास्त्रीय सिद्धांत आहे. मॅक्सम्युलर, विल्यम जोन्स आणि तत्कालीन इतर संस्कृत भाषेच्या युरोपीय अभ्यासकांच्या असे लक्षात आले की, भारतीय भाषा आणि युरोपीय भाषा या एकमेकांना अतिशय जवळच्या आहेत. या सर्व भाषांचे मूळ एकच असावे, असा सिद्धांत त्यातून स्वाभाविकपणे पुढे आला. साधारण अठराव्या शतकात मांडलेल्या या सिद्धांताला नंतर एकोणिसाव्या शतकात चालना मिळून, त्यावर बरेच संशोधन झाले. यातील दोन मुख्य प्रश्न म्हणजे, ही जी मूळ भाषा होती (या भाषेला आज ‘प्रोटो-इंडो-युरोपियन’ भाषा असे संबोधले जाते) ती भाषा बोलणारे लोक कुठे राहात असत, त्यांचा काळ कुठला आणि या भाषेचा प्रसार युरोप आणि भारत इतक्या दूरच्या प्रदेशात नेमका कसा झाला आणि मध्य-पूर्वेतील तुर्कस्थान, इराक, सीरिया या भागात या भाषेचे अवशेष का दिसत नाहीत. त्यातील पहिला प्रश्न हा ‘आर्यन आक्रमणाच्या सिद्धांता’शी जवळचा संबंध निर्माण करतो.
 
या सर्व संशोधनाची राजकीय पार्श्वभूमी आपण प्रथम समजून घ्यायला हवी. सुरुवातीला व्यापारी उद्देशाने निर्माण झालेल्या युरोपीय कंपन्यांनी एकोणिसाव्या शतकात साम्राज्य उभारणीची सुरुवात केलेली होती. वसाहतींचे राज्य स्थापतानाच युरोपीय वंशश्रेष्ठत्वाचाही सिद्धांत निर्माण झालेला होता. अशा पार्श्वभूमीवर आपल्या भाषेचे मूळ हे हिंदुस्थानात आहे, यासारखा सिद्धांत युरोपीय विचारकांना मान्य होण्यासारखा नव्हता. त्यामुळे ही मूळ भाषा आणि ती भाषा बोलणारे लोक हे युरोपातच कुठेतरी निवास करत असले पाहिजेत, असे मत स्वयंसिद्ध असल्यासारखे मांडले गेले. मात्र, युरोपातील कित्येक भाषा या तथाकथित मूळ भाषेपेक्षा बर्‍याच प्रमाणात वेगळ्या होत्या. त्याचवेळी मध्य-पूर्वेतील ‘हिटाईट’ समाजासारखे काही लोक हे या मूळ भाषेचीच एक बोली बोलत असल्याचे संशोधन प्रकाशात आले आणि भौगोलिक तुटलेपणाचा मुद्दा निकाली निघाला. या सर्व संशोधनाचे सार म्हणून, दक्षिण रशियातील कॉकेशस पर्वतरांगांच्या आसपास या मूळ भाषेचे आणि ती बोलणार्‍या समाजाचे स्थान निश्चित करण्यात आले. असेही एक संशोधन पुढे आले की, आज बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी ‘लिथुएनियन’ भाषा या मूळ भाषेला सर्वांत जवळची आहे. अनेक विद्वान या मताशी सहमत नव्हते. कारण, त्यांच्या मते, वैदिक संस्कृत ही मूळ भाषेला अधिक जवळची होती. पण, कॉकेशस पर्वतरांगांमधील मूळ स्थानाच्या सिद्धांताला लिथुएनियन भाषा सोयीची होती.
 
युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांताने कोणतेही पुरावे नसताना, या समाजाच्या रंगरूपाचे वर्णन युरोपीय धर्तीवर उंच, गोरे, निळ्या डोळ्यांचे, सोनेरी केसांचे अशा प्रकारे दडपून देऊन हा समाज युरोपीय मुळाचाच कसा होता, अशी मांडणी करायला सुरुवात केली. या समाजाला ‘आर्यन समाज’ असे नाव देऊन नंतर यांची एक शाखा मध्य-पूर्वेतून पर्शिया (इराण) मार्गे वायव्येकडून भारतात प्रवेश करती झाली. त्यांनी भारताच्या मूलनिवासी द्रविड समाजाला दक्षिणेकडे ढकलून उत्तरेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आजचा हिंदू समाज जो आहे, तो या आर्यन वंशाने आणलेल्या धर्माचे पालन करतो आहे. आर्यन समाजाचा स्थानिक द्रविड समाजाशी वर्णसंकर होऊन आणि भौगोलिक परिस्थितीला जुळवून घेताना, या समाजाचे मूळ रंगरूप लोपले जाऊन त्यांचा एक भिन्न वर्ण निर्माण झाला आहे. थोडक्यात, ‘भाषाशास्त्रीय साम्य’ इतक्या एका भांडवलावर एक संपूर्ण काल्पनिक समाज निर्माण करून त्याचे भारतावर प्राचीन काळात आक्रमण झाल्याचा सिद्धांत दडपून दिला गेला.
 
‘आर्यन आक्रमणाच्या सिद्धांता’चे कच्चे दुवे पाहण्यापूर्वी त्याची वसाहतवादी धोरणासाठीची उपयुक्तता लक्षात घेऊ म्हणजे, कोणत्याही चिकित्सेचा प्रयत्न हाणून पाडत, हा सिद्धांत का लादला गेला, ते आपल्या लक्षात येईल. या सिद्धांताने तीन गोष्टी भारतीय समाजाच्या गळी उतरवल्या. पहिले म्हणजे, युरोपीय लोकांची वसाहत हे काही देशावरील संकट नाही, तर पूर्वी ज्या आर्यन समाजाने या देशावर राज्य केले, त्यांचीच एक वेगळी शाखा आज राज्य करते आहे. भारत हा सतत परकीय राजवटींच्याच अधिपत्याखाली राहिलेला आहे. दुसरे म्हणजे, हिंदू धर्म हा मूळ भारतीय धर्म नाही, तो बाहेरून आलेल्या आर्यन लोकांचा धर्म आहे. त्यामुळे त्यानंतर आलेले ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म यांना फार वेगळे समजायची गरज नाही. परकीय आक्रमकांचा धर्म स्वीकारणे, हाच या भूमीचा इतिहास आहे. तिसरे म्हणजे, भारताच्या दक्षिणेस आजही जे लोक द्रविड भाषा बोलतात, पण आर्यनांचा हिंदू धर्म पाळतात, ते येथील मूळ प्रजा असून ते उत्तरेकडील आर्यन भाषा बोलणार्‍या समाजापासून भिन्न आहेत. या तिन्ही मुद्द्यांचा आपल्या ‘राष्ट्र’ संकल्पनेवर कशा प्रकारचा परिणाम झाला असेल, ते लक्षात येणे सहज शक्य आहे.
 
परंतु, भारतीय समाज आणि त्याच्या प्राचीन संस्कृतीची ही मानखंडना जी युरोपीय विद्वानांकडून आणि त्यांची री ओढणार्‍या आणि साम्यवादी हितसंबंध असणार्‍या भारतीय इतिहासकारांकडून झाली, त्या ‘आर्यन आक्रमणाच्या सिद्धांता’मध्ये सत्याचा अंश किती होता? मॅक्सम्युलरने भाषाशास्त्रीय निकष लावून ऋग्वेदाचा काळ हा न्यूनतम इ. स. पू. १००० इतका निश्चित केला होता. तो अचूक मानून आर्यन आक्रमण हे त्यापूर्वी पाचशे ते हजार वर्षे असे दडपून देण्यात आले. त्यासाठी ‘ऋग्वेद’ आणि ‘अवेस्ता’ हा पारशी धर्मग्रंथ यातील भाषिक साम्यस्थळांचा आधार दिला गेला. परंतु, भाषिक आधार हा केवळ संस्कृतींचा संबंध असल्याचे दर्शवतो. त्याचा निश्चित काळ सांगू शकत नाही, या आक्षेपाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. कॉकेशस पर्वतरांगांच्या आसपास उगम पावलेल्या या संस्कृतीचे इतर कुठेही अवशेष नसताना तिचे सर्वोत्तम जतन भारतात का झाले, याचेही कधी उत्तर दिले गेले नाही.
 
 
अर्जुनाचा नातू परीक्षित हा युधिष्ठिरानंतर हस्तिनापुराचा राजा झाला. त्यानंतर ११८ पिढ्यांनी मगधचा राजा धनानंद राजा झाल्याचा उल्लेख भारतीय पुराणांतून येतो. या वंशावळीस ऐतिहासिक तथ्य मानून, भारतीय युद्धाचा कालखंड अजून सहस्र वर्षे मागे जातो आणि मग ‘आर्यन आक्रमणा’ची कालगणना नेमकी बसत नाही. भारतीय इतिहास साधनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष हे तर नेहमी केले गेले. कोणत्याही आक्रमणाचा कोणताही उल्लेख वेद, पुराणे व अन्य तत्कालीन साधनांमध्ये दिसत नाही. त्याचे कोणतेही पुरातत्त्वीय पुरावे सापडत नाहीत, हे सर्व दृष्टीआड केले गेले. काहीवेळा ‘आर्यन आक्रमणा’च्या ऐवजी ‘आर्यन अभिसरण’ असाही सिद्धांत मांडण्यात आला. ‘आर्य’ या पूर्ण वेगळ्या अर्थाच्या संस्कृत शब्दाला जवळचा असा ‘आर्यन’ हा शब्द या वंशासाठी वापरण्यात आला. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ ही अब्राहमिक पंथांसारखीच पंथप्रसाराची घोषणा असल्याचा आभास निर्माण केला गेला. थोडक्यात म्हणजे, एक केवळ कपोलकल्पित कथा ‘प्रस्थापित सिद्धांत’ म्हणून खपवण्यात आली. त्याहून पुढचे म्हणजे, ज्या युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून हा सिद्धांत जन्मला, तो वंश असा काही वेगळा नाहीच, असे आजचे जीवशास्त्र सांगते. ‘वंश’ या संकल्पनेची नेमकी जीवशास्त्रीय व्याख्या नाही. रूपरंग हे केवळ भौगोलिक भिन्नतेमुळे होतात. सर्व मानव हे एकाच वंशाचे आहेत, असे नवीन संशोधन सांगते.
 
‘आर्यन आक्रमणाच्या सिद्धांता’ला एक प्रमुख आधार म्हणजे, सिंधू संस्कृतीचा शोध. या संस्कृतीचा कालखंड इ. स. पू. दोन ते चार हजार वर्षे जुना असल्याचे सिद्ध झाल्याने हा समाज मूळ द्रविड असावा. यांनाच दक्षिणेला ढकलून आर्यन लोक उत्तरेला वस्ती करून राहिले, असे सांगण्यात आले. सिंधू लिपी ही चित्रलिपी भासते. ती तशी आहे, असे समजून आणि भाषा द्रविड कुळातील आहे, असे गृहीत धरून या लिपीचा अर्थ लावायचे अनेक असफल प्रयत्न झाले. काहीही अर्थ लागलेला नसताना हा समाज कोण होता, त्याची संस्कृती कशी होती, यावर संशोधने प्रसिद्ध झाली. मात्र, डॉ. एस. आर. रावांनी त्याकडे ‘चित्रलिपी’ म्हणून न पाहता ‘वर्णलिपी’ म्हणून पाहिले आणि त्यांना कित्येक शब्द हे संस्कृत असल्याचे दिसले. हे संशोधन मागे ढकलले गेले. आज ‘यज्ञदेवम’ या नावाने एका संशोधकाने जवळपास सर्व लिपी उलगडून दाखवली आहे आणि तिचे उत्तरकाळात वापरण्यात येणार्‍या ब्राह्मी लिपीशी साधर्म्य दाखवले आहे. त्यामुळे सिंधू संस्कृती ही वेगळी संस्कृती नसून, मूळ हिंदू समाजाचाच तो एक प्राचीन काळातील (कदाचित वेदपूर्व आणि वेदकाल) इतिहासाचा भाग आहे, असे आज म्हणता येते. आजच्या हिंदू समाजाने हे ‘आर्यन आक्रमणा’चे जोखड आपल्या समाजमनावरून फेकून देऊन आपला इतिहास सजगपणे आपलासा करण्याची आज आवश्यकता आहे.
 

डॅा. हर्षल भडकमकर
 
(लेखकाने मुंबईतील टीआयएफआर येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
 
९७६९९२३९७३