प - पर्यावरणाचाच!

    05-Jun-2024
Total Views |
Environment

‘पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही संस्था गेली १०-१२ वर्षे पर्यावरण संरक्षण व संवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती या अनुषंगाने कार्यरत आहे. काल संपन्न झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या हरितकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

पर्यावरण म्हटलं की, झाडे लावणे, जलप्रदूषण, वायूप्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, वणवे लागणे, तापमानवाढ, कार्बन उत्सर्जन अशा काही निवडक गोष्टीच सामान्य माणसाच्या डोळ्यांसमोर येतात. पण, काळानुरूप सतत दिवसेंदिवस वाढतच जाणारा ई-कचरा, प्लास्टिक वेस्ट, न वापरले जाणारे भरमसाट कपडे आणि त्याच्यापासून कालांतराने तयार होणारा कचरा किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंग, कम्पोस्टिंगच्या माध्यमातून खतनिर्मिती, अशा अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपल्या दूरदर्शीपणाने पाहिल्या, त्या डॉ. मणेरीकर दाम्पत्याने. ते पर्यावरणप्रेमी तर आहेतच, पण एका भन्नाट कल्पनेचे ते सृजक आहेत. ज्यामुळे कचर्‍याची पण विल्हेवाट लागेल, रोजगारनिर्मितीसुद्धा होईल. शिवाय, पर्यावरणपूरकताही जपली जाईल. हीच कल्पना ते गेली १०-१२ वर्षे प्रयत्नपूर्वक साकारत आहेत, जिचं नाव आहे, ’पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ ही संस्था. या कामाच्या माध्यमातून ते एकाच वेळी शाश्वत विकास आणि रोजगारनिर्मिती यांची उत्तम सांगड घालत आहेत. म्हणूनच काल संपन्न झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या संस्थेविषयी संयुक्तिक ठरेल.
 
आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी रोजगाराच्या निमित्ताने लोकांचा शहराकडे येण्याचा ओघ हळूहळू सुरू झाला. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील सततच्या होणार्‍या बदलांमुळे आज समाजात आर्थिक आणि भौतिक बरीच स्थित्यंतरे झाली आहेत. मानवी जीवन सुलभ करण्याच्या प्रक्रियेमध्ये रोज या तंत्रज्ञानाचा हातभार लागतो. आधुनिकीकरणामुळे जगदेखील जवळ आले. आर्थिकदृष्ट्यादेखील माणूस प्रगती करू लागला. या स्थित्यंतरामुळे माणसाच्या राहणीमानामध्ये प्रगती होत असताना याचा परिणाम व्यक्ती, व्यक्तिसमूह आणि त्यायोगे समाजाच्या जीवनशैलीवरदेखील पडत गेला. सोयीसुविधांचा वापर करत असताना, त्याद्वारे होणारे पर्यावरणीय नुकसान यावर फारसे बोलायला लोक टाळाटाळ करू लागले आणि यातूनच निर्माण झाली, ती ‘विविध स्वरूपातील कचरा’ ही पर्यावरणीय समस्या! अगदी सुरुवातीच्या काळात कचरा ही छोटीशी आणि शहरापुरती मर्यादित समस्या होती. पण, तिने कधी भीषण स्वरूप धारण केले व छोटी-छोटी गावे कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली गेली हे कळालेदेखील नाही.

ओला आणि सुका कचरा, प्लास्टिक आणि थर्मोकोलचा अतिवापर, त्याकाळात नवीनच अस्तित्वात आलेला पण मोठ्या प्रमाणावर तयार झालेला ई-कचरा आणि वापरात नसलेले जुने कपडे अशा सर्व घटकांवर काम करण्याची गरज लक्षात आली. ही मानवनिर्मित समस्या लक्षात घेता, पर्यावरण संरक्षण, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती या विषयात छोट्या-छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून काम करण्याची गरज लक्षात घेता, त्यावेळी ‘पर्यावरण’ या विषयातील पीएचडीचे शिक्षण पूर्ण केलेले डॉ. अक्षया मणेरीकर आणि डॉ. राजेश मणेरीकर हे दाम्पत्य आणि त्यांचे सहकारी मित्र डॉ. प्रशांत दुराफे या तिघांनी मिळून ’पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन’ या एनजीओची स्थापना २०१४ मध्ये केली. संस्कृतमधील ‘ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते’ या श्लोकामधून ’पूर्णम’ या शब्दाची निवड करण्यात आली. आपल्याला नको असलेली वस्तू ही दुसर्‍या कुठल्या तरी व्यक्तीला किंवा कार्याला आहे, तशा अवस्थेत अथवा थोड्याशा डागडुजीतून उपयुक्त होऊ शकते आणि त्याचा पुनर्वापर होऊ शकतो, याची जाणीव सर्वसामान्यांना करून देणे आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून लोकांनी कचरा व्यवस्थापनाच्या या लोककार्यात सहभागी व्हावं, हाच ‘पूर्णम’च्या स्थापनेमागचा उद्देश आहे.
 
‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती’ या विषयांना घेऊन काम करणार्‍या ‘पूर्णम’ने सुरुवातीच्या काळात सोसायटीस्तरावर कचरा संकलन सुरू केले. पाच-सहा महिन्यांत १३ सोसायट्यांमधून ओला-सुका कचर्‍यासह अगदी अडगळीसकट सर्व गोष्टींचे संकलन करण्यात आले. त्यामधून ‘पूर्णम’कडे कपडे, प्लास्टिक, थर्मोकोल आणि ई-कचरा अशा अनेक गोष्टी जमा झाल्या. हळूहळू कामाची दिशा, आपण करावयाचे काम आणि समाजाची गरज लक्षात येत गेली. त्या काळात नवीनच वर्गीकृत केलेला पण मोठ्या प्रमाणावर असणारा ई-कचरा हा अज्ञानामुळे भंगारवाले धातू वेगळे करून तो विकायचे अथवा काहीवेळा ते जाळून टाकायचे. साधी घरातली केबल तुटली, तर ती कुठे टाकावी, याचीदेखील त्या काळात तेवढ्या प्रमाणात जागृती नव्हती. अशा काळात सरकारने ई-कचरा हा शासनमान्य ठिकाणीच जमा करावा, असा २०११ साली नियम बनवला. त्या समस्येवर फक्त जनजागृती करून होणार नाही, त्याला काहीतरी एक उत्तर, समाधान आपल्यामार्फत द्यावं आणि ते पारदर्शक असावं, असा विचार पुढे आला आणि त्यातून मग ‘ई-कचरा व्यवस्थापन’ हा आयाम आपण ‘पूर्णम’ म्हणून चालवायला लागलो. यामध्ये सुरुवातीला कचरा संकलन करणे आणि तो योग्य ठिकाणी वितरीत करणे, असे काम चालू होते.

त्यावर काम करू लागल्यानंतर असे लक्षात आले की, हा संपूर्ण ई-कचरा विलगीकरण करताना तीन वेगवेगळ्या विभागांत विभागला जातो. त्यामध्ये काही ई-कचरा पुन्हा वापरता येऊ शकतो आणि काही ई-कचरा दुरुस्त करून वापरता येऊ शकतो आणि काही अगदीच उपयोगात न येणारा असा आहे. संकलन केलेल्या ई-कचर्‍यामध्ये पुन्हा वापरता येऊ शकतो असा अथवा दुरुस्त करून वापरता येऊ शकतो, असे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप आपण विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांना दान करतो. आजपर्यंत असे ९०० पेक्षा अधिक कॉम्प्युटर्स संस्थेने सत्पात्री वितरीत केले आहेत. या ई-कचरा प्रक्रियेच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण देऊन गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि त्यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकल्पावर ‘पूर्णम’ काम करते. सध्याच्या काळात कपड्यांच्या रोज नवनवीन फॅशन्स येतात, तसे रोज काही फॅशन या हद्दपारदेखील होत आहेत. त्यामुळे नवीन कपड्यांची खरेदी ही सर्रास मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे जुन्या कपड्यांचं काय करावं, असा प्रश्न बर्‍याचदा लोकांना पडतो, त्यावर उपाय शोधण्याचे काम ‘पूर्णम’च्या ’परिपूर्णम’ या आयामांतर्गत केले जाते.
 
कपड्यांच्या पुनर्चक्रीकरण म्हणजेच ‘फॅब्रिक अप सायकलिंग’च्या माध्यमातून वैयक्तिक, सोसायटी व तसेच कॉर्पोरेट स्तरावर कपड्यांचे संकलन ‘पूर्णम’ करत असते. कपड्यांचे वर्गीकरण करून त्यातील चांगले व वापरता येतील, अशा कपड्यांचे त्याच्या विविध प्रकारात व स्वरूपात वर्गीकरण केले जाते. ते कपडे ‘पूर्णम’ विविध सेवा वस्ती, संस्था आणि गरजू लोकांना दान करते. ज्या कपड्यांचा पुनर्वापर शक्य नाही, अशा कपड्यांपासून सुमारे ५० वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार केल्या जातात. अशा कमी वापरता येण्यासारख्या कपड्यांचे आपण ‘अपसायकलिंग’ करून विविध स्वरूपातील ५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंतच्या वस्तूंची निर्मिती करणे, त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम ‘पूर्णम’ मागील अनेक वर्षांपासून करत आहे. नवीन वस्तू काळानुरूप तयार करून, विकून जे पैसे उभे राहतात. त्यातून या सर्व प्रकल्पांमध्ये काम करणार्‍या महिलांचे पगार आणि त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षणावर खर्च केला जातो. नजीकच्या भविष्यात अशी तीन शिलाईकाम प्रशिक्षण केंद्रे कोंढवा, गोखलेनगर आणि हडपसर या ठिकाणी ‘पूर्णम’तर्फे उभारली जात आहेत.
 
‘ग्रीन कन्सल्टन्सी’ या आयामांतर्गत जलपुनर्भरण (Rain Water Harvesting), सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प (कम्पोस्टिंग युनिट), बायोगॅस युनिट अशा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या विषयांतदेखील ‘पूर्णम’ काम करते. लोक जिथे राहतात, काम करतात, त्यांच्या ठिकाणी त्याच जागेवर ओला कचरा जिरविण्याचे (कम्पोस्टिंग) विषयात मार्गदर्शन देणे, युनिट्स उभे करून देणे तसेच ते चालवणे, असे काम आपण त्यानंतरच्या काळात सुरू केले. लगतच्या काळात बीड जिल्ह्यातील १०० गावांत पाच हजार घरांवर जलपुनर्भरण (Rain Water Harvesting) या विषयात काम करण्यात आले. शहरी भागातील समस्या या ग्रामीण भागापेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. ग्रामीण भागात प्लास्टिकही फोफावत जाणारी समस्या मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहे. प्लास्टिक जाळणे, नदीवाटे वाहत जाणे, पाणवठ्याच्या जागी वाहणे अशा विविध समस्या जाणवत आहेत. सुका कचरा आणि ओला कचरा यांचे वर्गीकरण करून छोट्या-छोट्या प्रयोगांचे आयोजन ‘पूर्णम’ ग्रामीण भागातही करत आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये कमिन्स, पर्सिस्टंट, केपीआयटी, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, आयसीआयसीआय फाऊंडेशन, अशा अनेक संस्था ‘सीएसआर’द्वारे ‘पूर्णम’च्या कामात प्रत्यक्ष सहभागी आहेत.
 
 तरीदेखील या पर्यावरणीय समस्यांवर कोणीतरी एक व्यक्ती अथवा संस्था, समूह यांनी पुढाकार घेऊन काम केल्याने ती समस्या संपेल, असे होणे त्याअर्थाने शक्य नाही. परंतु, ‘लोकसहभाग’ कसा वाढवावा अथवा या अनेक प्रकारच्या आयामांमध्ये कोणत्या ना कोणत्या कडीमध्ये सर्वसामान्य लोकांना जोडता यावे, अशी रचना तयार केली आहे. कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करताना ‘पूर्णम’ सर्वच ठिकाणी पोहोचू शकेल, असेदेखील होणार नाही. म्हणूनच, ‘क्लोथ्स अपसायकलिंग’, पुनर्वापर, कम्पोस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऊर्जाबचतीची एखादी योजना, ट्री प्लांटेशन, रिव्हर घाट क्लीनिंग अशा विविध प्रकारच्या कोणत्याही पर्यावरण संवर्धनाच्या विषयात आजकालच्या युवावर्गाने पुढे यावं, रस्त्यावर उतरून पर्यावरणीय समस्यांवर काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या माध्यमातून उद्योजकता विकास होऊ शकेल. अशा वेळी दिशादर्शकाच्या भूमिकेत ‘पूर्णम’ काम करेल. तसेच एखाद्याला मदत, मार्गदर्शन देता येईल. प्रशिक्षण देता येईल व त्यांच्या ठिकाणी ‘कचरा व्यवस्थापन’ विषयात ते काम करतील, अशी सर्वतोपरी मदत ‘पूर्णम’ पुढे करणारच आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करताना ‘पूर्णम’चा प्रवास जाऊ द्या, मला काय त्याचं, त्यानंतर त्याचे, काही झालं तरी मी त्याचे व्यवस्थापन करेन, पर्यावरणपूरकच वस्तू वापरेन, असे स्थित्यंतर देणारा असून तो आल्हाददायक आहे.

 
भरत दामले
(अधिक माहितीसाठी संपर्क -
अद्वैत पत्की, जनसंपर्क आणि विपणन -९०७५००८९९३,
भरत दामले, जनरल मॅनेजर - ८९५६४९९७९४
पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन