
तीन लाख कोटी, सगळ्यांच्या डोयात हाच आकडा घुमत होता. गेल्या आठवड्यात आदित्यने आपल्या रविवारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेला येणाऱ्या सगळ्यांना एक बातमी व्हॉट्सअॅपवर पाठवली होती. ‘परप्लेसिटी’ नावाच्या तीन वर्षे जुन्या कंपनीने, गूगलचे ‘क्रोम’ हे तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्स म्हणजे तीन लाख कोटी रुपयांची बोली लावली होती. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका कंपनीने, तंत्रज्ञान क्षेत्रातील एका महारथी कंपनीला दिलेले हे आव्हान सगळ्यांना विचार करायला लावणारे होते. आदित्य काय आहे रे हे ‘परप्लेसिटी?’ नक्की कशामुळे त्याची एवढी हवा आहे?‘परप्लेसिटी’ची स्थापना २०२२ साली झाली. तिचा संस्थापक अरविंद श्रीनिवासन हा भारतीय मूळ असलेला तरुण आहे. त्याचे वय अवघे ३१ वर्षे आहे. त्याची कहाणी खूपच उद्बोधक आहे. अरविंद श्रीनिवासन यांनी ‘आयआयटी’ मद्रासमध्ये शिक्षण घेतले. नंतर स्टॅनफर्डसारख्या अमेरिकन संस्थांमध्ये उच्च शिक्षणही पूर्ण केले. गूगलमध्ये काम आणि ‘एआय’वरील संशोधन याचा अनुभव घेतल्यावर, त्यांनी २०२२ साली ‘परप्लेसिटी’ची स्थापना केली.
पण, एवढ्या मोठ्या गूगल, ‘मायक्रोसॉफ्ट ओपन एआय’ यांच्यात ‘परप्लेसिटी’ आपली ओळख कशी बनवते आहे? माधवकाका म्हणाले. निवृत्त प्राध्यापक असलेल्या माधवकाकांना, तंत्रज्ञानातील प्रत्येक गोष्टीबाबत खूप कुतूहल असते.
त्याचे उत्तर म्हणजे सोपेपणा आणि तंत्रज्ञानातील नावीन्य. ‘परप्लेसिटी’ हे एआयचालित सर्च इंजिन आहे. ते विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देते. पण, लगेच स्रोतही दाखवते. त्यामुळे वापरकर्त्याला वेळ वाचतो आणि उत्तर विश्वासार्ह वाटते.
‘परप्लेसिटी’ ही गूगल आणि ‘चॅटजीपीटी’ यांच्यातली एक नवी वाट आहे. ‘परप्लेसिटी’ कसे काम करते?
१. वापरकर्त्याचा प्रश्न एलएलएम (लार्ज लॅन्गवेज मॉडेल) नीट समजून घेतो.
२. इंटरनेटवरून ताजे आणि विश्वासार्ह स्रोत शोधले जातात.
३. मिळालेल्या माहितीचा लहानसा सारांश तयार केला जातो.
४. प्रत्येक उत्तरासोबत संदर्भ दाखवले जातात.
उदाहरणार्थ तुम्ही विचारले आहे की, भारतातील सौरऊर्जा प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? तर गूगलमध्ये दहा पाने वाचावी लागतील. पण, ‘परप्लेसिटी’ काही सेकंदांतच इंटरनेटवरील माहितीचा सारांश करून उत्तर देईल आणि सरकारी रिपोर्ट, बातमी लेख यांचे स्रोतही दाखवेल.
कॉमेट - एक क्रांतिकारी कल्पना
२०२४ साली ‘परप्लेसिटी’ने ‘कॉमेट’ नावाचे एक तंत्रज्ञान जाहीर केले. कॉमेट हे गूगलच्या ‘क्रोम’सारखे ब्राऊझर आहे. ‘कॉमेट’ हे फक्त माहिती देत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवते. इंटरनेटवरून माहिती शोधणे, वेब अॅप्सवर फॉर्म भरून देणे, बुकिंग करणे अशा प्रकारच्या सेवा ‘कॉमेट’ देतो.
आता आपण ‘कॉमेट’च्या क्षमतेचे एक उदाहरण पाहू. समजा तुम्हाला मुंबईहून दिल्लीला कामासाठी जायचे आहे, तर तुम्ही ‘कॉमेट’ला सूचना देऊन ठेवा. ‘कॉमेट, माझ्यासाठी उद्या दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ५ ते ७ या वेळेतील मुंबई ते दिल्ली प्रवासाचे सगळ्यात स्वस्त तिकीट काढ.’ नंतर त्या विमानाच्या पोहोचण्याच्या वेळेप्रमाणे, ‘मला दिल्ली विमानतळाहून एक टॅसी बुक कर. नवी दिल्लीमध्ये मला दोन दिवसांसाठी एक हॉटेलची खोली बुक कर. हे सर्व झाल्यावर ईमेलने माझ्या दिल्लीतील सहकार्याला ही सगळी माहिती कळव.’ ‘कॉमेट ब्राऊझर’ ही सगळी कामे करून तुम्हाला त्याचा अहवाल देतो. माहिती शोधणे, वेगवेगळ्या वेबसाईटवर कामे पार पाडणे आणि शेवटी अहवाल देणे, अशी कामे ‘कॉमेट’ करू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सध्या ‘एजेंटिक एआय’ नावाची संकल्पना अक्षरशः धुमाकूळ घालते आहे. मानवी एजन्टप्रमाणेच हे कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित एजन्ट, वेळप्रसंगी विचार करून निर्णय घेतात आणि वेगवेगळी कामे पार पाडतात. ‘कॉमेट’ने हे ‘एजेंटिक एआय’ तंत्रज्ञान, सर्वसामान्य लोकांना ब्राऊझरच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून दिले आहे.
आदित्यने सांगितलेले उदाहरण ऐकून जयंतराव आणि त्यांच्या मित्रांनी आश्चर्याने डोळे विस्फारले. आयुष्यभर रांगेत थांबून तिकिटे काढणारे हे सगळेजण, गेल्या काही वर्षात गूगल, व्हॉट्सअॅप, मेक माय ट्रीप अशा इंटरनेटवर आधारित तंत्रज्ञानाला थोडेसे सरसावले होते. पण, केवळ एक सूचना देऊन आपली सगळी कामे एजेंटिक ‘एआय’ करू शकतो, हे त्यांच्या अजून पचनी पडत नव्हते.
‘परप्लेसिटी’ शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि दैनंदिन जीवनात, एजेंटिक ‘एआय’च्या साहाय्याने विस्तार करत आहे. भविष्यात गूगलसारख्या कंपन्यांना खर्या अर्थाने आव्हान देणारी, ती पहिलीच ‘एआय’ कंपनी ठरू शकत, त्यामुळे इथेच प्रवेश होतो अमेरिकन भांडवलशाहीचा. २०२४ साली ‘परप्लेसिटी’ने सिरीज सी गुंतवणुकीमध्ये जवळपास ७० कोटी डॉलर्स (५ हजार, ८०० कोटी रुपये) उभे केले. या निधीनंतर कंपनीची किंमत तब्बल तीन अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. गुंतवणूकदारांमध्ये एनव्हीआयडीआयए’ जेफ बेझोस यांच्यासारखी मोठी नावं होती. ‘परप्लेसिटी’चे सध्याचे मूल्यांकन १४ ते १८ अब्ज डॉलर्स (१ लाख, २० हजार कोटी रुपये) असूनही, त्यांनी ‘क्रोम’ला गूगलकडून विकत घेण्यासाठी, ३५ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास तीन लाख कोटी रुपयांची बोली लावली. यातून ‘परप्लेसिटी’चा स्वतःच्या तंत्रज्ञानावर असलेला आत्मविश्वास, त्यांच्या गुंतवणूकदारांचा त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त होतो. आदित्यने सांगितलेले आकडे ऐकून सगळेजण अवाक झाले होते. १०० वर्षांहून जास्त काळ व्यवसायात असणार्या जागतिक स्तरावरील फोर्ड, टाटा किंवा त्याप्रकारच्या कंपन्यांच्या तोडीचे मूल्यांकन, तीन वर्षांपूर्वी एका भारतीय तरुणाने सुरू केलेली कंपनी मिळवते आहे, हेच पचनी पडणे थोडे अवघडच होते.
