समाज आणि साहित्य समरसतेसाठी

    03-Jun-2024   
Total Views |
Dr. Gajanan Hode

शिक्षण, समाज आणि साहित्यामधील समरसता यावर लक्ष केंद्रित करून जीवन जगणारे डॉ. गजानन होडे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

“गजा बाळ, तू शिक्षण सोडून मुंबईला कामधंदा करायला जाऊ नकोस. तू कसं पण करून शिक बाळा.” पार्वतीबाई गजानन यांना सांगत असत, तर तेच गजानन आज महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक संदर्भातील विविध संस्थांवर कार्यरत आहेत. शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. ‘बालभारती’, ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण संस्था’, ‘महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे’, ‘राज्य आंग्लभाषा संस्था, संभाजीनगर’ वगैरे वगैरे शिक्षणासंदर्भातील शासकीय संस्थांवर ते कार्यरत आहेत. तसेच नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेचे ते सहसचिव आणि सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते ‘लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळा’वर कार्यरत आहेत.

शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर कधीही फेकले जाऊ शकू, अशा परिस्थितीमध्ये बालपण जगलेले गजानन यांनी पुढे ’भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाचा ऐतिहासिक अभ्यास’ या विषयात पीएचडीही मिळवली. डॉ. गजानन होडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. शिक्षण मानवतेसाठी हा त्यांचा ध्यास. त्यामुळेच समाजात समरसतेचा भाव निर्माण व्हावा, यासाठी ते कार्य करतात. समरसता साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवरही ते कार्यरत आहेत. त्यांचे आदर्श आहेत स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी युवा कसा असावा? यावर विचार मांडले होते. समाजशील, राष्ट्राभिमानी आणि चैतन्यशील युवा असावा. त्यांनी आयुष्यात एक लक्ष्य ठेवून सकारात्मक कार्य करून समाज घडवावा, असे त्यांचे मत होते. गजानन हे स्वामी विवेकानंदांच्या या विचारांनी प्रेरित झाले. शिक्षण आणि सामाजिक समरसता हे त्यांनी विचारकार्य क्षेत्र ठरवले. त्यानुसार, ते प्रत्येक क्षण काम करत आहेत, तर डॉ. गजानन होडे यांच्या भूतकाळाचा मागोवा घेऊया.
 
रत्नागिरी, संगमेश्वरच्या अनदेरी गावचे गणपत आणि पार्वती होडे कुटुंब. घरची गुजराण पूर्णत: शेतीवर अवलंबून. या दोघांना चार अपत्ये. त्यापैकी एक गजानन. होडे यांचे संयुक्त कुटुंब. २७-२८ जण कुटुंबात. गावात कुणब्यांचीच भावकी. शेतीभाती करावी, देवधर्म जपावे, कुलाचार जपावे, हे ओघानेच आले. घरी दूधदुभत्यांची कमी नसली, तरी त्यामुळे आर्थिक उत्पन्नात भर पडायची नाही. गावातले युवक थोडे फार शिकले की मुंबईत पोटापाण्यासाठी जायचे. तिथे बहुसंख्य मुले चतुर्थ श्रेणीचेच काम करायचे. त्यामुळे ते मुंबईत जरी कामाला गेले तरी त्यांच्या किंवा रत्नागिरीतील त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात फारसा फरक पडत नसे. हे सगळे पाहून पार्वतीबाईंना वाटे की, गजानन यांनी तरी शिकावे. असो. गावात कुणीही आले की, सर्वप्रथम होडेंच्या घरी उतरायचे. गावातल्या शाळेतील शिक्षकांच्या निवासाची सोयही होडेंच्याच घरी व्हायची.
 
विजय गोनबरे हे शिक्षक होडेंच्या घरी राहू लागले. त्यांच्या तालमीत गजानन शिकू लागले. बघता बघता गजानन इंग्रजी विषयात पारंगत झाले. पुढे ते शिक्षणासाठी वसतिगृहात राहू लागले. त्या वसतिगृहातले जीवन कठीणच. निवारा आणि दोन वेळचे अपुरे अन्न यावर विद्यार्थ्यांची गुजराण असे. पण, शिकायला मिळते हे महत्त्वाचे. त्यावेळी गजानन यांच्याकडे शाळेचा एकच पोशाख होता. दोन दिवस पोशाख घालून ते रात्री तो धुवायचे आणि मग तो घालायचे. तर, या वसतिगृहापासून शाळा दूर. शाळेत जायला शास्त्री नदी कधी चालत कधी पोहत पार करावी लागे. मात्र, आठवीनंतर गजानन यांनी स्वतःच शाळा बदलली. वसतिगृहापासून शाळा जवळ होती. त्यामुळे अभ्यासासाठी वेळ मिळू लागला. याच काळात त्यांनी गावातल्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवून दिला.

पुढे दहावीनंतर त्यांनी गोनबरे शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ‘डीएड’ला प्रवेश घेतला. तिथे शिकत असतानाच रा. स्व. संघाच्या प्रा. जोग भाई उपाले, प्रवीण जोशी, सुरेश कुलकर्णी यांसारख्या मान्यवरांशी ओळख झाली. त्यांचे मार्गदर्शन स्नेह गजानन यांच्या आयुष्यात मोलाचे ठरले. पुढे गजानन यांनी एक वर्ष वनवासी कल्याण आश्रमाच्या देवरूख येथील प्रकल्पावर पूर्णवेळ काम केले. त्यानंतर सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून ते नाशिक येथे नोकरी करू लागले. तिथे त्यांना दिवाकर कुलकर्णी, दिलीप क्षीरसागर आणि मुख्यतः वनयोगी बाळासाहेब दीक्षित यांचे मार्गदर्शन आणि स्नेह लाभला. बाळासाहेब नेहमी गजानन यांना वाचण्यासाठी पुस्तके देत. ते म्हणत की ’‘गजानन, तू शिक्षण पूर्ण कर, पीएचडी कर.” नोकरी करता करताच गजानन यांनी इंग्रजी, इतिहास या दोन विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेे. डीएड, बीएड पुढे एमएड पूर्ण करून ‘सेट’ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी पीएचडीही पूर्ण केली. पीएचडी करताना त्यांना डॉ. सुनील भंडगे, डॉ. श्यामा घोणसे आणि डॉ. रमेश पांडव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
 
नोकरी, शिक्षण सगळे सांभाळत असतानाच, गजानन यांचे सामाजिक कार्यही सुरू होते. नाशिक आणि कोकणातील गावपाड्यांमध्ये समरसता कशी रुजेल, यासाठी ते प्रयत्न करत. लोकांना भेटत, बैठका घेऊन लोकांसमोर विषय मांडत. नैसर्गिक किंवा कोरोनाच्या आपत्तीमध्येही गजानन यांनी रस्त्यावर उतरून समाजासाठी काम केले आहे. गजानन म्हणतात, “आजही स्पर्धा परीक्षेबाबत युवक जागृत नाहीत. नाशिक काय किंवा रत्नागिरी काय, येथील गावखेड्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करायची आहे. नुसते स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर सामाजिक समरसतेची भावना समाजात आहेच. मात्र, ती आणखीन विकसित व्हावी त्यासाठी काम करणार आहे.” डॉ. गजानन होडे यांच्या शिक्षण समरसतेच्या कार्याला शुभेच्छा!

योगिता साळवी


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.