वंचितांची हर्षदा ‘ताई’

    27-Aug-2024
Total Views |
harshada sanjay borkar


कलेला मिळणार्‍या मानधनापेक्षा कलेतून मिळणार्‍या समाधानाला अधिक महत्त्व देणार्‍या हर्षदा संजय बोरकर यांच्याविषयी...

वारी ही कधीही एकट्याने करायची नसते. किंबहुना, ती कधीही एकट्याने घडतच नाही. वारी सगळ्यांना सोबत घेऊनच घडते. काही माणसाचं आयुष्य हे असेच एखाद्या वारीसारखे असते. त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन आपला प्रवास केलेला असतो. असेच एक नाव म्हणजे ‘जन्मवारी’ या नाटकाच्या लेखिका हर्षदा संजय बोरकर.

वयाच्या पन्नासाव्या वर्षी हर्षदा यांनी ‘जन्मवारी’ हे नाटक लिहिलं. पण, तत्पूर्वी ही ‘जन्मवारी’ त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. आपल्या कलेच्या माध्यमातून हर्षदा एकेका माणसांशी जोडल्या जाऊ लागल्या आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी आपला प्रवास केला. ठाण्यात जन्मलेल्या हर्षदा यांच्या घरात लहानपणापासूनच कलेचा अधिवास होता. वडील तबलावादक आणि आजी कीर्तनकार असल्यामुळे संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय, गायन अशा विविध कलांविषयी लहानपणापासूनच त्यांच्या मनात गोडी निर्माण झाली होती. शिवाय पुस्तकांशी मैत्री असल्यामुळे त्यांच्यामधली लेखिकाही आकार घेत होती.

ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिरात त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव आणि त्यांचे नृत्य शब्दांहून अधिक बोलके आहे, याची त्यांच्या गुरूंनी त्यांना जाणीव करून दिल्यावर त्यांनी ‘नालंदा रिसर्च सेंटर’मधून ‘भरतनाट्यम्’चे शिक्षणही घेतले. एखादी कला आत्मसात करण्यासाठी अनेकांना आयुष्यभराची तपस्या करावी लागते. पण, हर्षदा यांनी एकाच वेळी नृत्य, अभिनय, लेखन, संगीत, दिग्दर्शन, निवेदन अशा अनेक कलांवर प्रभुत्व मिळवले. त्यांना या कला सहज आत्मसात करता आल्या, यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर बालपणापासूनच झालेले या कलांचे संस्कार आणि त्यांनी त्यांच्या मनात या कलांविषयी जोपासलेले अपार प्रेम. माहेरकडून हर्षदा यांना कलेचा वारसा तर मिळलाच, पण तो तसाच अविरत प्रवाही ठेवण्यासाठी सासरी त्यांना पती वकील संजय बोरकर आणि विचारवंत लेखक सासरे श्रीराम बोरकर यांचा पाठिंबाही मिळाला.

आजवर हर्षदा यांनी कलाक्षेत्रात केलेली मुशाफिरी कौतुकास्पद. ‘माती कोकणची, नाती जन्माची’ अशा मालिकांची त्यांनी शीर्षकगीते लिहिली आहेत, ‘चार सख्य चोवीस’, ‘गुंफियेला शेला’ या पुस्तकांचे सहलेखन त्यांनी संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्यासमवेत केले आहे. त्याचसोबतच नृत्य आणि नृत्यदिग्दर्शनातही त्या पारंगत आहेत. 2023 मध्ये त्यांनी लिहिलेले ‘जन्मवारी’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. कलेकडे फक्त आवड म्हणून पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन हर्षदा यांनी कधीही बाळगला नाहीच. पण, कलेकडे केवळ पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहण्याचा व्यवहारी विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. त्यांच्यासाठी त्यांची कला ही या सगळ्याच्या पलीकडे होते. त्यांना कलेतून आनंद मिळवायचा होता आणि आनंद द्यायचा होता.

‘विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट’ या सामाजिक संस्थेचे काम हर्षदा बोरकर गेली अनेक वर्षे सांभाळत आहेत. या संस्थेतील विशेष मुलांना नृत्य, नाट्य आणि इतर कला शिकवण्याचे काम त्या करतात. ही मुले खर्‍या अर्थाने विशेष असतात. कारण, त्यांच्या मनात राग, ईर्ष्या आणि व्यवहारी दृष्टिकोन कधीही नसतो. ती मुले खर्‍या अर्थाने या कलांचा आनंद घेतात. त्यामुळे हर्षदा यांना त्या मुलांना या कला शिकवण्यात खरा आनंद मिळतो. या मुलांना या कला शिकवायच्या, पण त्यांच्या कलेने शिकवायच्या, हे हर्षदा यांच्यासमोरील मोठे आव्हानच. पण, गेली अनेक वर्षे त्या हे आव्हान मोठ्या ताकदीने पेलत आहेत.

‘कला हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते प्रबोधनाचे एक प्रभावी साधन आहे’ हे आजवर अनेक कलाकारांनी दाखवून दिले आहे आणि हर्षदा बोरकरसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहेत. त्यामुळेच त्या ‘वंचितांचा रंगमंच’ सोबत जोडल्या गेल्या आणि 11 वर्षांपासून संयोजिका म्हणून त्याची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत. 2014 साली लेखक रत्नाकर मतकरी यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ची सुरुवात केली. तळागाळातल्या, झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या मुलांना घेऊन नाट्य सादर करणे आणि त्या नाटकातून त्यांचेच प्रश्न समाजासमोर मांडण्याचे काम हा रंगमंच करतो.

ठाण्यातील छोट्याछोट्या वस्त्यांमध्ये जाऊन कोणत्या मुलांना अभिनयाची आणि या क्षेत्राची आवड आहे, ते कोणती भूमिका पार पाडू शकतात आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांचेच प्रश्न कसे मांडता येतील, या सगळ्याचा शोध घेऊन, हर्षदा ‘वंचितांचा रंगमंच’ सांभाळत आहेत. त्यांच्या ‘जन्मवारी’ या नाटकामध्ये या मुलांपैकी काही मुलांना काम करण्याची संधी मिळाली होती. या मुलांसोबत काम करताना सुरुवातीच्या काळात हर्षदा यांना बर्‍याच अडचणी आल्या. त्यांच्यामध्ये आणि त्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या मुलांमध्ये समाजाने निर्माण केलेली दरी त्यांना जाणवत नसली तरी त्या मुलांना ती जाणवत होती आणि त्यामुळे ती मुले सुरुवातीच्या काळात हर्षदा यांच्यापासून दूर राहत असत. पण, आपल्या स्वभावाने हर्षदा यांनी त्या मुलांचे मन जिंकून घेतलेच आणि त्या वंचितांच्या ‘ताई’ झाल्या.

कामासाठी मिळणार्‍या मानधनापेक्षा हर्षदा यांना त्या कामातून मिळणारे समाधान अधिक महत्त्वाचे वाटते आणि तेच समाधान मिळवण्यासाठी त्या आपल्या कलेचा वापर करत आहेत. अशा या महान कलाकार हर्षदा बोरकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून खूप खूप शुभेच्छा.

दिपाली कानसे