मेरा देश बदल रहा हैं।

    25-Jan-2025   
Total Views |

Republic Day
 
संविधानाच्या पहिल्या पानावरील पहिले वाक्य, ‘आम्ही भारताचे लोक.’ ही भारताचे लोक असल्याची भावना भारतीयांमध्ये खर्‍या अर्थाने जागृत होताना आज दिसते. वरवर सामान्य वाटणार्‍या घटना, पण त्या घटनातून भारतीय माणूस संविधान जगतो. हक्कासोबतच संविधानाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वेही कसोशीने पाळतो, हे दिसून येते. त्या अनेक घटनांपैकी काही लक्षवेधी घटनांचा मागोवा या लेखात घेतला आहे. आज, दि. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिमान वाटतो की, ‘मेरा देश बदल रहा हैं।’
 
नुकतीच प. बंगालच्या सुकदेबपुर या सीमा भागातील गावात एक घटना घडली. बांगलादेशामध्ये सर्वत्र अराजकता माजलेली. या संधीचा फायदा घेत बांगलादेशातील हिंसक कट्टरपंथीदेखील भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू लागले. घुसखोरीला आळा बसावा म्हणून ‘भारतीय सीमासुरक्षा बला’ने भारत-बांगलादेश सीमा बंद करण्यासाठी उपाययोजना करू लागले. ‘भारतीय सीमासुरक्षा बल’ भारतीय हद्दीत काम करत असतानाही पलीकडून ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’चे गार्ड भारतीय जवानाशी वाद घालू लागले. भारतीय जवानांनी काम थांबवावे, यासाठी अडथळा आणू लागले. आतापर्यंत असे दृश्य असायचे की, सीमा भागात काहीही ताणतणाव असला, तर दोन्ही बाजूचे सैनिक याबाबत कार्यवाही करायचे. पण, या घटनेबाबत सुकदेबपूरच्या गावकर्‍यांना कळले.
 
मग गावकरी ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम् ’ असा जयघोष करत आबालवृद्ध पुरूष आयाबाया मिळेल ते हातात घेऊन धावू लागले. कुणाच्या हातात दगड, कुणाच्या हातात कोयता, कुणाच्या हातात बांबू, तर कुणाच्या हातात नुसतीच झाडाची वाळलेली फांदी आणि झाडूही. सगळे धावत भारत प. बंगालच्या सीमेवर जमा झाले. भारतीय सुरक्षा रक्षकांनी त्यांचे सीमा बंद करण्याचे काम सुरू ठेवले आणि या हातात कोयता, बांबू, काठी आणि झाडूही घेतलेल्या भारतीय गावकर्‍यांनी बांगलादेशी सुरक्षा गार्डना ‘पळता भुई थोडी’ केली. इतक्या मोठ्या संख्येने गावकरी एकत्र येतील आणि विरोध करतील, असे बांगलादेशच्या सुरक्षा गार्डना वाटलेच नव्हते. ते त्यासाठी तयारही नव्हते. त्यामुळे बांगलादेशी गार्ड हतबल झाले.
 
खरंच माझा देश बदलत आहे आणि देशाचे नागरिकही बदलत आहेत. त्यामुळेच गावातला अठरापगड जातीचा भारतीय नागरिक एकदिलाने बंगालच्या गार्डशी लढायला सिद्ध झाला होता. गावकरी जिवाची पर्वा न करता सीमा भागात गेले. याचाच अर्थ संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांसोबतच संविधानाची मूलभूत कर्तव्येही भारतीय नागरिक पार पाडण्यास सज्ज आहेत, हेच दिसते.
 
