दिल्लीत हॅट्ट्रीकचा भाजपला विश्वास

    16-May-2024   
Total Views |
Delhi Lok Sabha Constituency

लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. देशाच्या राजधानीमध्ये शनिवार, दि. २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत आणि त्या सर्व सध्या भाजपकडे आहेत. यावेळी, भाजपने ईशान्य दिल्ली वगळता सर्व सहा जागांवर उमेदवार बदलले आहेत. एकेकाळी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) यावेळी लोकसभा निवडणुकीत एकत्र आले आहेत. ‘इंडी’ आघाडीअंतर्गत ‘आप’ दिल्लीत चार जागांवर निवडणूक लढवित आहे, तर काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

यापूर्वी २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीच्या जनतेने सर्वच्या सर्व सात जागांवर भाजपला विजयी केले होते. यंदादेखील निर्भेळ विजयाची हॅट्ट्रीक करण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्याचवेळी, काँग्रेस आणि ‘आप’ एकजूट दाखवित असले, तरीदेखील दिल्लीत ज्याप्रकारे आपने काँग्रेसला ‘ओव्हरटेक’ करण्यास प्रारंभ केला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वादांना प्रारंभ झाला आहे.दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना भाजपने नवी दिल्लीच्या जागेवर संधी दिली आहे. ‘आप’ने भारत आघाडीकडून सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. चांदनी चौक मतदारसंघातून प्रवीण खंडेलवाल हे भाजपचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसने जे. पी. अग्रवाल यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने पूर्व दिल्लीतून हर्ष मल्होत्रा यांना तिकीट दिले आहे, तर कुलदीप कुमार ‘आप’कडून रिंगणात आहेत. भाजपने पुन्हा एकदा ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी यांना संधी दिली आहे, तर कन्हैया कुमार त्याच जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावत आहे. योगेंद्र चंदौलिया उत्तर-पश्चिम दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत.

काँग्रेसने येथून उदित राज यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पश्चिम दिल्लीतून कमलजीत शेहरावत यांना संधी दिली आहे. ‘आप’ने महाबल मिश्रा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. रामवीर सिंह बिधुरी दक्षिण दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत, तर ‘आप’ने सहिराम पहेलवान यांना संधी दिली आहे.राजधानी नवी दिल्लीत लोकसभेच्या सातही जागा जिंकण्यासाठी भाजप किती सतर्क आहे, याचा अंदाज येथील सात जागांपैकी सहा जागांवर भाजपने उमेदवार बदलला, यावरून लावता येतो. यावेळी, भाजपने सातही जागांवर आपल्या जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामध्ये, दोन माजी महापौर आणि एक माजी आमदार आहेत. भाजपने ज्या खासदारांचे तिकीट रद्द केले, त्यापैकी एक केंद्रीय मंत्री आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये नव्या उमेदवारांच्या विरोधात नाराजीचा अथवा बंडखोरीचा सूर उमटल्याचे दिसले नाही. अतिशय शांतपणे भाजपने येथील उमेदवार बदलले आणि कार्यकर्त्यांनीही अतिशय शांतपणे त्यांना स्वीकारले आहे.
 
दिल्लीत सलग तिसर्‍यांदा सर्व जागांवर विजय मिळविण्यासाठी भाजप सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या सभा, रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे. विविध केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्या सभा आयोजित करण्यावर भाजपने भर दिला आहे. भाजपचे रणनीतीकार २०१९ची कामगिरी कायम ठेवण्यासाठी बूथ व्यवस्थापनावर विशेष लक्ष देत आहेत. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांचा बंदोबस्त ठेवण्याबरोबरच उमेदवार आणि ज्येष्ठ नेतेही त्यांच्याशी संवाद साधत आहेत. प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा स्तरावर प्रभारी, सहप्रभारी, समन्वयक आणि बूथ व्यवस्थापक तैनात करण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघ स्तरावर निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवले जात आहे. गरजेनुसार प्रत्येक घटकाचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपच्या संबंधित मोर्चा आणि सेलचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी ते संपर्क साधत आहे. त्या वर्गातील लोकप्रिय नेत्यांनाही पाचारण केले जात आहे.
 
