मैदानाची आवड असलेल्या ह्रषीकेशने एक सामान्य विद्यार्थी ते आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू हा प्रवास मोठ्या हिमतीने साध्य केला. ऋषीकेशच्या क्रीडाक्षेत्रातील प्रवासाचा घेतलेला हा आढावा...
देशविदेशातील स्पर्धांमध्ये कित्येक भारतीय खेळाडूंनी आपले प्राविण्य सिद्ध केले आहे. असाच एक खेळाडू म्हणजे हृषीकेश राऊळ! वरळीमध्ये हृषीकेशचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. आई, वडील आणि एक लहान भाऊ असे हृषीकेशचे कुटुंब. हृषीकेशचे वडील हे पेशाने शिक्षक. हृषीकेशच्या वडिलांनी हिंदीमध्ये ‘पंडित’ पदवी मिळवली असूनही, ते शाळेत हिंदीबरोबर खेळ हा विषयही शिकवत होते. खेळाविषयी वडिलांना असणारे प्रेमच हृषीकेशमध्येही उतरले. हृषीकेशच्या शिक्षणाला सुरुवात झाली, ती दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण हृषीकेशने बालमोहन विद्यामंदिरातूनच पूर्ण केले. याचदरम्यान लहानपणापासून खेळाची आवड असणार्या हृषीकेशमधील मुंबईकर जागा झाला आणि त्याने हातात क्रिकेटची बॅट धरत थेट मैदान गाठले. क्रिकेटमधील एकूण स्पर्धा बघता, हृषीकेशच्या घरच्यांचा क्रिकेटला विरोध होता. कारण, मुलांना खेळ शिकवणार्या हृषीकेशच्या वडिलांचे म्हणणे असायचे की, ‘खेळ कोणताही खेळा, मात्र देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगा.’
इयत्ता पाचवीत असताना क्रिकेटसाठी हृषीकेशने पहिल्यांदा मैदानात पाऊल ठेवले. मात्र, त्याची क्रिकेट खेळण्याची हौस अल्पायुषी ठरली. काही काळ मैदानात क्रिकेट खेळल्यावर त्यातील संघर्षाची आणि वडिलांच्या मार्गदर्शनातील सत्याची ओळख त्याला झाली. त्याचवेळी शाळेत जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी नवीन खेळाडूंची निवड चाचणी आयोजित केली होती. क्रिकेटसारखाच हा खेळ असतो, अशी तोंडओळख मिळाल्याने हृषीकेश त्या निवड चाचणीत सहभागी झाला. मात्र, निवडीचे निकष पूर्ण न केल्याने त्याची निवड काही झाली नाही. मग या नवीन समजलेल्या खेळाविषयी हृषीकेशने इंटरनेटवरून माहिती मिळवली. खेळाचे स्वरुप आवडल्याने त्याने पुन्हा थेट मैदान गाठले आणि हा खेळ खेळण्याचा हट्टच शाळेच्या शिक्षकांकडे केला. बालमोहन विद्यामंदिर शाळेतील इखणकर सर आणि सरोदे सर यांनी त्यावेळी हृषीकेशचा हट्ट मान्यदेखील केला. त्यानंतर शाळेच्या संघात प्रवेश मिळाला, अन् सरावही सुरु झाला. क्रिकेटशी साधर्म्य असल्याने हा क्रीडाप्रकार आत्मसात करण्यास हृषीकेशला फार वेळ लागला नाही. अगदी पहिल्याच वर्षात हृषीकेश जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळला. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा व नंतर राष्ट्रीय स्पर्धा असा जणू चढता आलेखच राहिला. 2015 साली हृषीकेश दहावी होईपर्यंत जवळपास प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाला. हे सगळे सहज वाटत असले तरी, यामागे हृषीकेशची तपोसाधना मोठी आहे.
पुढील शिक्षणासाठी हृषीकेशने मुंबईतील रिझवी महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावी होईपर्यंत सीमित अवकाशात खेळणार्या हृषीकेशसाठी, पदवीच्या पहिल्या वर्षातच आसमंत खुला झाला होता. मात्र, त्याचवेळी आव्हानदेखील वाढले होते. पदवीच्या पहिल्या वर्षातही आपला आलेख चढता ठेवत हृषीकेशने राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. मात्र, त्यावेळी स्पर्धेच्या ठिकाणी संघाबरोबर असलेल्या प्रशिक्षकांनी संघातील खेळाडूंना शारीरिक क्षमतेविषयी अधिकाराने सुनावले. भविष्यात वाढणारी स्पर्धा लक्षात घेऊन स्वतःच्या शारीरिक क्षमतांचा विकास करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशिक्षकांनी त्यावेळी केल्या. आजवर किरकोळ अंगकाठी असणार्या हृषीकेशने त्यावर लगेचच अंमलबजावणी करत आवश्यक आहार आणि व्यायामाला सुरुवात केली. त्याचे फळ त्याला दिसू लागले. या सगळ्यामु़ळे हृषीकेशच्या शारीरिक क्षमतेत कमालीची वाढ झाली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य, राष्ट्रीय स्पर्धा असा प्रवास हृषीकेशचा सुरु राहिला. दीर्घकाळ राष्ट्रीय स्पर्धांना जाऊन परत आल्यानंतर, अखेर हृषीकेशची इतक्या वर्षांची तपश्चर्या फळास आली. अखेरीस आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे दरवाजे हृषीकेशसाठी उघडले.
2019 साली श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात हृषीकेश सहभागी झाला आणि त्याच्या वडिलांचे स्वप्नदेखील पूर्ण केले. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना, हृषीकेशने कांस्य पदक पटकावले. त्यानंतर पाकिस्तानातही आंतराष्ट्रीय स्पर्धेत हृषीकेशने सहभाग घेतला. आता आपल्या कारकिर्दीतील तिसर्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी हृषीकेश करत आहेत. मात्र, हे करताना हा खेळ, त्यातील पद्धती स्वतःपुरत्या मर्यादित न राहाता, त्या सहजतेने पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्या, यासाठी क्रीडाप्रशिक्षक म्हणूनदेखील हृषीकेश कार्यरत आहेत. हृषीकेशच्या सर्वच प्रशिक्षकांनी त्याला सकारात्म्क विचाराने खेळण्याचे संस्कार दिले. हेच संस्कार पुढच्या पिढीला देण्यासाठीच क्रीडाप्रशिक्षकाचे रीतसर शिक्षण हृषीकेशने घेतले. भविष्यात माझ्याकडे शिकणार्या प्रत्येक खेळाडूने देशासाठी खेळताना पदक जिंकले पाहिजे, असा हृषीकेशचा कायमच आग्रह असतो. क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणारा हृषीकेश सध्या स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने देशसेवा करण्याचे स्वप्न पाहात आहे. त्याची ही स्वप्ने लवकर पूर्ण होवो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!