डोनाल्ड ट्रंप ठरले यंदाच्या 'बडग्या'चे मानकरी

    24-Aug-2025
Total Views |

मुंबई
: दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा 'मारबत उत्सव' ही एक जुनी आणि अनोखी सांस्कृतिक परंपरा आहे. नागपूर येथे शनिवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात अमेरिकेविरुद्धचा रोष दिसून आला. यामध्ये बडग्या म्हणजेच कचऱ्यापासून बनवलेले पुतळे असतात. यंदाचा बडग्या म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुतळे फिरवण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी पुतळ्यांवर फलक लिहून अमेरिकेचा निषेध केला.

मारबत उत्सव हा परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य यांचे मिश्रण असतो. या संदेशांमध्ये लिहिले की, "जे लोक कर लादून धमकावतात त्यांना भारताच्या सामर्थ्याची माहीती झाल्यास पश्चाताप होईल". एक संदेश असा होता की, "आपल्या वस्तूंवर शुल्क लादल्याने त्यांचा स्वतःचा व्यापारच उद्ध्वस्त होईल". एका फलकावर असेही लिहिले होते, "अमेरिकन काका भारतावर बंदी घालतात, तरीही रशियन उत्पादने खरेदी करतात".

मारबत उत्सवाविषयी
'संत्र्याचे शहर' म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे त्याच्या सांस्कृतिक परंपरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. या परंपरेपैकी एक म्हणजे मारबत उत्सव. हा उत्सव सुमारे १४९ वर्षांपासून चालत आलेला उत्सव आहे. रंगीबेरंगी मिरवणुका आणि समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध संदेश देण्यासाठी उत्सव ओळखला जातो. या दिवशी हजारो लोक नागपूरच्या रस्त्यांवर जमतात. ही केवळ एक परंपरा नाही तर समाजातील वाईट गोष्टींना आरसा दाखवण्याचा एक अनोखा मार्ग आहे. या दिवशी पिवळा मारबत आणि काळा मारबत तयार केला जातो, काळा मारबत हा वाईट आणि रोगांचे प्रतीक मानला जातो. दुसरीकडे, पिवळा मारबत हा लोकांचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखला जातो. त्यांची मिरवणूक शहराभोवती काढली जाते.