भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक : डॉ. एस. आर. रंगनाथन

    23-Aug-2025
Total Views |

सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षणाचीसुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यासाठी ग्रंथालयांचा विकास, ग्रंथांचा प्रसार होऊन, सर्वसामान्य भारतीयांसाठी ज्ञानाची दारे उघडी ठेवली पाहिजेत. त्यांना वाचन करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार भारतामध्ये डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम रुजविला, जोपासला, वाढविला आणि त्याकरिताच आपले आयुष्यही झिजविले. ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते म्हणून ते ओळखले जातात. नुकतीच त्यांची जयंती झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...

क्षण मिळवणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे हे लक्षात येताच, डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी अध्यापन शास्त्राची ‘एलटी’ ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि ‘ग्रंथपाल’ म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम करण्यास सुरुवात करून, ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले. रंगनाथन ’युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन’ येथे ग्रंथालय शास्त्राच्या प्रशिक्षणास गेले असता, ‘ग्रंथालय शास्त्रातील वर्गीकरण’ या विषयाचे प्राध्यापक बर्विक सेयर्स यांची त्यांच्याशी भेट झाली. प्राध्यापक बर्विक सेयर्स यांनी डॉ. रंगनाथन यांना लंडनमधील ग्रंथालयांना भेटी देऊन, तेथील ग्रंथालयांचे कामकाज व व्यवस्थापन समजून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रंगनाथन यांनी लंडन येथील विविध ग्रंथालयांना भेटी देऊन, ग्रंथालयाचे कामकाज व व्यवस्थापन समजून घेतले. एक वर्षाचा लंडन विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण करून, ‘भारतात अशा ग्रंथालयांची गरज असून सर्वांसाठी ज्ञानाची दारे खुली केली पाहिजेत’ असा निर्धार करूनच ते मायदेशी परतले.

सार्वजनिक ग्रंथालयांची गरज ओळखून दि. ३० जानेवारी १९२८ रोजी ‘मद्रास ग्रंथालय संघा’ची स्थापना करून, ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची व्यवस्था केली. इथूनच देशात ग्रंथालय शिक्षणाचा पाया घातला गेला. १९३७ साली पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर १९४२ बनारस हिंदू विद्यापीठ, १९४८ दिल्ली विद्यापीठ येथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून, १९५० साली वेगळ्या पद्धतीचा, भारतीय तत्त्वांचा आणि जगाला दिशा देणारा ‘पीएच.डी.’ अभ्यासक्रमही सुरू केला. यामुळे ग्रंथालयशास्त्राला जे एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले, त्याचे श्रेय डॉ. रंगनाथन यांना जाते. ते ऋषीसारखे जीवन जगत राहिले. जमिनीवर बसून वाचणे, लिहिणे, चटईवर झोपणे, उशीऐवजी पाट घेणे आणि त्या पाटाचाच उपयोग लेखनासाठी ते करत. पूर्ण शाकाहारी, एक वेळचे जेवण असे आगळेवेगळे पण कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्त्व डॉ.रंगनाथन यांचे होते. डॉ. रंगनाथन यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. १९३५ साली ब्रिटिश सरकारने ‘रावसाहेब’ किताब बहाल केला, तर १९४८ मध्ये दिल्ली विद्यापीठाने ग्रंथालय शास्त्रातील कामगिरीबद्दल त्यांना ‘डी.लिट.’ पदवी दिली. १९५७ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा बहुमान बहाल केला. १९६४ मध्ये भारत सरकारने ‘नॅशनल रिसर्च प्रोफेसर ऑफ लायब्ररी सायन्स’ हे मानाचे पद दिले. १९७० मध्ये अमेरिकेने लायब्ररी असोसिएशन चेन्नई ‘मार्गारिट मॅन’ हे सन्मानपत्र दिले. १९६४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गतर्फे ‘डी.लिट’ पदवी बहाल करण्यात आली. डॉ. रंगनाथन यांना जेवढी राजमान्यता, लोकप्रियता मिळाली, तेवढी जगातील कोणत्याच ग्रंथपालाला मिळाली नाही.

"वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे,” हा विचार डॉ. रंगनाथन यांनीच सर्वप्रथम देशात रुजवला. देशात ग्रंथालयाची चळवळ ही सरकारी अनुदानाशिवाय उभी राहू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात येताच ग्रंथालयविषयक कायदा असावा, ज्यामुळे ग्रंथालयांचे व्यवस्थापन सुलभ आणि सर्वांसाठी खुले होईल असा त्यांनी विचार केला. त्यांनी १९४२ साली ‘ग्रंथालय संघटने’तर्फे देशासाठी आदर्श ग्रंथालय कायद्याचा मसुदा तयार केला आणि मद्रासमध्ये १९४८ साली पहिला ग्रंथालय कायदा लागू करण्यात आला. पुढे प्रत्येक राज्यासाठी ग्रंथालयाचे कायदे तयार करण्यात आले. डॉ.रंगनाथन देश-विदेशांत फक्त ग्रंथालयाच्या व्यवस्थापनासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी झटले. ग्रंथालयशास्त्रावर अमेरिका, आशिया आणि युरोपमध्येही त्यांनी व्याख्याने दिली. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन’, ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवरही त्यांनी गौरवास्पद काम केले.

ग्रंथपालन या विषयासंबंधी ६६ हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली असून, २ हजार, ३००च्या वर लेख लिहिले आहेत. जगभरातील अनेक भाषांमध्ये या लेखांचा अनुवाद झाला आहे. आदर्श ग्रंथालय व ग्रंथपालांची व ग्रंथपालांसाठी उपयोगी माहिती या ग्रंथातून व लेखातून प्रसिद्ध झाली असून, ग्रंथालय शास्त्राचे पाच महत्त्वाचे सिद्धांत अगदी सहज आणि सोप्या भाषेत दिले आहेत. भारतीय ग्रंथालयांची चौकट डॉ. रंगनाथन यांनी दिलेल्या या पाच सिद्धांतांवरच आहे. सर्वसामान्य वाचकांचा विचार करूनच, या सिद्धांतांची मांडणी केली आहे. हे सिद्धांत वरवर पाहता अत्यंत साधे वाटले, तरी त्यामुळे देशातील सार्वजनिक ग्रंथालयांना एकसूत्रता येण्यास मदत झाली. डॉ. रंगनाथन यांना असलेल्या गणिताच्या विशेष ज्ञानाचा वापर ग्रंथालयीन कामकाजात व्हावा, म्हणून त्यांनी पुढे (कोलन वर्गीकरण) द्विबिंदू वर्गीकरण पद्धत अस्तित्वात आणली. त्यामुळे ज्ञानाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विषयांच्या वर्गीकरणाला, एक सोपी पद्धत आत्मसात करून दिली आहे. आधुनिक भारतातील ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील जनतेला ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनीच रुजविला, आणि तो जोपासण्यासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. डॉ. रंगनाथन यांनी मांडलेले ग्रंथालयातील पाच सिद्धांत हे भारतीय ग्रंथालयांचा पाया समजले जातात. डॉ. रंगनाथन यांचा वाढदिवस भारतात दि. १२ ऑगस्ट रोजी ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालय चळवळीला योगदान देणार्या सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल कर्मचार्यांना, त्यांच्या नावे ‘उत्कृष्ट ग्रंथालय सेवक डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथ मित्र पुरस्कार’ देण्यात येतो.

दिलीप नवेले