यातून आपल्याला अनेक धडे शिकायला मिळतात. इतका वेळ केवळ श्रवणभक्ती करणार्या माधवकाकांमधला प्राध्यापक जागा झाला. लिष्ट तंत्रज्ञानही वापरकर्त्यापर्यंत सोपे नेले, तर ते झपाट्याने लोकप्रिय होते. ‘परप्लेसिटी’ने एजेंटिक ‘एआय’सारखे लिष्ट आणि अत्यंत नवीन तंत्रज्ञान, ब्राऊझरच्या स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत, संशोधन आणि नावीन्य यांना खूप महत्त्व असणार आहे.
आजच्या ‘एआय’ क्रांतीत एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. या क्षेत्रातील अनेक प्रमुख संशोधक हे मूळचे संगणकशास्त्रज्ञ नव्हते, तर गणित, भौतिकशास्त्र, न्यूरोसायन्स यांसारख्या मूलभूत विज्ञानांचे अभ्यासक होते. उदाहरणार्थ, डेव्हिड सिल्व्हर हे मूळचे गणिततज्ज्ञ असून, त्यांनी ‘रिइन्फोर्समेंट लर्निंग’मध्ये नवे क्षितिज उघडले. अगदी ‘परप्लेसिटी’सारख्या नव्या कंपन्यांमध्येही, अनेक संशोधक हे गणित किंवा सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत. यामुळे हे स्पष्ट होते की, आजचे ‘एआय’ हे केवळ प्रोग्रॅमिंगवर आधारित नाही, तर मूलभूत विज्ञानातील खोल पायाभूत संशोधन यावरच आधारलेले आहे. भारतातील तरुण संशोधकांनीही अशा मूलभूत विषयात संशोधन केल्यास भविष्यातील तंत्रज्ञान घडवण्यामध्ये ते थेट योगदान देऊ शकतात.
अमेरिकन समाजव्यवस्थेतील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, उद्योजकतेला मिळालेले प्रोत्साहन. लहान वयातच शाळा-महाविद्यालय पातळीवर मुलांना स्टार्टअप्स, हॅकेथॉन यात सहभागी होण्याची संधी मिळते. गुंतवणूकदार नवीन कल्पनांमध्ये मोठी जोखीम पत्करून पैसे गुंतवतात, अपयश आले तरी दुसर्या प्रयत्नाला प्रोत्साहन देतात. म्हणूनच बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, सॅम ऑल्टमन, अरविंद श्रीनिवासन यांसारखे उद्योजक, तरुण वयातच आपली कंपनी उभी करून पुढे नेऊ शकले. ही जोखीम घेण्याची संस्कृती आणि अपयशाला दिलेले सकारात्मक महत्त्व, ही अमेरिकेच्या आर्थिक महासत्तास्थानी असल्याची कारणे आहेत. माधवकाकांनी आपले दीर्घ विवेचन संपवले.
आदित्य, समजा आपल्याकडील एखाद्या तरुणाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पुढे काम करायचे असेल, तर काय शिक्षण घेतले पाहिजे, यावर एकदा आपण चर्चा करू. तसेच, हे ‘एजेंटिक एआय’ काय आहे, हे पण आपण एकदा समजून घेऊ. आपण ‘परप्लेसिटी’च्या संदर्भात अमेरिकन अर्थव्यवस्थेची आणि सामाजिक मूल्यांची चर्चा केली. पण, यासंदर्भात भारतात काय परिस्थिती आहे, हे पण एकदा बोलू. जयंतराव म्हणाले.
‘परप्लेसिटी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेतील एका झंझावाताने, पुढच्या काही चर्चांची दिशा ठरवून टाकली!
(डॉ. कुलदीप देशपांडे हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
९९२३४०२००१