आपल्या बोटांच्या ताकदीवर आणि सूक्ष्म नियोजनाच्या मदतीने अनेक कॅरम स्पर्धांमध्ये देदीप्यमान यश मिळवणार्या आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेश खेडेकर यांच्याविषयी...
खेळ ही माणसाच्या आयुष्यातली एक सहज, नैसर्गिक प्रेरणा. मनोरंजनाचे साधन असले, तरी खेळातून माणूस एकाग्रता, संयम आणि जिद्द शिकवतो. त्यातही कॅरम हा असा खेळ, जिथे बोटांच्या टोकांमध्ये लपलेली रणनीती आणि डावपेच सफाईदारपणे फळीवर उमटतात. या खेळातून घडलेल्या अशाच एका अवलियाच्या प्रवासाची ही गोष्ट...
गुहागर तालुक्यातील तवसाळ या गावी जन्मलेल्या, दिलेश नारायण खेडेकर हे वास्तव्यासाठी मुंबईचे! लालबाग-परळ विभागात त्यांचे बालपण गेले. दिलेश यांना पाच भावंडे. आई गृहिणी, तर वडील टेलिकॉम म्हणजे सध्याच्या ‘बीएसएनएल’ कंपनीमध्ये कामाला. शिवडीमधील प्रबोधनकार ठाकरे शाळेमध्ये दिलेश यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे दिलेश यांनी परळच्या सोशल सर्व्हिस शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण दिलेश यांनी सेंट्रल रेल्वे महाविद्यालातून पूर्ण करत, उच्च शिक्षणासाठी आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. असे सगळे असले, तरी लहानपणापासूनच दिलेश यांचा ओढा कॅरमकडेच होता.
इयत्ता सहावी-सातवीत असतानाच, दिलेश यांची पाऊले मोठ्यांचे कॅरम खेळ बघण्यासाठी थबकत असत. त्यानंतर दिलेश यांनी वयाने मोठ्या असणार्या खेळाडूंबरोबर खेळणे सुरू केले. दिलेश यांच्या अंगी असलेल्या कौशल्याच्या बळावर त्यांनी लहान वयातच विभागातल्या अनेक मोठ्या खेळाडूंना कॅरमच्या खेळात पराभूत करायला सुरुवात केली. त्यामुळे विभागातील अनेकांनी दिलेश यांच्या खेळाचे कौतुक त्यांच्या वडिलांकडे केले. एकेदिवशी दिलेश यांच्या वडिलांचे मित्र एरिक डिसोझा हे त्यांच्या घरी आले असताना, दिलेश यांनी त्यांच्यासमवेत कॅरमचा डाव मांडला. खेळलेल्या दोन डावामध्ये एरिक यांचा पराभव दिलेश यांनी केला. दिलेश यांचा खेळ पाहून एरिक प्रभावित झाले. त्यांनी दिलेश यांच्या वडिलांना ‘दिलेश हा मोठा खेळाडू होईल,’ असे भविष्यही सांगितले आणि पुढे ते खरेही ठरले. त्यानंतर दिलेश यांनी स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. दिलेश यांनी स्पर्धेत भाग घ्यावा आणि एकतरी पदक आणावे, असे समीकरणच दृढ झाले. दिलेश यांनी शाळेपाठोपाठ महाविद्यालयीन जीवनामध्येही पदकांचा सिलसिला कायम राखला.
या काळातच, दिलेश यांना प्रधान लेखापरीक्षण संचालक (मध्य) मुंबई, कॅग कार्यालय इथे चतुर्थ श्रेणीतील नोकरीची संधी मिळाली. त्यावेळी ही नोकरी करावी का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. मात्र, त्यावेळी त्यांचे कुटुंब आणि मित्रांनी दिलेश यांना या नोकरीचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे दिलेश यांनी ही संधी स्वीकारली. आज ते ‘सुपरवायझर’ पदावर कार्यरत आहेत.
दरम्यानच्या काळात विविध स्पर्धांमध्ये दिलेश यांनी सहभाग घेतला असून, अनेक पारितोषिकेही पटकावली आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये नऊ वेळा विजेतेपद मिळवले असून, त्यात एका हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. तसेच, दिलेश चार वेळा उपविजेतेही राहिले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी करताना, दिलेश यांनी २००२ साली ‘राज्य अजिंक्यपद स्पर्धा’ जिंकली. राज्य स्तरावर खेळताना दिलेश यांनी तीन वेळा उपविजेतेपदावर नाव कोरले. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील ‘फेडरेशन कप’मध्ये दिलेश यांनी प्रत्येकी दोनवेळा उपविजेतेपद आणि उपांत्य विजेतेपद पटकाविले. २००५ साली ‘अजिंक्य खेळाडू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि ‘अर्जुन पुरस्कार’ विजेता मारिया इरुदयम विरुद्धच्या सामन्यातही त्यांनी विजय संपादित केला.
अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी करताना, सांघिक यशामध्येही दिलेश यांनी भरीव कामगिरी केली. नवी दिल्ली येथे २००४ साली झालेल्या आठव्या सार्क कॅरम स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला, त्यातही दिलेश यांचे योगदान मोलाचे होते. अनेक जागतिक मिश्र दुहेरी स्पर्धांमध्येही उपविजेते पदावर त्यांनी नाव कोरले. चौथ्या एकेरी जागतिक स्पर्धांमध्ये जरी चौथ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले असले, तरीही त्यांच्या योगदानाने सांघिक स्पर्धांमध्ये भारताने सुवर्ण पदकाची कमाई केली. कार्यालयीन पातळीवर होणार्या विविध विभागांच्या स्पर्धांमध्येही दिलेश यांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी, करत २२ वेळा अंतिम फेरीत धडक मारली. त्यामध्ये १२ वेळा विजयश्री त्यांना मिळाली असून, दहा वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
दिलेश यांच्या सहचारिणी प्रीती यादेखील कॅरममध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूच असून, त्यादेखील उत्तम कॅरम खेळतात. अनेक मिश्र सांघिक स्पर्धांमध्ये सूक्ष्म नियोजनाने विजय खेचून आणण्यात प्रीती यांचा हातखंडा. दिलेश त्यांच्या यशाचे सर्व श्रेय त्यांचे कुटुंब, आजवर अनेक पातळीवर लाभलेले सर्व गुरू आणि कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांनाच नम्रपणे देतात. वरीलपैकी प्रत्येकानेच सांभाळून घेतल्याने, दिलेश यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘शिवछत्रपती पुरस्कारा’पर्यंतचा टप्पा गाठता आला. आज अनेक खेळाडू दिलेश यांच्याकडून कॅरमचे ज्ञान आत्मसात करुन, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमवत आहेत, याचा दिलेश यांना अभिमान आहे. भविष्यात कॅरमचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हावा, एवढेच दिलेश यांचे स्वप्न आहे. दिलेश यांच्या उत्तुंग कारकिर्दीला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!