असो. संविधानाने आम्हा भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला. कालपर्यंत या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत कन्हैयाकुमार सारखे हातात डफली घेऊन जातपात शोधत समाजविद्वेष पसरवणारे लोक अतिशय विध्वंसक विधाने करायचे. अगदी देशाचे तुकडे व्हावे, ते हिंदूच्या देवाधर्माबद्दल भयंकर घाणेरडे बोलायचे. त्यांना कुणी अडवले, तर त्यांचे एकच पालुपद असायचे, “संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. आम्ही आमच्या मनाला वाटेल ते बोलणार. तो आमचा हक्क आहे.” पण, गेल्याच महिन्यात मुंबईच्या उपनगरामध्ये एक घटना घडली. डिसेंबर महिन्यात एका पादरीने येशू जन्म सोहळा आयोजित करण्याचे ठरवले. बाहेरून फादर येणार होते. हा कार्यक्रम होणार होता हिंदू वस्तीमध्ये. जिथे ना चर्च होते, ना ख्रिश्चन समाजाची वस्ती. परिसरात सगळीकडे बॅनर लागले. त्या बॅनरवर लिहिले होते, “आपले पाप येशूदेव नष्ट करणार. पापमुक्तीसाठी या.” तशा प्रकारची पत्रकेही परिसरात वाटण्यात आली. यावर परिसरातील लोकांनी सर्वानुमताने ठरवले की, “आपण ना ख्रिश्चन आहोत, ना येशूची पूजा करत. मग हा कार्यक्रम कुणासाठी? आणि आपण काय पापी आहोत का? की, हे लोक पापमुक्तीसाठी इथे कार्यक्रम करत आहेत” त्यामुळे कार्यक्रम होऊ नये, यासाठी त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. मात्र, त्यापूर्वीच त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी पोलीस परवानगी घेतली होती. दोन्ही बाजूचा समन्वय म्हणून पोलिसांनी ठरवले की, कार्यक्रम होणार पण, आयोजकांनी कुणाच्याही धार्मिक भावना दुखावतील, असे बोलू नये. कार्यक्रमासाठी परिसराच्या बाहेरचे लोक आले. काही अनुचित घडू नये, म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. व्यासपीठावरचा फादर आणि वक्ते येशूची करुणा वगैरे वगैरे बोलू लागले. शेवटी ते म्हणाले, “पापी लोकांनी केलेल्या पापातून त्यांची सुटका येशूच्या प्रार्थनेने होईल. हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, हम सबका बाप हैं येशू मसाई.” ही घोषणा ऐकल्याबरोबर परिसरातील महिला एकत्रित होत व्यासपीठावर गेल्या म्हणाल्या, “आमच्या नगरात एकही पापी नाही. मग, कोणत्या पापी माणसाच्या मुक्तीसाठी तुम्ही बोलत आहात. तुम्ही ज्याच्या पापमुक्तीसाठी बोलता, तो पापी माणूस कोण आहे. त्या पापी माणसाला समोर आणा. तसेच, तुमचा बाप येशू आहे, हे ठिक आहे. पण, आम्ही हिंदूंचा बापही येशू असे कसे म्हणता? हे समजावून सांगा.” धार्मिक गृहिणी ज्या कधीतरी वस्तीबाहेर जात असतील, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर व्यासपीठावरच्या ख्रिस्ती धर्मगुरूंकडे नव्हते. मग थातूरमातूर कारण देत त्या आयोजकांना त्या वस्तीतून गाशा गुंडाळला. हिंदू झोपला आहे. त्याला काही पडलेले नाही, असे सातत्याने ऐकायला येते. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग असाही करता येतो, हे या मुंबई उपनगरातल्या आयाबायांनी दाखवून दिले. आपण कोण आहोत, आपला धर्म कोणता, आपण कुणाच्याही मतांतरणाला अजिबात बळी पडायचे नाही, ही जागृकता त्यांच्यात आली आहे. खरेच माझा समाज आणि देश बदलत आहे.
 
आणखीन एक घटना आहे छत्तीसगढची. तिथे ‘अखिल भारतीय घरवापसी’चे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जूदेव यांनी धर्मांतरित झालेल्या 600च्या वर आदिवासी बंधूभगिनींचे पाय धुवून परत स्वधर्मात आणत आहेत. याबद्दल ‘छत्तीसगढ इसाई फोरम’ने जाहीरपणे, म्हटले की, “पाय धुवून कुणाचा धर्म बदलतो का?” यावर घरवापसी अभियानवाल्यांनी प्रश्न उपस्थित केला, “हजारो आदिवासी फक्त चर्चमधले पाणी पिऊन किंवा पाण्यात फादरसमोर डुबकी मारून ख्रिश्नन झाले. एक घोट पाणी पिऊन आदिवासी बांधवांचा धर्म कसा बदलला?” ‘इसाई फोरम’कडे यावर उत्तरच नव्हते. कारण, त्यांना जशास तसे उत्तर मिळाले. खोट्या आश्वासनाला न भुलता सत्य काय आहे, ते जाणून पुन्हा स्वधर्म स्वीकारण्याचा पायंडा आता छत्तीसगढमध्ये सुरू झाला. खरंच देशातली साधीभोळी माणसे आता खर्‍या अर्थाने हुशार बनत आहेत. ‘मेरा देश बदल रहा हैं।’ या अनुषंगाने छत्तीसगढची तीसुद्धा घटना सध्या गाजते आहे. सुभाष बघेल यांच्या आजोबांनी खिश्नन धर्म स्वीकारला होता. त्यानंतर गावात या कुटुंबानी ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कामही सुरू केले. आपल्याला काय करायचे, असे म्हणत गाववाले गप्प बसले. सुभाष यांचे नातेवाईक वारले असता, त्यांचा मृतदेह गावातल्या स्मशानभूमीतच दफन करण्यास गावकर्‍यांनी संमतीही दिली होती. काही दिवसांपूर्वी सुभाष याचा मृत्यू झाला. वास्तविक ख्रिश्ननांसाठी गावाबाहेर स्मशानभूमी होती. मात्र, सुभाष यांच्या मुलाने रमेश याने मृतदेह गावातल्या हिंदू आदिवासी स्मशानभूमीत आणला. गावकर्‍यांना याबाबत काही आक्षेप नव्हता. मात्र, रमेश म्हणाला की, “माझ्या पित्याचे अंतिम संस्कार हे या हिंदू स्मशानभूमीमध्ये ख्रिश्चन रितीनुसारच करणार.” गावातल्या लोकांनी त्याला समजावले, “ख्रिश्चनांसाठी वेगळी स्मशानभूमी असताना तुला हिंदू स्मशानभूमीतच वडिलांचे अंत्यसंस्कार का करायचे आहेत.” पण, रमेशने ऐकले नाही. आदिवासी हिंदू नसतात आणि आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तरी ते धर्मांतरित आदिवासी म्हणूनही आदिवासींचे हक्क लाभ मिळवू शकतात. हे दर्शवण्यासाठीचा त्याचा हा हट्ट होता, हे गावकर्‍यांच्या लक्षात आले. गावकर्‍यांनी निर्णय घेतला की, “हिंदू आदिवासी म्हणून आपल्याही काही पद्धती आहेत आणि स्मशानासंदर्भातही काही परंपरा आहेत. त्या त्या स्थानाचे परंपरेने महत्त्व असते. आपल्या हिंदू स्मशानभूमीत आपल्या श्रद्धांचे पालन करणे, हा आपला हक्क आहे. त्या हक्काला रमेश बाधा आणत आहे. त्यामुळे सुभाष यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार ख्रिश्चन पद्धतीने करायचे, तर ते ख्रिश्चन स्मशानभूमीतच करावे. आमच्या हिंदू स्मशानभूमीत नाही.” मात्र, रमेशच्या सोबतीला संपूर्ण चर्चसंस्था धावून आली. त्यामुळेच गावकरी गावच्या हिंदू स्मशानभूमीत सुभाष यांच्यावर अंत्यसंस्कार करू देत नाहीत, असे म्हणत रमेश याने छत्तीसगढच्या उच्च न्यायालयामध्ये गावकर्‍यांविरोधात याचिका दाखल केली. ‘हिंदू स्मशानभूमीत सुभाष यांचे अंत्यसंस्कार ख्रिश्चन पद्धतीने करून देणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणार नाही,’ असे म्हणत रमेशने त्याच्या पित्याचा देह 12 दिवस मोर्चरीमध्येच ठेवला. यावर उच्च न्यायालयाने सांगोपांग विचार करून निर्णय दिला. निर्णय ऐकून रमेश याला झटका बसला. कारण, ज्या धर्मावर श्रद्धा आहे, त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे,’ असे मत मांडत त्याने हिंदू स्मशानभूमीत ख्रिश्चन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा हट्ट केला होता. संविधानाने दिलेल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार वापरतो, असे म्हणणार्‍या रमेश याला न्यायालयाने धर्मश्रद्धा जपण्याच्या अधिकाराचा वापर करतच निर्णय दिला की, “हिंदू स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, हा हिंदूंचा धर्म आणि श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धा जपण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळे रमेश यांनी सुभाष यांचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन परंपरेने गावाबाहरेच्या ख्रिश्चन स्मशानभूमीत करावा.” आता रमेशने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, संपूर्ण गावाचे प्रशासन, कायदा-सुव्यवस्था सगळे गाववाल्यांसोबत आहेत. ते म्हणतात “हिंदूंनाही स्वत:चे धार्मिक स्वातंत्र्य, श्रद्धा जपण्याचा आणि संवर्धित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हिंदू त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्थळी हिंदू परंपरेने धर्मसंस्कार जपू शकतात. त्यांच्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्थळी कुणीही त्यांच्या श्रद्धेविपरीत काहीही करू नये. यावरून वाटते की, देशातल्या हिंदूंना त्यांच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीयसह सीमा सुरक्षेचे भान आले आहे. खरंच माझा देश बदलला आहे!
 
