मुंबई (अक्षय मांडवकर) - 'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) आणि 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण' विभागाच्या माध्यमातून कोकणात सागरी कासवांच्या
'फ्लिपर टॅगिंग' प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे (sea turtle flipper tagging)
. गुरुवार दि. ३० जानेवारी आणि शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या एकूण २० मादी कासवांना 'फ्लिपर टॅग' लावण्यात आले (sea turtle flipper tagging)
. यामुळे कोकणात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यास मदत मिळणार आहे. (sea turtle flipper tagging)
सागरी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ने 'डब्लूआयआय'च्या मदतीने २०२१-२२ साली एकूण सात कासवांवर 'सॅटलाईट टॅग' बसविले होते. मात्र, काही महिन्यांमध्येच ते अकार्यान्वित झाले. याच पार्श्वभूमीवर कासवाच्या कवचावर 'सॅटलाईट टॅग' न बसवता त्यांच्या फ्लिपरवर म्हणजे परांवर सांकेतिक धातूची पट्टी बसविण्यात येणार असल्याचे वृत्त दै. 'मुंबई तरुण भारत'ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. संशोधनाच्या शास्त्रीय भाषेत याला 'फ्लिपर टॅगिंग' म्हटले जाते. या कामाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर एकूण सात माद्या अंडी घालण्यासाठी आल्या होत्या. त्यामधील तीन माद्या या अंडी न घालता परतल्या. बाग गुहागर, बाजारपेठ पोलीस चौकी आणि वरचा पाट येथील खरे गल्ली येथील किनाऱ्यावर अंडी घातलेल्या चार मादी कासवांना 'डब्लूआयआय' आणि 'कांदळवन प्रतिष्ठान'च्या तज्ज्ञांकडून फ्लिपर टॅग लावण्यात आले. तर शुक्रवारी अंडी घालण्यासाठी आलेल्या १६ माद्यांना टॅग लावण्यात आले. वाळूत खड्डा करुन अंडी घालतेवेळी मादी कासवांची शुद्ध हरपते. अशावेळी त्यांना टॅग लावलेले समजत नाही म्हणून त्या अंडी घालण्याची वाट बघण्यात येते आणि त्यानंतर अंडी घालतानाच त्यांना टॅग लावण्यात येतात.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (एमओईएफ) मंत्रालयाच्या 'व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास' (आयडीडब्लूएच) या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभर सागरी कासवांच्या संख्येच्या अंदाज घेण्यात येणार आहे. 'राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा, २०२१-२६' या आरखड्यातील तरतूदींनुसार 'डब्लूडब्लूआय'मार्फत भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येणार आहे. या गणनेचा एक भाग म्हणून हे 'फ्लिपर टॅगिंग' करण्यास सुरुवात केली आहे. कासवांना जर 'फ्लिपर टॅग' लावल्यास ते कासव कितीही वर्षानंतर पुन्हा किनाऱ्यावर आल्यास टॅगवरील क्रमांकानुसार त्याची सविस्तर माहिती मिळते. गुहागरमधील चार कासवांच्या पुढच्या प्रत्येकी दोन परांवर 11101-11102, 11103-11104, 11105-11106 आणि 11107-11108 या सांकेतिक क्रमाकांचे टॅग लावण्यात आले आहेत. गुहागरमध्ये पार पडलेले 'फ्लिपर टॅगिंग'चे हे काम कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये, सहा. उपजीविका तज्ज्ञ अभिनय केळस्कर, प्रकल्प समन्वयक रोहित बिरजे, सह्याद्री संकल्प सोसायटीचे अध्यक्ष भाऊ काटदरे, सागर रेडीच, वनसंरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, गुहागरचे बीच मॅनेजर संजय भोसले, विक्रांत सांगळे, रवींद्र बागकर, कुसमाकर बागकर, शार्दुल तोडणकर, आकाश जांगळी, दिलीप सांगळे आणि डब्लूआयआयच्या सहा. संशोधक निधी म्हात्रे यांनी केले.
सिंधुदुर्गात वायंगणीमध्ये होणार टॅगिंग
सागरी कासवांना 'फ्लिपर टॅग' लावण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) यांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात टॅगिंग संदर्भातील कार्यशाळा घेतली. त्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. रत्नागिरीतील वेळास, आंजर्ले, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वायंगणी-वेंगुर्ला येथे अंडी घालण्यासाठी येणाऱ्या अधिकाधिक कासवांना 'फ्लिपर टॅग' लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. - कांचन पवार, विभागीय वन अधिकारी - कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण