...की घेतले व्रत न हे आम्ही ‘अंधतेने’

    04-Jul-2024
Total Views |
reena patil
 
 
‘डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार’ नुकताच रीना पाटील यांना पुण्यातील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. अंधत्वावर मात करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या रीना यांचा हा विस्मयकारक प्रवास...

स्वातंत्र्य आणि प्रत्येक क्षेत्रात क्षमतेनुसार समान संधी’ हे या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येकाचेच जन्मसिद्ध अधिकार असतात. परंतु, प्रत्येक माणसाला या जन्मसिद्ध अधिकारांचा उपभोग घेता येतोच असे नाही. अशातच समाजामधील अडथळ्यांचा आणि विरोधांचा सामना करत, या अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडायचा अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे सांगली जिल्ह्यातील विसापूर गावात जन्मलेल्या आणि गेली दहा वर्षे बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीय बँकेत काम करणार्‍या रीना पाटील.
 
जन्मापासूनच अंधत्व आल्यामुळे आणि मेंदू व डोळे या दोन अवयवांना परस्पर रक्तपुरवठा करणार्‍या वाहिन्याच कायमच्या निकामी झाल्या. आता मुलीच्या डोळ्यांवरील उपचारांमागे न धावता, तिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे कसे उभे करायचे, असे रीना यांच्या आईवडिलांनी ठरविले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पुण्यातील कोथरूडमध्ये शिक्षणासाठी रीना यांना पाठविले. वयाच्या पाचव्या वर्षी ‘द पूना स्कूल अ‍ॅण्ड होम फॉर ब्लाइंड गर्ल्स’ या रहिवासी शाळेमध्ये रीना यांनी प्रवेश घेतला. पुढे जाऊन त्यांनी एकात्म शिक्षणपद्धतीसाठी आणि सामान्य माणसांमध्ये मिसळण्यासाठी कर्वेनगर परिसरातील ‘महिलाश्रम हायस्कूल’ आणि कर्वे रस्त्यावरील ‘एसएनडीटी’ या संस्थांमधून आपले माध्यमिक आणि उच्च शिक्षण पूर्ण केले.

त्याबरोबरच इंग्रजी भाषेमधील पदवीचे शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. तसेच, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांतसुद्धा पदवी शिक्षण संपादित केले. शिक्षणासोबतच वक्तृत्व, संगीत आणि गायनकला आत्मसात केली. भारतीय शास्त्रीय संगीत परीक्षेमध्ये ‘डिस्टिंक्शन’ही मिळाले, तर नाटकाच्या सेवेसाठी ‘नाट्य कला अकादमी’चा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. पुण्यात शिक्षण घेत असताना आणि सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत, त्यांनी 2014 साली राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अधिकारी होण्यासाठी ’आयबीपीएस’ ही स्पर्धा परीक्षा दिली आणि त्याचवर्षी ती परीक्षा त्या यशस्वीरित्या उत्तीर्णसुद्धा झाल्या.

ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे सगळे श्रेय त्या विद्यार्थीदशेत पुण्यात ज्यांच्याकडे वास्तव्यास होत्या, त्या पुरंदरे परिवारास, मार्गदर्शक प्रकाश पंडागळे, मैत्रीण सोनाली बोर्डे आणि बहीण रेखा जाधव यांना देतात. कमल आणि मदन पुरंदरे यांच्याकडे राहात असताना त्यांनी बँकेच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पुरंदरे यांनी रीना यांची गणिताची अडचण दूर केली. अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही, योग्य समर्थन आणि संधींसह ते पूर्ण आणि उत्पादक जीवन जगू शकतात. या विचारांनी रीना पाटील यांनी बँकेच्या नोकरीसह अंध व्यक्तींसाठी समाजोपयोगी कार्येसुद्धा केली आहेत. अंध लोकांप्रती नुसता भावनिक विचार न करता, त्यांच्याशी सामान्य माणसांनी आपणहून बोलायला जावे. अंध लोकांच्या गरजा या सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या आणि जास्त असतात. त्या समजावून घ्याव्यात, अशीच त्यांची नेहमी मागणी असते.

लोकांशी सहज संपर्क करण्याची क्षमता अंगीभूत असल्याने त्यांना कोणत्याही अडचणीच्या काळामध्ये फारसे झगडावे लागले नाही,. म्हणून इतर अंध व्यक्तींचे ‘ह्युमन रिलेशन’ (लोकांशी सहज संपर्क करणे) कसे मजबूत होईल यासाठी त्या नेहमीच विविध संस्थांच्या माध्यमांतून अग्रेसर असतात. ‘राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, पुणे’, ‘अद्वैत परिवार, पुणे’ आणि पराग मते यांच्या ‘वी पुणेकर’ या तीन संस्थांच्या पुढाकाराने रीना अंध बंधुभगिनींच्या हितासाठी कार्यरत आहेत. कोणताही माणूस संकटातून जात असताना, त्याला केवळ मानसिक आधाराची गरज असते. तो मिळाला नाही, तर त्या अडचणीत असणार्‍या माणसाची पंचाईत होते. हीच बाब लक्षात घेऊन रीना अंध बांधवांना मानसिक आधार देतात.
 
राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी ही उदरनिर्वाहासाठी आहेच, परंतु नोकरी करून मिळवलेल्या पैशांचा उपयोग जास्तीतजास्त प्रमाणात समाजसेवेसाठी कसा करता येईल, यासाठी रीना प्रयत्नशील असतात.‘मला पळता येत नाही म्हणून मी चालणे सोडून देत नाही’ या वाक्प्रचारावर त्यांचा गाढा विश्वास. कोथरूडमधील ‘द पूना स्कूल अ‍ॅण्ड होम फॉर ब्लाइंड गर्ल्स’ या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना नीलिमा सोमण यांची ओळख झाली. त्यांनीच पुढे रीना पाटील यांना मराठी आणि इंग्रजी भाषांमधील अनेक दर्जेदारपुस्तके वाचून दाखवली. पु. ल. देशपांडे हे रीना पाटील यांचे आवडते लेखक, तर अंतू बर्वा आणि सखाराम गटणे ही त्यांची आवडती कथाकथने. ‘पूर्णतः अंध असूनही नीलिमा सोमण आणि मदन पुरंदरे यांच्यामुळे मी अनेक पुस्तके वाचू शकले,’ असे त्या आवर्जून सांगतात.
 
“माणसाचे संभाषण कौशल्य उत्तम असायला हवे. चांगले बोलण्याने चांगली माणसे भेटतात. अंध आहे म्हणून रडत न बसता, जमले त्या मार्गाने प्रगती केल्याने आज आयुष्याचा मोठा टप्पा गाठू शकले आहे. मी जशी प्रगती करू शकले, तशीच प्रगती इतर अंध लोकांनीसुद्धा करावी,” असे रीना म्हणतात. यासाठी आणि तसेच अंध लोकांमध्ये रोजगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी त्यांच्यात कौशल्याभिमुखता वाढविण्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. अंधांसाठी समाजकार्य आणि सामान्यांमध्ये अंध व्यक्तींविषयी आत्मीयता वाढवण्यासाठी आणखीन दृढतेने काम करू इच्छिणार्‍या रीना पाटील यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा! (अधिक माहितीसाठी क्रमांक ः 9881340202)

अनिश कुलकर्णी