
मुंबई : छत्तीसगड मधील पथरिया गावात धर्मांतरणाचा एक प्रकार समोर आला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक १, यदुनानंद नगरमधील एका घरात प्रार्थना सभेद्वारे धर्मांतर केले जात होते. घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत धर्मांतरणाचा डाव हाणून पाडला. परिस्थिती पाहून पोलिसांनी पाद्रीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले.
विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यावर ज्याठिकाणी 'संडे प्रेअर' चालू होती त्या घरी कार्यकर्ते पोहोचले. तिथे सुमारे पन्नास-साठ लोक उपस्थित होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, एका समुदायाचे लोक गरीब हिंदू कुटुंबांना आमिष दाखवून त्यांचे धर्मपरिवर्तन करत होते. पोलिसांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांची विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितले की, ते त्यांचे आजार बरे करण्यासाठी आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाद्रीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक ब्रिजेश शर्मा म्हणाले की, निष्पाप ग्रामस्थांना आमिष दाखवून औषधे पुरवण्याच्या आणि आजार बरे करण्याच्या नावाखाली एका खाजगी घरात प्रार्थना सभा आयोजित केल्या जात होत्या. अशा प्रकारे गेल्या ५-६ वर्षांपासून धर्मांतर केले जात होते. न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही खाजगी घरात प्रार्थना सभा आयोजित करता येत नाहीत. त्याचबरोबर त्यांनी आरोपी पाद्रीच्या बँक खात्याची आणि मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली.