मुंबई : व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनने स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर आधारित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे प्रकाशन स्वामीजींच्या जन्मदिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथील ‘स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ’ येथे होणार आहे. हा कार्यक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि स्वामीजींच्या चरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. हे संकेतस्थळ हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक गिरीश घाटे यांनी तयार केले आहे.
व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन ही संस्था ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित संकलित करत आहे. रामानंद तीर्थ यांच्यावरील संकेत स्थळाची निर्मिती हा व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘महाभूषण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. इंटरनेटच्या या बदलत्या युगात त्या असामान्य जन्मशताब्दी-वीरांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश पडणारी संकेतस्थळे तयार करण्याचा प्रकल्प फाउंडेशनने हाती घेतला आहे. फाउंडेशनने तीनशेहून अधिक अशा असामान्य व्यक्तींची यादी केली आहे. डिसेंबरपर्यंत आणखी तीन संकेतस्थळे तयार करण्याचा बेत आहे.