‘मैं किरदार हूँ…खिलाड़ी कोई और है’; धर्मस्थल प्रकरणातील तक्रारदाराला अटक

    24-Aug-2025
Total Views |

मुंबई
: कर्नाटकातील धर्मस्थल मंदिर बदनामी प्रकरणात आता नविन खुलासे समोर येत आहेत. धर्मस्थळात शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. हा व्यक्ती मंड्या येथील रहिवासी असून, चिन्नैया असे त्याचे नाव आहे. एसआयटीने केलेल्या चौकशीदरम्यान चिन्नैयाने कबूल केले की, पैशाच्या लोभापोटी हे आरोप केले असून स्वतः फक्त एक मोहरा होता खरा कट रचणारे अजूनही पडद्यामागे आहेत.

चौकशीदरम्यान चिन्नैय्याने सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याची तामिळनाडूतील काही लोकांशी ओळख झाली होती. तिथून त्याला या कटात सामील करण्यात आले. या लोकांनी त्याला आश्वासन दिले की जर त्याने धार्मिक स्थळाविरुद्ध वातावरण निर्माण केले तर अधिक तक्रारदार पुढे येतील आणि प्रकरण मोठे होईल. त्याला पैशाचे आमिषही दाखवण्यात आले.

चिन्नैया पुढे म्हणाला की, "पोलिसांनी विचारले तर कसे उत्तर द्यायचे याचे प्रशिक्षण बंगळुरूमध्ये देण्यात आले होते. मला जे बोलायला सांगितले ते मी बोललो आहे. या प्रकरणात खरा सूत्रधार दुसरा कोणीतरी आहे, मी फक्त एक पात्र आहे."

चिन्नैयाला अटक झाल्यानंतर भाविकांनी एसआयटीच्या कारवाईला पाठिंबा देत, या कटामागील सूत्रधाराचाही पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे.