माथाडी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत काकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश!
27-Jun-2025
Total Views | 15
मुंबई : अखिल भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस आणि माथाडी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत काकडे यांनी शुक्रवार, २७ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सुहास माटे, सरचिटणीस रवि अनासपुरे, माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्धित होते. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे शेखर पवार, सिंधुदुर्ग काँग्रेसचे गिरीश मसुरकर, विजय हरिहर, बाबूलाल हरिहर यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "डॉ. प्रशांत काकडे हे आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्नेही असून कामगार वर्गाच्या मागण्यांसाठी त्यांनी केलेला अथक संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे. मात्र, आजवर त्यांच्या मागण्यांकडे काही विरोधी नेत्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले."
"पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 'सेलेबी' या तुर्की कंपनीच्या विरोधात केंद्र शासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा करावा, याविषयी आमची चर्चा सुरू असतानाच देशविरोधात असणाऱ्या या कंपनीवर मोदीजींच्या नेतृत्वात बंदी आणली गेली. त्यामुळे देशात मोदी सरकार आणि राज्यात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारच कामगारांना न्याय देऊ शकते, याची खात्री डॉ. प्रशांत काकडे यांना पटली. त्यानुसार आज डॉ. प्रशांत काकडे यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला," असे ते म्हणाले.