विजय वडेट्टीवारांना मनसेचा फोन! ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार?

    27-Jun-2025
Total Views |


मुंबई :
हिंदी सक्तीच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना फोन केला आहे. दरम्यान, आता या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता. तुम्ही मोर्चात या अशी विनंती त्यांनी मला केली. राजसाहेबांचा हा निरोप आहे असेही त्यांनी मला सांगितले. आमच्या सगळ्या नेतेमंडळींशी चर्चा करून आम्ही याबाबत निर्णय घेऊ," असे ते म्हणाले.


येत्या ५ जुलै रोजी पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहे. "हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे," असे राज ठाकरे म्हणाले होते.

त्यानुसार, आता मनसे कडून विविध राजकीय पक्षांना फोन करण्यात येत असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, शरद पवार गट आणि काँग्रेस याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.