आणि शेवटी घटना आहे मराठवाड्यातली. एक हिंदू अल्पवयीन मुलगी मुस्लीम माणसासोबत मराठवाड्यात पळून गेली. जाताना घरातले दागदागिने घेऊन गेली. अर्थात, त्या इसमाला तिचे दागिने हवे होते. त्या पैशावर त्याला चैन करायची होती. त्याने त्या मुलीला सांगितले की, परमुलखात राहायचे, तर पैसे पाहिजे आणि त्याच्याकडे पैसे नाहीत. तो तिला म्हणाला की, दागिने विकून त्या पैशावर इथे सुखात राहू. त्याच्या आहारी गेलेल्या मुलीला घेऊन तो सोनाराच्या पेढीवर गेला. सोनाराने त्या दोघांना पाहिले. टोपी घातलेला दाढीधारी माणूस आणि ती लहानशी मुलगी. त्या मुलीने सोनाराला दागिने दिले. दागिने पाहून सोनाराने ओळखले की, हे तर हिंदू पद्धतीचे दागिने आहेत. त्याने त्या दोघांना विचारले, दागिने खरेदीची पावती मिळाल्याशिवाय हे दागिने खरेदी करता येणार नाही. कशावरून हे दागिने तुमचेच आहेत? त्यावर ती मुलगी म्हणाली की, “ती हिंदू आहे. पण, ती त्याची बेगम आहे आणि ते तिचेच दागिने आहेत.” सोनाराने अंदाज बांधला की, ही अल्पवयीन मुलगी ‘लव्ह जिहाद’चा शिकार झाली आहे. त्याने त्या दोघांना थांबायला सांगितले. बाहेर येऊन त्याने तत्काळ पोलिसांशी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी संपर्क केला. पोलीस आणि कार्यकर्ते दोघेही काही मिनिटांत तिथे हजर झाले. त्या मुलीची चौकशी आणि समुपदेशन करून तिला तिच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले, तर त्या इसमाचे पुढे काय झाले हे सांगायला हवे का? पण, मुलीची इज्जत म्हणून या प्रकरणाचा गवगवा करण्यात आला नाही. या घटनेतूनही दिसते की, स्वधर्मासाठी समाजसुरक्षेसाठी गावपातळीवरही समाज सिद्ध झाला आहे. खरंच माझा देश बदलला आहे.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.