संजय राऊतांची शिष्टाई निष्फळ! विलास शिंदेंचा प्रवेश निश्चित

    27-Jun-2025
Total Views |


नाशिक :
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला १५ दिवसांमध्ये नाशिकमध्ये दुसरा तडाखा बसला असून सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रभागातील ४ तर इतर ४ असे आठ नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह रविवार दि. २९ जून रोजी ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर त्यांनी शहरातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटाला आता नाशिकमध्ये दुसरा मोठा धक्का बसणार आहे. सुधाकर बडगुजर यांनी विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण पक्षात नाराज असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यादरम्यान, विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती.
विलास शिंदे यांनी आपल्याला पक्षात सतत डावलले गेल्याची भावना बोलून दाखवली. तसेच नवीन जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांना नेमले आहे, त्यांच्या मागे कार्यकर्ते नाहीत, तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असतानाही आपल्याला डावलण्यात आले. महापौर पदासाठी उमेदवारी मागितली तर त्यावरही कधीच विचार झाला नाही. माझी नाराजी मी खा. संजय राऊत यांच्याकडे बोलून दाखवली. त्यावर १५ दिवस उलटूनही काहीच हालचाल न झाल्याची खंत विलास शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

संजय राऊतांची भेट निष्फळ!

दुसरीकडे, विलास शिंदे कुठेही जाणार नाही, असे छातीठोकपणे सांगणारे संजय राऊत यांना शिंदेंनी चांगलाच धक्का दिला आहे. आठ दिवसांपूर्वी शिंदे यांना मुंबईला बोलवून माध्यमांसमोर हजर करण्यात आले. यावेळी शिंदे नाराज नसल्याचे संजय राऊतांनी सांगितले. या गोष्टीला आठ दिवस उलटत नाही तोच विलास शिंदे यांनी स्थानिक नेतृत्वावर खापर फोडत पक्ष सोडत असल्याचे जाहिर केले. याआधी संजय राऊत यांचे कट्टर समर्थक सुधाकर बडगुजर यांनीही पक्ष नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता शिंदेंच्या रुपाने उबाठा गटाला हा दुसरा हादरा असल्याचे बोलले जात आहे. 
सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी बोलून दाखवल्यानंतर थेट त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता विलास शिंदेंनीदेखील पक्षात डावलले जात असल्याची खंत बोलून दाखवली. मात्र, सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदेंसारख्या शिलेदारांची समजूत काढण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.