संगीतप्रेमी डॉ. गोरे - मैत्र जीवांचे

    05-Jul-2024   
Total Views |
Dr. Ajit Gore
 

बालपणापासून जीवांचे मैत्र बनत पशुवैद्यकीय पेशातून प्राणिमात्रांची सेवा करणारे गिटारवादक संगीतप्रेमी डॉ. अजित गोरे यांच्याविषयी...

डॉ.अजित गोरे यांचा जन्म 1957 साली कोल्हापूर येथे झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. विक्रोळीच्या विकास हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षण त्यांनी सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा येथे पूर्ण केले. त्यानंतर ठाण्याच्याच बांदोडकर महाविद्यालयात ‘इंटर सायन्स’ करून परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून ‘बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स’मधून पदवी प्राप्त केली. डॉ. गोरे यांची आई सरस्वती शाळेत शिक्षिका, तर वडील ‘प्रीमिअम ऑटोमोबाईल’मध्ये कुशल तंत्रज्ञ असल्यामुळे कौटुंबिक स्थिती उत्तम होती. आईवडील आणि दोन भावंडे असे त्यांचे चौकोनी कुटुंब असून, डॉ. गोरे यांचा भाऊदेखील पुण्यात पशुवैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. डॉ. अजित गोरे हे पाचवीत असताना बासरी, ट्रम्पेट, ड्रम वाजविण्यात निपुण असल्याने, त्यांच्या विकास हायस्कूलमध्ये असलेल्या बॅण्ड पथकात त्यांना संधी मिळाली. तिथूनच त्यांच्यात संगीताची आवड दिवसेंदिवस वाढत गेली.

घरात आईवडिलांनासुद्धा संगीताची जाण असल्याने त्यांना संगीताचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आणि संगीताची आवड आपसूकच वृद्धिंगत होत गेली. त्यांचे वडील सर्जेराव गोरे लोकशाहीर साबळे, शाहीर अमर शेख यांच्या कलापथकांमधून गायचे. त्यामुळे लोकसंगीत, भजन, पोवाडा वगैरे ऐकतच अजित लहानाचे मोठे झाले. दत्तोपासक आर. एन. पराडकर, कीर्तनकार आफळे बुवा, भालजी पेंढारकर, जयराम, कीर्ती शिलेदार आणि बर्‍याच दिग्गज मंडळींना प्रत्यक्ष पाहिले व ऐकल्याचेही डॉ. गोरे सांगतात. पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना अनेक ‘ऑर्केस्ट्रा’मधून गिटार वादनाचे कार्यक्रम केले. त्यावेळी आर्थिक कमतरता होती. तेव्हापासून गिटार वाजवायला सुरुवात केली. ती आवड त्यांनी आजपावेतो जोपासली आहे. लहानपणी त्यांना प्राण्यांची विशेषतः कुत्र्यांची फार आवड. रस्त्यात कोठेही छान कुत्र्याचे पिल्लू दिसले, की उचलून ते घरी आणत असत. परंतु, काही दिवसांतच ते पिल्लू आजारी पडून प्राण सोडायचे. तेव्हा, प्राण्यांच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आजारी पिल्लाला घेऊन अजित अनेक चकरा मारायचे, पण पिल्लू दगावले की त्यांना रडू कोसळायचे. मग एक दिवस वडील अजित यांना म्हणाले, “आधी तू प्राण्यांचा डॉक्टर हो.
मी स्वतः तुला चांगला कुत्रा घेऊन देईन” आणि 1980 साली पशुवैद्य झाल्यावर वडिलांनी त्यांना ‘डॉबरमॅन’ प्रजातीच्या श्वानाचे पिल्लू घेऊन दिले. ते पिल्लू त्यांच्याकडे तब्बल 14 वर्षे अगदी निरोगी आयुष्य जगले. पशुवैद्यकीय डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर लगेचच नवी मुंबईतील एका गोशाळेमध्ये डॉ. अजित यांना नोकरी लागली. सरकारी नोकरीच्या अनेक संधीही चालून आल्या, पण गोसेवेसाठी सरकारी नोकरीला नकार देत गोसेवेला प्राधान्य दिले. 1982 साली विवाह झाल्यानंतरदेखील ते गोशाळा सांभाळायचे.
1984 साली ठाण्यातील मखमली तलाव येथे पाळीव प्राण्यांसाठी ठाण्यातील सर्वात पहिला खासगी पशुवैद्यकीय दवाखाना डॉ. अजित यांनी सुरू केला. आज त्या दवाखान्याला बरोबर 40 वर्षे पूर्ण झाली. माझ्या मित्रांनी आणि घरातील सर्वांनी विशेष करून वडील व पत्नी शुभदा यांनी आजवर खूपच सहकार्य व प्रोत्साहन दिले. ज्यामुळे आजसुद्धा अविरतपणे प्राणीमात्रांना सेवा देत आहे. तसेच, एखाद्या पाळीव प्राण्यासाठी गृहभेटीदेखील देत असल्याचे ते सांगतात.
‘सेवा परमो धर्म:’ हेच ब्रीद बाळगून डॉ. अजित कार्यरत आहेत. त्यामुळे सन्मान किंवा पुरस्कार हे त्यांच्यासाठी दुय्यम. संक्रांतीमध्ये तसेच धुळवडीत जखमी पशुपक्षी यांची सुश्रुषा व उपचार ते करतात. एखाद्या ठिकाणी पक्षी अडकला असेल किंवा आपत्कालीन सेवेकडून अथवा प्राणीप्रेमींकडून बोलावणे आल्यानंतर तातडीने मदत करतात. तसेच अनेक गोशाळांमध्ये गोधनावर निःशुल्क गोसेवा, उपचार व शस्त्रक्रिया केल्या. भविष्यात अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात, वृद्धाश्रमात तसेच दिव्यांग विकलांग संस्थांमध्ये मोफत गिटारवादनाचे कार्यक्रमदेखील ते करतात. तसेच, सात ते 70 वर्षे वयोगटातील इच्छुकांना गिटारवादनामध्ये योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे. गिटारवादनाचा त्यांचा हा वारसा नातू आरुष गोरे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
“लहानपणापासून संगीत आणि प्राण्यांमध्ये कुत्रा या प्राण्याची विशेष आवड होती. पण हीच आवड पुढे पशुवैद्यकीय व्यवसाय आणि संगीत छंद म्हणून जोपासता जोपासता या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या. आजही वयाची पासष्ठी पार केल्यानंतर आपला पशुवैद्यकीय व्यवसाय आणि छंद म्हणून असलेले संगीत मला एक वेगळाच आनंद देतानाच जगण्याची एक नवी उर्मी देतात,” असे डॉ. अजित गोरे सांगतात. एकंदरीत प्राण्यांची सेवा करताना संगीताने मन प्रसन्न ठेवत समाधानी आयुष्य जगणार्‍या संगीतप्रेमी पशुवैद्य डॉ. अजित गोरे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(अधिक माहितीसाठी संपर्क- 9819224868)

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.