विरोधकांनी सेट केलेल्या फेक नरेटिव्हचा प्रविण दरेकर पर्दाफाश करणार
28-Jul-2024
Total Views |
मुंबई : खोटे नरेटिव्ह सेट करायचे, वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांत बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचे हा विरोधी पक्षाचा अलीकडच्या काळातील धंदा बनला आहे. ही लोकं कसे खोटे नरेटिव्ह सेट करतात याचा पर्दाफाश करतोय, असा इशारा भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देत दरेकर म्हणाले की, त्यांनी इतरांवर राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल द्यायला सुरुवात केलीय. या आंदोलनात कशा पद्धतीने फेक नरेटिव्ह सेट केले जातात, वक्तव्य केली जातात. या संदर्भातील पर्दाफाश मी उद्या करणारच आहे. महाराष्ट्रात सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सकारात्मक आहे. ओबीसीतूनच आरक्षण द्या असा आग्रह आहे, त्या आग्रहाशी राज्यातील एकही पक्ष सहमत नाही. जरांगेंनी ज्या मागण्या केल्यात त्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी आपली भुमिका स्पष्ट करावी.
दरेकर म्हणाले की, आमदारासारख्या महत्वाच्या लोकप्रतिनिधी, नेत्यानेही आपण महायुती म्हणून सामोरे जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येईल अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. खो-खो सारखा खेळ खेळू नये. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मेळाव्यात सांगितले होते की कुणाला खुमखूमी आली तर पक्ष प्रमुखांशी बोला. कुणीही अशा प्रकारे महायुतीत वाद होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर, निवडणुकीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नये, असे खडेबोलही दरेकरांनी सुनावले.
उरण हत्याकांडावर बोलताना दरेकर म्हणाले की, ही अत्यंत चीड आणणारी आणि संतापजनक घटना आहे.लव्ह जिहाद संदर्भात महाराष्ट्रात ज्या-ज्या भागात घटना झाल्या त्याची कार्यपद्धती पाहिली तर विदारक आहे. या भगिनीला ज्या प्रकारे मारले गेले, चेहरा विद्रुप केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात व्हायला लागल्यात. हे नराधम विशिष्ट प्रवृत्तीचे आहेत. या घटनेतून अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रवृत्तीना ठेचून काढण्याची गरज आहे.
तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार
दरेकर म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत त्यात दुमत असायचे कारण नाही. दोन्ही दादांनी केलेली वक्तव्ये ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात २८८ जागा लढण्याची क्षमता आणि त्या ताकदीचे उमेदवार भाजपकडे आहेत. महायुती समन्वयाने, सुसंवादातून-एकोप्याने महायुती म्हणून सामोरे जाऊ आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू.