मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, अदाणी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रणव अदाणी हे उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले.
१४२ एकर जागेवरील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतीची व्याप्ती लक्षात घेता कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट पद्धतीने राबविण्यात येणारा देशातील पुनर्विकासाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे 'म्हाडा'तर्फे येथील रहिवाशांना १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेमध्ये मोफत पुनर्वसन होणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला ०३ लाख ९७ हजार १०० चौरस मीटर क्षेत्र विकासकाकडून बांधून मिळणार आहे. बांधकाम व विकास संस्थेमार्फत मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्याची परवानगी म्हाडाला शासनाकडून प्राप्त झाली. राज्य शासनाने या प्रकल्पाला 'विशेष प्रकल्प' म्हणून मान्यता देऊन म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे हा प्रकल्प राबविण्याचे शासन निर्णयाद्वारे निर्देशित केले. मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला कन्स्ट्रकशन अँड डेवलपमेंट (C&D) एजन्सीच्या माध्यमातून हा पुनर्विकास करायला परवानगी दिली. त्यानंतर मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकासासाठी मुंबई मंडळातर्फे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आली. ही निविदा अदानी समूहाला मिळाली आहे.
१५ मिनिटांचे शहर !
मोतीलाल नगर १,२ व ३ मध्ये ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन साधारणपणे ०५ लाख ८४ हजार १०० चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अनिवासी गाळेधारकांना ९८७ चौरस मीटर चौरस फुटांचे व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हा देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असून '१५ मिनिटांचे शहर' या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेद्वारे या प्रकल्पातील घरांपासून कार्यालय, सार्वजनिक परिवहन सेवा, मेट्रो स्टेशन, उद्यान, मनोरंजन ठिकाण, शाळा, हॉस्पिटल १५ मिनिटांच्या अंतरावर असणार आहे. पाच एकरचे मध्यवर्ती उद्यान हे या प्रकल्पातील वैशिष्ट्य आहे.
जगविख्यात कंपन्यांनी बनवला आराखडा
अदाणी समूहाने मोतीलालनगरचा आराखडा बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत घेतली आहे. मॅकेनो या नेदरलँडस्थित जगतविख्यात आर्किटेक्चर फर्मने मोतीलाल नगरचा बृहत आराखडा तयार केला आहे. ब्युरो हॅप्पोल्ड ही पायाभूत सुविधा क्षेत्रांतील लंडनस्थित सल्लागार सेवा देणारी संस्था असून या संस्थेने मोतीलाल नगरचा पायाभूत सुविधांचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पातील पुनर्वसन निवासी सदनिकांच्या इमारतींवर सोलर पॅनल बसविले जाणार आहेत.
प्रतिक्रिया चौकट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून या प्रकल्पाला नवीन आशा व दिशा मिळाली आहे. मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी जे स्वप्न अनेक वर्षे उराशी बाळगले, त्याची मूर्त रुपरेषा आता प्रत्यक्षात येत आहे. देशातील सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प या माध्यमातून राबविण्याचे व म्हाडा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपून पुढे जाईल. पुनर्विकासाचे स्वप्न आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणार आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित व सुसज्ज घरे प्रदान करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हाडातर्फे उचलण्यात आले आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.