"आपल्या हाताशी काय लागलं? याबाबत उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावं!"

    11-Jun-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
कोल्हापूर : आपण काय मिळवलं? आणि आपल्या हाताशी काय लागलं याबाबत उद्धवजींनीही आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच २०१९ ला ते एकत्र राहिले असते तर आज झालेली वाताहत झाली नसती, असेही ते म्हणाले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
शरद पवारांनी मोदी सरकार जास्त काळ टीकेल असं वाटत नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. परंतू, अटलजींचं सरकार २४ पक्षांना सोबत घेऊनही पूर्ण टिकलं आणि व्यवस्थित चाललं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर सरकार पडणार, सरकार पडणार असं शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले रोजच म्हणायचे. परंतू, त्याचा काहीही फरक पडला नाही. त्यामुळे असं काहीही नसतं. मोदीजींचं नेतृत्व हे आश्वासक नेतृत्व आहे. त्यांना कमी जागा मिळाल्या म्हणून संपूर्ण जग हळहळलं आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "तुमचा जागा झाला मौलवी बाणा अन् हिरवं रक्त झालं तप्त!"
 
ते पुढे म्हणाले की, "शिवसेनेने भाजपशी युती असताना २३ जागा लढवल्या आणि १८ जिंकल्या. आता लोकसभेत सर्वात जास्त मेहनत उद्धवजींनी घेतली. त्यांना ९ जागा मिळाल्या. ज्यांना मध्ये थांबायचं नव्हतं त्यांना मात्र १३ आणि ८ जागा मिळाल्या. त्यामुळे आपण काय मिळवलं? आणि आपल्या हाताशी काय लागलं याबाबत उद्धवजींनीही आत्मपरिक्षण केलं पाहिजे."
 
"एकीकडे अल्पसंख्यांच्याच्या मतांवर निवडून आलेले असा ठपका त्यांच्यावर बसला. दुसरीकडे, १८ च्या ९ जागा झाल्या. २०१९ ला एकत्र राहिले असते तर आज झालेली वाताहत झाली नसती. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वत:चा बक्कळ फायदा केला आहे. त्यामुळे ठाकरेंनी याचं विश्लेषण केलं पाहिजे," असा सल्लाही त्यांनी दिला आहे.