निवडणूक प्रचारामध्ये भाजप आम आदमी पार्टी सरकारचे अपयश आणि भ्रष्टाचाराचे आरोप हा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडत आहे. या संदर्भात ‘आप’ सरकार आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध आरोपपत्र भाजप प्रकाशित करणार आहे. आरोपपत्राद्वारे ‘आप’ आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पोलखोल करण्यात आल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.दिल्ली सरकारवर भ्रष्टाचाराचे, प्रदूषणाचा गंभीर प्रश्न, यमुना प्रदूषण, संपूर्ण दिल्लीत असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब आरोग्यसेवा, खराब सार्वजनिक वाहतूकव्यवस्था यांची चौकशी करून खरी परिस्थिती भाजप मांडणार आहे. त्यासोबतच जीर्ण रस्ते, शिक्षणाची स्थिती, रोजगार, व्यावसायिकांच्या समस्या यांसह अन्य विषयांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत तो प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. दिल्लीतील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील समस्यांची यादी करून जनतेसमोर ठेवण्याची तयारी सुरू आहे. दिल्ली सरकार भाजपच्या आठ आमदारांमध्ये भेदभाव करत असल्याचाही मुद्दा आरोपपत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या विकासाशी संबंधित योजना पूर्ण करण्यात दिल्ली सरकार अडथळे निर्माण करते, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. निधीचा वाटा न देणे आणि औपचारिक परवानग्यांना विलंब करणे, हे अनेकदा होतेे. त्यामुळेच मेट्रोच्या चौथ्या टप्प्याचे काम लांबणीवर पडले आहे. अशा विषयांवर आरोपपत्रात प्रकाश टाकण्यात आला आहे.‘आप’ आणि काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे, हे दोन्ही पक्षांसमोरचे मोठे आव्हान आहे. आपली मते फुटण्यापासून रोखण्याबरोबरच, ती वाढविण्याचेही आव्हान आहे. अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील ठपका आणि अरविंदर सिंग लवली यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने आघाडीचे आव्हानही वाढले आहे. पक्षसंघटनेस एकत्र करण्यासाठी काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देवेंद्र यादव यांच्याकडे दिली असून, प्रत्येक जागेवर इतर राज्यातील बड्या नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
 
‘आप’सोबत आघाडी करून काँग्रेसने मते फुटण्यापासून रोखण्याची तयारी केली आहे. मात्र, पक्षांतर्गत लाथाळ्यांवर त्यांना मार्ग काढता आलेला नाही. त्याचा सर्वाधिक फटका उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघांमध्ये बसण्याची शक्यता आहे. या दोन जागांवर स्थानिक नेत्यांना तिकीट देण्याऐवजी पक्षाने अनुक्रमे कन्हैयाकुमार आणि उदित राज या बाहेरच्या उमेदवारांना संधी दिली. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी काँग्रेसला फाट्यावर मारून ‘आप’च्या भरवशावर प्रचार सुरू आहे. त्यामुळे, काँग्रेसची अवस्था अगदीच केविलवाणी झाली आहे. काँग्रेसच्या अनेकांनी, तर केजरीवाल यांनी ‘आप’चेच उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर उतरविले असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी असलेले अरविंद केजरीवाल हे निवडणूक प्रचारापुरते जामिनावर आहेत.

मात्र, त्यांच्या येण्याने दिल्लीतील ‘आप’ उमेदवारांना फारसा लाभ होण्याची शक्यता नाही. कारण, केजरीवाल यांचे सर्व लक्ष दिल्लीपेक्षा ‘इंडी’ आघाडीचे नेते आपणच आहोत, हे दाखविण्यावर जास्त भर देत असल्याचे दिसते. त्यामुळेच जामीन मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. परिणामी, राहुल गांधी यांच्याऐवजी अचानक केजरीवाल हेच सर्वत्र दिसत आहेत. अर्थात, एरवी बड्या बड्या नेत्यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करणार्‍या भाजपनेही केजरीवाल यांच्या वक्तव्यास प्रत्युत्तर देऊन केजरीवाल हेच कसे प्रसिद्धीच्या झोतात राहतील, याची व्यवस्थित काळजी घेतली. त्यामुळे, आता काँग्रेसमध्येही अस्वस्थता वाढली आहे. त्याचवेळी, केजरीवाल यांच्या अटकेचा मुद्दा ‘आप’ला विजय मिळवून देण्याएवढा चालत नसल्याचेही सध्या दिसून येत आहे.
 
आकडे काय सांगतात?
 
२०१९ साली भाजप-काँग्रेस-आप असा तिरंगी सामना दिल्लीत रंगला होता. त्यामध्ये भाजपने सर्व जागांवर विजय मिळविला होता. एकूण ८६ लाख, ३३ हजार, ३५८ मतांपैकी भाजपला तब्बल ४९ लाख, ८ हजार, ५४१ मते (५६.९ टक्के) मिळाली होती. त्याचवेळी, काँग्रेसला १९ लाख, ५३ हजार, ९०० (२२.५ टक्के), तर ‘आप’ला १५ लाख, ७१ हजार, ६८७ मते (१८.०१) मिळाली होती. मात्र, ‘आप’ आणि काँग्रेस यांची एकत्रित मतेही भाजपच्या मतांपेक्षा फारच कमी आहेत. त्यामुळे यंदाही दोन्ही पक्षांच्या आघाडीचा भाजपवर परिणाम होईल, असे चित्र नाही.