प्रदूषण नियंत्रणासाठी 'रिअल टाईम मॉनिटरिंग' अनिवार्य ;पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे; 'ग्रीन क्रेडिटसाठी'ही नियोजन

    09-Jul-2025   
Total Views | 7

मुंबई : राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.

आ. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी आ. अभिजित वंजारी, प्रसाद लाड, सतेज पाटील, प्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. पाणी, वायू, ध्वनी तसेच औद्योगिक प्रदूषणाचे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाईम परीक्षण केले जावे आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व उपलब्ध असावी यासाठी काम सुरू असल्याचे सांगून मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, सध्या पाणी, वायू व ध्वनी प्रदूषणाचे परीक्षण करत आहोत, पण औद्योगिक प्रदूषणाचाही डेटा लोकांसाठी ॲक्सेसिबल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना त्यांच्या परिसरातील प्रदूषण स्थितीबाबत माहिती मिळावी यासाठी हायटेक पद्धतीने प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. प्रत्येक उद्योगाला त्यांच्या भागात हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) राखणे बंधनकारक आहे. परंतु काही जुने उद्योग आहेत, ज्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नसते. अशा वेळी त्यांना गायरान किंवा दुसऱ्या उपलब्ध जागांमध्ये वृक्षारोपण करून ग्रीन क्रेडिट मिळवण्याची संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

उद्योगांना परवानग्या देताना पर्यावरणाशी संबंधित कठोर निकष पाळावे लागतात. या प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरांवर बैठक होतात आणि अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणामार्फत घेतला जातो, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले. राज्यात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित चाचण्या घेतल्या जात असून, नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर सक्त कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ३११ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या, २७९ उद्योगांना सूचनात्मक आदेश, २०१४ उद्योगांना अंतिम निर्देश आणि २१८ उद्योगांवर बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

तंत्रज्ञान आधारित नियंत्रणाची गरज

मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रदूषणाचे प्रभावी नियंत्रण तंत्रज्ञानाच्या आधारेच शक्य आहे. रिअल टाईम डेटा, डिजिटल सेन्सर्स, एआय आधारित विश्लेषण यांचा वापर करून प्रदूषणाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येईल. या सर्व उपाययोजना राबवल्यास महाराष्ट्र राज्य पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये मोठी प्रगती करेल, असेही त्या म्हणाल्या.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121