मृत्यूचे रहस्य

    15-May-2024
Total Views |
mystery of death

मृत्यू म्हणताच आपल्यासमोर एक भयावह कल्पना उभी राहते आणि त्यामुळेच आपले मन मृत्यूच्या कल्पनेने घाबरते. असल्या भययुक्त घाबरण्यामुळेच मृत्यू एक रहस्य बनले आहे. मृत्यूचा संबंध शरीराशी आहे आणि शरीर म्हटले की, आपल्या समोर या जड शरीराचे चित्र उभे राहते. शास्त्रांनी आपली चार शरीरे सांगितली आहेत. आमच्यापैकी काहींना असे अनुभव येत असतात की, आमच्या जडं शरीराहून वेगळे असे आमच्या जीवात्म्याचे अस्तित्व आहे. परंतु, आम्ही म्हणजे जड शरीरच ही भावना आमच्या हाडीमांसी इतकी खिळली आहे की, आम्ही म्हणजे हे जड शरीर या कल्पनेपलीकडे आपण जाऊच शकत नाही. मग लिंग देह, कारण देह आणि महाकारण देह अशा उत्तरोत्तर सूक्ष्म आणि अनुभवदुर्लभ अवस्थांची आम्हाला कशी कल्पना येणार?
 
आमच्या कल्पना आणि अनुभूती या जड देहापुरत्याच मर्यादित राहतात. या जड शरीराद्वारेच आपण सारे संस्कार प्राप्त करतो, त्यामुळे जड शरीरावर आघात होण्याची पाळी आली, तर आपल्याला भय प्राप्त होते, आपला जीव म्हणजेच जीवात्मा सततच्या संस्कारामुळे घाबरतो. मृत्यूचे भय अथवा रहस्य ते हेच होय!भयाची शिकार न बनता उच्चतम आणि सूक्ष्म अनुभूती घेण्याकरिता साधक प्राकृतिक भयाच्या वर जाऊन साधना करीत असतो व दिव्य अनुभूती प्राप्त करून आपल्या ज्ञानात अधिकता आणतो. ज्ञान ही एक अनुभवजन्य अवस्था आहे. पुस्तके वाचून त्या विषयावरील माहिती मिळेल, पण ज्ञान मिळणार नाही. ज्ञान आणि माहिती या दोघांमध्ये महदंतर आहे. ज्ञान स्वयंसिद्ध असते, तर माहिती परावलंबी असते. म्हणूनच, गीतेत सांगितले आहे, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत् स्वयं योगसंसिध्द: कालेनात्मनी विन्दति॥ म्हणजेच, ज्ञानप्राप्तिकरिता ध्यानसाधनेची आवश्यकता असते. त्याशिवाय ज्ञानप्राप्ती होणार नाही. यासाठीच मंत्रपुष्पांजलीत म्हटले आहे, ‘यज्ञेन यज्ञमयजन्तदेवा: तानि धर्माणि प्रथमाणि’ येथे धर्म म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान इत्यादी पंथविशेष नसून व्यक्तिगत स्वभाव वा पिंडधर्मानुसार जी योग्य साधना करायची, तिलाच धर्म मानायचे.

वैदिक म्हणजेच ज्ञानमय (विद् म्हणजे ज्ञान प्राप्त करणे) परंपरेत धर्म म्हणजेच साधनेला प्रथम स्थान आहे. साधना करण्याकरिता प्रत्यक्ष शास्त्रशुद्ध आचारविचार करावे लागतात. केवळ कोरड्या भावना ठेवून साधना होत नसतात. आपल्या आचार परंपरांना वेदात ‘तप’ म्हटले आहे. शास्त्रीय आचार परंपरा किंवा तपाशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. प्रत्येक शास्त्र, विज्ञान, कला वा विद्या यात पारंगत होण्याकरिता प्राचीन काळी तपस्या करणे आवश्यक मानले जाई. तप म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि चित्ताची शुद्धता व एकाग्रता साधणे होय. आजचे वैज्ञानिकसुद्धा चित्ताच्या एकाग्रतेशिवाय कोणताच शोधबोध होऊ शकत नाही, हे सर्व विदित आहे. वैदिक प्राचीन काळातील पाणिनी आपला जगद्विख्यात व्याकरणाचा ग्रंथ लिहिण्यापूर्वी 12 वर्षे हिमालयात तपस्या करीत होते. जगद्विख्यात नाटककार व कवी कालिदास 12 वर्षे कालीची तपस्या, साधना करूनच मग कविकुलगुरू होऊ शकले. आयुर्वेदाचे प्रहरी सुश्रुत, चरक, नागार्जुन प्रत्येकी खडतर तपस्या करूनच आपापल्या शास्त्रविज्ञानात सर्वश्रेष्ठ झाले. वैदिक परंपरा तपस्यापूत आहे.

खरे देशभक्त मृत्यूला भीत नसतात. त्यांची निर्भयता केवळ त्यांच्या देशापुरतीच असत. अन्य बाबतीत ते साधारणांसारखेच वागतील व व्यवहार करतील. देशाकरिता आपले घरदार सोडून सीमावर्ती प्रदेशात लढणारा सैनिक युद्धापुरता आपले शिर तळहातावर घेऊन लढत असतो आणि आपल्या शरीराबद्दल पूर्ण अनासक्त बनतो. परंतु, अन्य वेळी तोच सैनिक शरीराचा अतिगुलाम बनून दुर्व्यवहार करू शकतो. म्हणूनच, सैनिकांना सर्व प्रकारच्या सुखसवलती ठेवण्यात येत असतात. युद्धसमयी स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरासंबंधी पूर्ण अनासक्त असणारा सैनिक अन्य वेळेस शरीरासक्त होऊन स्त्रियांवर बलात्कारसुद्धा करू शकतो. देहांना नित्य चिरणारा, कापणारा वैद्यकीय विद्यार्थी वा डॉक्टर देहाची अनित्यता आणि घाण नित्य पाहूनसुद्धा त्यांची शरीरासक्ती तिळमात्र कमी झालेली दिसून येत नाही. दुसर्‍यांच्या शरीरावर लीलेने चाकू चालवणारा गुंड वा डॉक्टर स्वतःच्या शरीरावर तेवढ्याच सहजतेने चाकू मारण्यास सिद्ध होणार नाही. याचे कारण त्यांचे स्वत:चे आणि इतरांचे शरीराबद्दलचे मृत्युभय होय. अज्ञानामुळेच प्रत्येकाला मृत्यूचे भय असते. मुंगीपासून मानवापर्यंत! या जन्मात तर मृत्यू यायचा आहे. मग, आम्हाला भीती का वाटावी? याचा अर्थ असा की, प्रत्येक जीवनाने पूर्वजन्मात केव्हा तरी मृत्यूचा अनुभव घेतला असला पाहिजे. पूर्वमृत्यू संस्कारांशिवाय मृत्यूचे भय असंभव आहे.

दूरभाष, दूरदृश्य, दूरसंघात
 
आज आपण आपले लिहिणे, बोलणे, छायाचित्र, सहस्त्रावधी नव्हे, तर कोट्यवधी किलोमीटरपर्यंत पोहोचवू शकतो, ग्रहण करू शकतो. अंतराळयानातील कार्य, छायाचित्रण, अन्वेषण पृथ्वीस्थित प्रयोगशाळेतून केले जाते. दूरभाषद्वारे आपण पृथ्वीवरील कोणत्याही माणसाशी तो त्या उपकरणावर उपस्थित राहिल्यास, बोलू शकतो. दूरदर्शनाद्वारे एका स्थानाचे चित्रण ती उपकरणे असलेल्या स्थानी आपण पाठवू शकतो आणि पाहू शकतो. आज त्रिमात्रात्मक (ढहीशश वळाशपीळेपरश्र ) छायाचित्रण शोधले गेले आहे. असल्या त्रिमात्रात्मक छायाचित्रणातील चित्रण पडद्यावरच न राहता ते आता पाहणार्‍यासमोर उभे राहते. त्यामुळे ज्यांचे छायाचित्रण काढले आहे, अशी व्यक्ती प्रेक्षकांच्या अगदी पुढ्यात येऊन उभी राहते. त्यामुळे प्रेक्षकाला प्रत्यक्ष ती व्यक्तीच त्याच्यासमोर उभी असल्याचा भास होतो. वैज्ञानिकांचे आणखी प्रयोग चालले आहेत. ते वरील त्रिमात्रात्मक छायाचित्रणाला वास (गंध), चव आणि स्पर्श मात्रा प्राप्त करून देण्याच्या खटपटीत आहेत.

असे झाल्यास सिनेमातील काम करणारे नटनटी प्रेक्षकांसमोर उभे राहून प्रत्यक्षाप्रमाणे बोलतील, हस्तांदोलन करतील, आलिंगन देतील वा मारामारीसुद्धा केल्याचा भास होईल. त्यांनी अंगाला लावलेल्या पावडर वा स्नोचासुद्धा प्रेक्षकाला वास येईल. एखाद्या नटनटीने प्रेक्षकांसमोर एखादा खाद्यपदार्थ ठेवल्यास, तो पदार्थ प्रत्यक्ष आपल्या हातात असल्याचा प्रेक्षकाला भास होईल आणि त्याचा सुवास येऊन प्रेक्षक त्या खाद्यपदार्थाला आपल्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न करेल. कारण, त्या छायाचित्रणातील खाद्यपदार्थाला गंध आहे, स्पर्श आहे आणि चव आहे. असा खाद्यपदार्थ समजा प्रेक्षकाने तोंडात घातला, तर त्या प्रेक्षकाला त्याची चवसुद्धा येईल. असे प्रत्यक्षात अनुभवायला येणारे छायाचित्रण आज येऊ पाहत आहे. प्रत्यक्ष जडसृष्टीत वा असल्या छायाचित्रणात मग कोणताच फरक राहणार नाही. भविष्यकाळातील असले छायाचित्रण पाहायला जायचे म्हणजे प्रत्यक्ष जीवनच अनुभवायला जायचे, असा त्याचा अर्थ होईल. वैज्ञानिकांचे प्रयोग चालू आहेत, यश येणे शक्य आहे. (क्रमशः)


योगिराज हरकरे
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)