"अडीच वर्षांपूर्वी शिंदे साहेबांनी आणि मी एक पापाची..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

    27-Aug-2024
Total Views |
 
Fadanvis
 
ठाणे : अडीच वर्षांपूर्वी शिंदे साहेबांनी आणि मी एक पापाची हंडी फोडली असून २०२४ ची हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. टेंभी नाका मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना धर्मवीर २ चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी टेंभी नाक्याला दहिहंडीची परंपरा सुरु केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. टेंभी नाक्यावर पाहायला मिळत असलेला हा जोश दिघे साहेबांनी तयार केलेला आहे. हा जोश कसा तयार झाला हे अनुभवायचं असल्यास लवकरच धर्मवीर २ चित्रपट येतोय. तो सर्वांनी पाहावा," असे आवाहन त्यांनी केले.
 
हे वाचलंत का? -  पुतळ्याप्रसंगी आशिष शेलार म्हणाले, "सरकारच्या वतीने मी..."
 
ते पुढे म्हणाले की, "अडीच वर्षांपूर्वी मी आणि शिंदे साहेबांनी एक पापाची हंडी फोडली आणि त्यातून महाराष्ट्रात एक पुण्याची हंडी उभारली. त्यामुळे काळजी करू नका. २०२४ मधली हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत. हंडी कुणीही फोडली तरी काला सगळ्यांचाच असतो. समाजाने एकत्रितपणे हा काला खायचा आहे आणि एकत्र राहायचं आहे. प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला प्रेमाचा संदेश पुढे नेण्यासाठी आपण थरावर थर लावून हंडी फोडणारच," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.