आप्तस्वकीयांचे डोळ्यासमोर हाल होताना पाहून देखील ज्यांची मातृभूमी आणि धर्मावरची श्रद्धा जरा देखील कमी झाली नाही, उलट अध्यात्मशक्ती आणि क्षात्रतेजाचा अपूर्व संगम करत त्यांनी अन्यायी औरंगजेबाच्या राजवटी विरोधातले धर्मयुद्ध अविरत सुरु ठेवले, त्या श्री गुरुगोविंदसिंह यांच्या प्रकाश दिनानिमित्त त्यांच्या साहित्यसंपदेतील वीररसयुक्त पत्र जफरनामाचा हा भावानुवाद...
भारतीय भक्ती आंदोलनाला सामर्थ्याचे तेजस्वी वळण देणारे दशमगुरू श्रीगोविंदसिंहजी, यांचा आज प्रकाश दिवस (जन्मदिवस). हिंदू रक्षणकर्ते नववे श्रीगुरू तेगबहादूरजी यांच्या वीर बलिदानानंतर, वयाच्या केवळ नवव्या वर्षी श्रीगोविंदसिंहजी गुरुगादीचे वारसदार बनले आणि धर्म-देशरक्षणासाठी आजन्म संघर्षरत राहिले. आपली चार मुले, आई, पिताजी, सहकारी यांनी धर्मरक्षणार्थ पत्करलेले हौतात्म्य धीरगंभीरपणे स्वीकारत आणि अखंड संघर्षमय जीवन जगत, श्रीगुरु गोविंदसिंहजींनी शौर्य-समन्वयाचा पैतृक, सांप्रदायिक वारसा अधिक तेजस्वी व प्रभावी केला. ‘खालसा’च्या रूपाने आपल्या धर्म-संप्रदायाची पुन्हा मांडणी केली. ‘खालसा’चा अर्थ आहे, तावून-सुलाखून निघालेला अत्यंत शुद्ध शिष्यसमुदाय किंवा शिष्य होय. ‘पंचप्यारें’च्या रूपाने, अर्थात स्वधर्म रक्षणासाठी सर्वार्थाने सिद्ध असलेल्या शिष्यांद्वारा त्यांनी भारतीय धर्मक्षेत्रात शौर्याधारित दीक्षेला प्रारंभ केला.
‘वाहे गुरू का खालसा’, ‘वाहे गुरू की फतेह’ या अभिवादन पद्धतीमुळे, धार्मिकता आणि स्वसंरक्षणाच्या दृष्टीने शीख संप्रदाय वैशिष्ट्यपूर्ण बनला. शाश्वत संघटनेसाठी क्रियाशीलतेबरोबरच विचारांची बैठकही महत्त्वाची असते, हे संघटक श्रीगोविंदसिंहजींमधल्या सर्जनशील साहित्यिकाने ओळखले.
गुरूमुखी, पंजाबी, संस्कृत, अरबी-फारसी, बज्र, राजस्थानी, सधुक्कडी, हिंदी इत्यादी भाषांमधून वाचन, अध्ययन, मनन केलेल्या आणि हिंदू धर्मपरंपरेशी अंतरंग नाते असलेल्या, श्रीगुरू गोविंदसिंहजींनी आपल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत साहित्यनिर्मितीही केली. श्री गोविंदसिंहजी यांनी लिहिलेला शीख परंपरेतला एक पवित्र पद्यग्रंथ म्हणजे, ‘दशम’ ग्रंथ होय. त्याचे चार विभाग आहेत. एक-भारतीय ऐतिहासिक शौर्य कथांवर आधारित ‘चरित्रोपाख्यान.’ दुसरे श्रीमद्भगवतावर आधारित ‘श्रीकृष्णावतार कथा’ ज्यामध्ये “धन्य जीऊ ताको जगमे सुख ते हरी। चितमें जुद्ध विचारे॥” अर्थात “हे भगवान, वाईटाचा प्रतिकार करीत आणि चांगल्याचा विजय व्हावा म्हणून संघर्षशील राहणे, धर्मयुद्ध करणे आणि असे कर्तव्यनिष्ठ जीवन जगताना मुखाने भगवत नामाचा जप सुरू असावा, हीच माझी इच्छा आहे,” अशी भावना श्री गुरुगोविंदसिंहजींनी प्रकट केली आहे.
शूरवीरांना प्रोत्साहन देणारी शस्त्र आणि परमत्त्व यांचा समन्वय साधणारी ‘शस्त्रनाममाला’ आणि विशेष उल्लेखनीय रचना म्हणजे, श्रीगोविंदसिंहजींच्या अक्षय वीरवृत्तीचे आणि सामान्यांबरोबरच बुद्धिमत्तांना सामावून घेणार्या वृत्तीचे दर्शन घडविणारे ‘जफरनामा’ किंवा ‘विजयपत्र’ होय. त्यांनी इ.स.१७०६ मध्ये औरंगजेबाला फारसी भाषेत पाठवलेले वीररसयुक्त आणि औरंगजेबाच्या अन्यायी जुलमी सत्तेचे दर्शन घडविणारे पत्र म्हणजेच, ‘जफरनामा’ होय. यामधून श्रीगुरूंच्या व्यक्तिमत्त्वातील आध्यात्मिकता, राजकारणाचा सूक्ष्म अभ्यास व स्वधर्माची आस यांचे प्रेरक दर्शन घडते. पत्राचा प्रारंभ आणि समारोप ईश्वरी स्मरणाने झालेला आहे, म्हणूनच श्रीगुरू गोविंदसिंहजींचा उल्लेख आदराने ‘संत सिपाही’ असाही केला जातो. श्रीगुरुगोविंदसिंहांचा कार्यकाळ अनेक दृष्टीने परीक्षा पाहणारा कालखंड होता. औरंगजेबाने सर्व प्रकारच्या असहिष्णूतेची आणि अत्याचारांची परिसीमा गाठली होती. श्रीगुरुगोविंदसिंहांना आदर्श वाटणार्या छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रात 1680 साली अकाली निधन झाले. ‘भूषण आद्य शिवशाहीर’ कविराय भूषण यांनी म्हटल्याप्रमाणे,
राखी हिंदुवानी, हिंदुवान को तिलक राख्यो ।
अस्मृति पुरान राखे वेद विधी सुनी मै ॥
अशा महापराक्रमी हिंदवी साम्राज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांचा आदर्शदेखील, गुरुगोविंदसिंहासमोर होताच. शिवरायांनी औरंगजेबाला दिलेली शिकस्त १४ वर्षांच्या श्रीगुरूंना माहीत होती. म्हणूनच त्यांचा ‘जफरनामा’ उर्फ ‘विजयपत्र’ अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरते.‘जफरनामा’ हे मूळ फारशीत लिहिलेले एक विस्तृत पत्र आहे. सन १७०६ मध्ये गुरुजींनी ते बादशहा औरंगजेबाकडे पाठवले, त्यावेळी बादशहा दक्षिणेत अहमदनगर-आजच्या अहिल्यादेवीनगर जवळ होता.
हम इह काज जगत मो आए ।
धरम होत गुरुदेव पठाए ॥
जहां तहां तुम धरम बिथारो ।
दुसट दोखीअन पकरि पछारो ॥
याही काज धरा हम जनम ।
समझ लेहू साधू सम मनम ॥
धर्म चलावन संत उबारन ।
अर्थात धर्महितरक्षणाच्या कार्यासाठीच आद्यगुरूंनी आम्हाला या जगात पाठवले आहे. जेथे धर्मावर आघात करण्यात आले, दुष्टदुर्जनांचे अन्याय वाढले, त्या त्या ठिकाणी आम्ही लक्ष घातले. आम्ही आमचे सारे जीवनच या धर्मकारणासाठी खर्च करणार आहोत, याची खात्री समाजातील साधुसंतांनी बाळगावी असे म्हणणार्या श्रीगुरूंनी वैयक्तिक, राजकीय आणि सामाजिक जीवनात औरंगजेबाच्या क्रूरतेचा अनुभव घेतलेला होता. तरीही अत्यंत आवेशात ओजस्वी शब्दात श्री गोविंदसिंहांनी आपला अंतिम विजय घोषित करून, औरंगजेबासारख्या व्यक्ती धर्माच्या विशुद्ध रूपापासून हजारो मैल कशा दूर राहतात हे स्पष्ट केले आहे.
श्रीगुरुजींच्या पत्राचा सारांश असा आहे : जेव्हा सामोपचाराचे सारे प्रयत्न संपतात, न्यायाच्या मार्गात अडसर निर्माण होतो आणि नि:शस्त्र दुर्बलवर जेव्हा जुलूम, अत्याचार केले जातात तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध तलवार उचलणे, युद्ध करणे न्यायोचित ठरते. तुझ्यासारख्या अन्यायी, फरेबी, मक्कार, धूर्त आणि भाऊ-वडिलांचा हत्यारा असलेल्या बादशाहाविरुद्ध मी उभा आहे. ज्या ईश्वराने तुला ‘बादशाह’त दिली. परंतु, त्याचा गैरवापर करीत तू जो अन्याय जुलूम आणि अत्याचार करीत आहेस, ते पाहून त्याच ईश्वराने मला धर्मरक्षणाची आणि सत्याचा ध्वज उभारण्याची प्रेरणा दिली. जो तलवार तीर-कमान, बर्ची-कट्यार आणि युद्धभूमीवर तुफान दौडणार्या घोड्यांचा ईश्वर आहे, त्याच्याच आज्ञेने, त्याच्याच प्रेरणेने मी तुझ्याविरुद्ध उभा आहे. या धर्मयुद्धात मी एकटा आहे. पण, मला त्याची पर्वा नाही. तू जरी माझ्या चार मुलांना ठार मारले असले, तरी मी एकटा तुझा प्रतिकार करायला पुरेसा आहे.
श्रीगुरू गोविंदसिंहजी पुढे असेही लिहितात, “मैं ऐसी आग तेरे पाँव के नीचे रखूंगा, कि पंजाब में उसे बुझाने तथा तुझे पीने के लिये पानी तक नहीं मिलेगा। मैं इस युद्ध के मैदान में अकेला आऊँगा। तुम दो घुडसवार को अपने साथ लेकर आना।” एवढेच नाही तर आजवर भारतावर आक्रमण केलेल्या आक्रमकांचे-सिकंदर, शेरशहा, तैमूर यांचे काय झाले? कहाँ है बाबर? कहाँ है हुमायू? कहाँ है तैमूर? असा प्रश्न विचारत, या लोकांचे नामोनिशान आज दिसतही नाही या सत्याची ते जाणीव करून देतात. ते पुढे लिहितात, “अगर तू कमजोरों पर जुल्म करता हैं, उन्हें सताता है, तो कसम है कि, एक दिन आरे से चिरवा दूँगा।” हे पत्र वाचल्यावर महाराष्ट्रात असलेल्या औरंगजेबाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी. बादशहाच्या विशाल सामर्थ्याची, त्याच्या अफाट सैन्यदलाची गुरू श्रीगोविंदसिंहांना अजिबात भीती नाही. त्यांच्या मते, “ज्यांची ईश्वरावर दृढ श्रद्धा असते, त्याचा बालही बाका होत नाही.” याच पत्रात त्यांनी औरंगजेबाची विश्वासघातकी वृत्ती स्पष्ट केली आहे. ते सांगतात,
“मरा इअतबारे बरी कसम नेसत।
कि एजद गवाहसतु यजदाँ यकेसत ॥”
अर्थात तुझी माझी चर्चा होऊ नये ईश्वर एकच आहे, असे आपण म्हटले होते. मात्र, तुझे वागणे पाहता या म्हणण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्या शब्दावर माझा विश्वास नाही. तुझा संदेश घेऊन येणारे तुझे दिवाण अधिकारी आणि इतरही जे कोणी असतील, ते एक जात सगळे खोटे बोलणारे होते. अगदी कुराणाची शपथ घेऊन जरी तू काही म्हणालास, तरी त्यावर विश्वास ठेवणारा अखेर शर्मिंदा होऊन जावा, असा तुझा लौकिक आहे. बादशहाच्या या स्वभावामुळेच “चुकार आज हमा हीलते दर गुज इतर। हलालस्त बुर्दन व शमशीरे दस्त॥” अर्थात, जेव्हा शांततामय मार्गाचे सगळेच उपाय अयशस्वी होऊन जातात, तेव्हा खड्ग हाती धारण करणे आणि न्यायासाठी लढा देणे हे धर्माला सोडून मुळीच नाही.प्रत्येक माणसाने सत्यप्रतिज्ञा असायला हवे आणि जो शब्द दिला जातो तो पाळला पाहिजे. मनात एक आणि ओठात एक असे वागणारा माणूस, विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नव्हे. “हे औरंगजेबाच्या निमित्ताने श्रीगुरु गोविंदसिंहजी सत्यप्रिय भारतीय संस्कृतीत पुन्हा एकदा अधोरेखित करतात.
हे विजयपत्र गुरूगोविंदसिंहजींच्या व्यक्तिमत्त्वातील अध्यात्म शक्ती आणि शस्त्रशक्ती यांच्या संबंधाचे समन्वयाचे दर्शन घडविणारे आहे. शीख संप्रदायाचे मराठी अभ्यास डॉ. अशोक कामत यांच्या शब्दात सांगायचे, तर गुरूगोविंदसिंहजी यांनी औरंगजेबाच्या सुलतानी वर्तनाला बाणेदारपणे उत्तर दिले. त्यांनी शस्त्र हाती घेतले आणि शीख समाजालाही घ्यायला लावले. पण, अध्यात्मशास्त्रही त्यांनी महत्त्वाचे मानले. लौकिक सुखवैभवाबद्दल त्यांना कधी आकर्षण वाटले नाही, ते त्यांनी मिळविले नाहीच. उलट भयंकर प्रसंग गुदरले, आप्तस्वकीयांना डोळ्यांदेखत हकनाक मरताना त्यांना पाहावे लागले. पण, त्यांची मन:शक्ती आणि शांती तसूभरही कमी झाली नाही. त्यांनी घोषणाच दिली होती,
“धन जीवू निहाका, जगमयी।
मुखते हरि, चित्तमयी जुद्द विचारे॥
अर्थात ज्याच्या मुखी हरीचे नाम नित्य आहे आणि चित्तामध्ये अन्याय आणि अनीतीविरुद्ध पुकारलेल्या युद्धसंघर्षात विजयी होण्याचे विचार आहेत, तो जीवनात धन्य झाला असे मी मानतो. जीवनात अशी धन्यता प्राप्त करून घेण्याची शक्ती श्रीगुरूगोविंदसिंहजींनी द्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
डॉ. श्यामा घोणसे
(लेखिका संत नामदेव अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रमुख प्राध्यापिका आहेत.)