बांगलादेशातील हिंदूंच्या विदारक स्थितीचे वास्तव!

    11-May-2024
Total Views |
Being Hindu in Bangladesh : An Untold Story


सरत्या मार्च महिन्यात केंद्र सरकरने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू करणारी अधिसूचना जारी केली. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या मुस्लीमबहुल राष्ट्रांतून भारतात दाखल होणार्‍या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी या समाजांच्या निर्वासितांचा येथील नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. विरोधकांनी या निर्णयावर टीकेची झोड उठविली आहे. ‘सीएए’ लागू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांचा निकाल यथावकाश लागेलच. मात्र, या शेजारी राष्ट्रांत हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांची किती विदारक स्थिती आहे, हे समजून घ्यावयास हवे. त्या दृष्टीने दीप हल्दर आणि अविषेक विश्वास यांनी लिहिलेले ‘बिईंग हिंदू इन बांगलादेश : अ‍ॅन अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक महत्त्वाचे.

लेखकांच्या अगोदरच्या दोन पिढ्या त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) वास्तव्याला होत्या आणि नंतर निर्वासित म्हणून भारतात आल्या. त्यामुळे १९४७ साली देशाच्या झालेल्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे ते केवळ साक्षीदार नव्हेत; त्यांनी स्वतः ते अत्याचार भोगले आहेत. त्यांच्याकडून ऐकण्यात आलेल्या कहाण्यांनी या विषयावरील अभ्यासाने दोन्ही लेखकांना या विषयावर सविस्तरपणे लिहिण्यास उद्युक्त केले. बांगलादेशमध्ये ढाक्यापासून ग्रामीण भागापर्यंत अनेक ठिकाणी या लेखकांनी प्रवास केला; अत्याचारांना बळी पडलेल्यांची मनोगते जाणून घेतली, राजकीय-धार्मिक मंडळींच्या मुलाखती घेतल्या; पश्चिम बंगालमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेल्या काहींची भेट घेऊन त्यांना बोलते केले. या सर्व आधारावर बेतलेले हे पुस्तक बांगलादेशात हिंदूंच्या असणार्‍या शोचनीय अवस्थेवर प्रकाश टाकते.

पूर्णिमा शील ही बारा वर्षांची मुलगी २००१च्या सार्वत्रिक निवडणुकांत ‘अवामी लीग’ पक्षाची मतदार प्रतिनिधी होती. मात्र, प्रतिस्पर्धी ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात-ए-इस्लाम’ या पक्षांनी मतदानात गैरप्रकार केल्याचा आरोप तिने केला होता. या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिच्या घरावर हल्ला चढविला. त्या नराधमांनी पूर्णिमाला शेजारच्या शेतात नेऊन तिच्यावर ती बेशुद्ध पडेपर्यंत लैंगिक अत्याचार केले. या हल्ल्यात तिच्या बहिणीची दृष्टी गेली. तिच्या वडिलांचे दुकान लुटण्यात आले. सर्व कुटुंबीयांना गाव सोडून जाण्यास भाग पाडले. पूर्णिमा पुढे अभियंता बनली. मात्र, तिचा भूतकाळ माहीत झाल्यावर सहकार्‍यांची तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अखेरीस छोट्याछोट्या नोकर्‍या करणे तिच्या नशिबी आले. तिच्यावर अत्याचार करणारे पाच जण अद्याप फरार आहेत. हा त्यातील उद्वेगजनक भाग. नरोत्तमपूर गावातील मुक्ता दास या हिंदू युवतीच्या भावाला २०२१च्या हिंदूविरोधी हिंसाचारात जीव गमवावा लागला. याच झुंडीने दुर्गामातेच्या मूर्तीची स्फोटके वापरून विटंबना केली. इस्कॉन मंदिरातील प्रतिमांच्या चित्रांना आगी लावल्या. दानपेटी लुटली. एका मुलाची हत्या करून त्याचे शव तळ्यात फेकून दिले. या आणि अशा घटनांचे मूळ हे इस्लामी कट्टरवाद्यांच्या हिंदूद्वेषात असल्याचे लेखकांनी अधोरेखित केले आहे.

२०२१ सालच्या एका घटनेचा उल्लेख लेखकांनी केला आहे. बांगलादेशच्या कोमिला जिल्ह्यात दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी एका मांडवात हनुमानाच्या मूर्तीच्या पायाशी कुराणाची प्रत सापडल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि त्याचे निमित्त करून हिंदूंवर अत्याचारांचे पीकच आले. याची हादरवून सोडणारी वर्णने पुस्तकात आहेत. हिंदूंच्या घरांवर हल्ले, मंदिरांची तोडफोड, मूर्तींची विटंबना, हिंदू मालमत्तांना आगी लावणे अशा घटनांना ऊत आला. तथापि, हनुमानाच्या मूर्तीच्या पायाशी कुराणाची प्रत कोणा हिंदूने ठेवलेली नव्हती, तर ती इकबाल हुसेन नावाच्या स्थानिक समाजकंटकाने ठेवली होती, हे नंतर उघडकीस आले. एका अफवेने इतका विध्वंस होत असेल, तर बांगलादेशातील हिंदूंनी कोणती आशा ठेवायची, या रोसोप्रिय दास यांच्या हताश सवालाचा उल्लेख लेखकांनी केला आहे. ‘भारत सेवाश्रम संघा’चे संत त्र्यंबकानंद हे ऑक्टोबर १९४६ मध्ये ‘नौखाली बार संघटने’चे अध्यक्ष चौधरी यांच्या घरी कर्परा येथे वास्तव्यास आले. तेव्हा ते मुस्लिमांचे रक्त वापरून काळी जादू करणार असल्याची अफवा गुलाम सरवर हुसेनच्या निकटवर्तीयाने हेतुपुरस्सर पसरवली. ते निमित्त करीत मुस्लीम झुंडीने चौधरी यांचे शीर धडावेगळे केले! ही नृशंसता पाकिस्तानच्या निर्मितीच्याच वेळी पेरली गेली आणि त्या विषवल्लीला खतपाणी मिळत राहिले. याची वर्णने लेखकांनी केली आहेत. हिंदूंच्या वर्तमानातील कैफियती मांडतानाच त्यांची सांगड लेखकांनी इतिहासातील घटनांशी घातल्याने या सर्वांचे बीज कशात आहे, हे समजून घेणे वाचकांना शक्य होते.

‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ या सारख्या हिंदूद्वेष्ट्या पक्षाच्या राजवटीत हिंदूंवर झालेले अत्याचार अनन्वित होते, यावर लेखकांनी बोट ठेवले आहे. २००१ साली खलिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ला बहुमत मिळाल्यानंतर हिंदूविरोधी धोरणे कशी राबविण्यात आली, त्याची जंत्रीच लेखकांनी दिली आहे. निवडणुकोत्तर हिंसाचारात २०० हिंदू महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे एका न्यायिक आयोगाने नमूद केले होते. १९७८ साली आलेली झिआउर रहमान यांची राजवट असो अथवा नंतरची लेफ्टनंट जनरल इर्शाद यांची राजवट असो, हिंदूंची ससेहोलपट होत राहिली. १९९२ साली तेथील सरकारने हिंदूंना बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश बँकांना दिले, तर हिंदू व्यावसायिकांना कर्ज देण्यावरदेखील बंधने आणली. १९९० साली इर्शाद राजवटीने बांगलादेश इस्लामी राष्ट्र असल्याचे घोषित केल्याचा हा परिणाम असावा, असे लेखकांनी म्हटले आहे. शत्रू मालमत्ता जप्ती कायद्याचा आसरा घेत हिंदूंच्या मालमत्ता सर्वच पक्षांनी हस्तगत केल्या आहेत, याचाही उल्लेख पुस्तकात आहे. हिंदूंची २६ लाख एकर जमीन बळकावण्यात आली आहे. परिणामतः हिंदू बांगलादेश सोडून जात आहेत. १९७१-१९८१च्या दशकात दिवसाकाठी ५२१ हिंदू देश सोडून जात होते, तेच प्रमाण २००१-१२ काळात ६७४ होते, ही लेखकांनी दिलेली आकडेवारी बोलकी ठरावी !

बांगलादेशात आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या स्थितीवर लेखकांनी प्रकाश टाकला आहे. अबू बक्र याने कविता नावाच्या हिंदू प्रेयसीला घरी बोलावून तिचा खून केला आणि तिचे शरीर धडावेगळे करून ते तुकडे गटारात फेकून दिले. २०२२ साली भारतात घडलेल्या श्रद्धा वालकर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाशी लेखकांनी याची तुलना केली आहे. मिथिला या बांगलादेशी मुस्लीम युवतीचा विवाह पश्चिम बंगालमध्ये राहणार्‍या सुरजित मुखर्जी या हिंदूशी झाला. त्यानंतर त्यांच्या वाट्याला द्वेषपूर्ण वातावरणाचे तडाखे आले. ‘सुरजित मुस्लीम असता आणि आपण हिंदू असतो, तर ही प्रतिक्रिया सौम्य असती,’ हे मिथिलाचे विधान डोळ्यांत अंजन घालणारे. यानिमित्ताने लेखकांनी बांगलादेशातील मदरशांची चर्चा केली आहे. सरकारी नियंत्रण असणारे आणि नसणारे, असे मदरशांचे दोन गट असले तरी एकूणच मदरशांची संख्या वाढली आहे आणि तेथे धार्मिक कट्टरवादाचे बाळकडू देण्यात येते, असे लेखकांनी नमूद केले आहे. १९५० आणि २००८ दरम्यान मदरशांची संख्या ४,४३० वरून ५४ हजार १३० वर पोहोचली आहे, अशी माहिती लेखकांनी दिली आहे.

हिंदूंवरील अत्याचारांचे बीज शोधताना लेखकांनी फाळणी हेच त्याचे बीज, असे सूचित केले आहे. मोहम्मद अली जिना यांनी १९४६ साली दिलेल्या प्रत्यक्ष कृतीच्या नार्‍याची परिणती कलकत्ता आणि नौखालीमध्ये हिंदूंवरील अनन्वित अत्याचारांमध्ये झाली. फतेहपूरसारख्या मुस्लीमबहुल गावातील मौलवी खालीलूर रेहमान यांनी तर ‘जीवाचा बचाव करायचा असेल, तर धर्मांतर हा एकच पर्याय हिंदूंसमोर आहे,’ असे आव्हान गांधीजींना दिले होते. गोपाळ पाठासारख्या मुस्लीम खाटिकाने हिंदूंचे प्राण वाचविण्यासाठी हाती शस्त्र घेतले तेव्हा गांधीजींनी शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन त्यालाच केले. पाकिस्तानने उर्दू भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्यानंतर त्याचे पडसाद पूर्व पाकिस्तानात उमटले. पाकिस्तानच्या बाबतीत पुढे अनेकांचा कसा भ्रमनिरास झाला, यावरही लेखकांनी दृष्टिक्षेप टाकला आहे. शेख मुजिबूर रेहमान यांचा जिना, सुर्‍हावर्दी यांच्यावर असणारा विश्वास पाकिस्तानच्या प्रत्यक्ष निर्मितीनंतर ढळला. १९७१च्या युद्धाला हिंदूंच्या नरसंहाराचेच स्वरूप कसे आले, याचेही दाखले लेखकांनी दिले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या एक तुकडीने आपण हिंदूंची एक वसाहत रातोरात उद्ध्वस्त करून टाकली आणि दहा हजार जणांची हत्या केली, हे गर्वाने सांगितले होते.
\
पाकिस्तानी सैनिकांनी पूर्व पाकिस्तानातील अनंत महिलांवर बलात्कार केले; हिंदू महिलांवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचे अमानुष प्रकार घडले, असे १९७१च्या नरसंहारावर चित्रपट बनविणार्‍या मृत्युंजय देवव्रत यांचे संशोधनावर बेतलेले मत लेखकांनी उद्धृत केले आहे. फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानातून हजारो हिंदू शरणार्थी भारतात आले. त्यांतील बहुतांशी उच्चवर्णीय होते. त्यावेळी दलित-मुस्लीम युतीची स्वप्ने पाहणार्‍या जोगेंद्रनाथ मंडल यांचीही कहाणी लेखकांनी कथन केली आहे. पाकिस्तानाशी हातमिळवणी करणारे मंडल हे पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. मात्र, त्यांना दलित-मुस्लीम स्वप्न पूर्ण होताना दिसले नाही, तेव्हा त्यांनी भारतात आश्रय घेतला. पण, त्यांच्यावर मदार ठेवून लक्षावधी दलित-हिंदू पूर्व पाकिस्तानात राहिले आणि मुस्लिमांच्या अत्याचारांचे बळी ठरले. म्हणून मंडल यांना ’खलनायक’ ठरविणारे अनेक जण आहेत, असे लेखक नमूद करतात. हरिचंद आणि गुरुचंद ठाकूर या पिता-पुत्राने स्थापन केलेला ‘मातुआ’ पंथ हिंदू-मुस्लीम अंगीकारत आहेत. बांगलादेशातील एकूण हिंदूंपैकी ६० टक्क्यांहून अधिक हिंदू हे ‘मातुआ’ आहेत, या काहीशा विसंगतीकडे लेखक लक्ष वेधतात.
 
‘मुक्ती वाहिनी’च्या विरोधात लढणार्‍या अनेकांनी १९७१च्या युद्धानंतर बांगलादेशात वास्तव्य करण्याची मुभा मुजिबूर रेहमान यांच्याकडे मागितली. अशी ’माफी’ मिळालेल्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. ते अस्तनीतील निखारे ठरले आणि त्यांनी रेहमान आणि कुटुंबीयांची हत्या केलीच; पण हिंदूद्वेषही चालू ठेवला ही माहिती महत्त्वाची. ‘अवामी लीग’शिवाय बांगलादेशात हिंदूंना अन्य वाली नाही, हे जरी खरे असले तरी शेख हसीना यांनीही काही निर्णय हातचे राखूनच घेतले आहेत, याकडेही लेखकांनी लक्ष वेधले आहे. खलिदा झिया यांनी तस्लिमा नसरीन यांच्या ’लज्जा’ पुस्तकावर बंदी घातली होती. पण, गेली १६ वर्षे सत्तेत असूनही हसीना यांनी बंदी उठवली का नाही? मुजिबूर रेहमान यांनी बांगलादेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, अशी ग्वाही दिली होती. इर्शाद राजवटीने बांगलादेशला इस्लामी राष्ट्र घोषित केले. शेख हसीना यांनी तो बदल अद्याप रद्द का केला नाही? असे सवाल लेखकांनी उपस्थित केले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार पूर्णपणे थांबलेले नाहीत. १९७४ मध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंचे असणारे १३.५ टक्क्यांचे प्रमाण २०२२ साली ८.५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे, या वास्तविकतेकडे लेखकांनी लक्ष वेधले आहे. प्रस्तुत पुस्तक म्हणजे एका गंभीर आणि तितक्याच संवेदनशील विषयाचा ऊहापोह आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही तितकेच सूचक.


पुस्तकाचे नाव : बिईंग हिंदू इन बांगलादेश : अ‍ॅन अनटोल्ड स्टोरी
लेखक : दीप हल्दर आणि अविषेक विश्वास
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पृष्ठसंख्या : २७२
मूल्य : रुपये ३९९

राहूल गोखले