संगीत ते समाधी (भाग -३१)

    03-Apr-2024
Total Views | 39
sangit and samadhi

पूर्वी रागिणी

दोन्ही मध्यमांचा प्रयोग करून भक्ताने आपल्या नाथाला हाक मारली आहे. ’नाथ नाथ कर बोल रसना, काहे मन बकवास करत हैं; कृष्ण कृष्ण मुख बोल रसना’ किती प्रेमभरी व दर्दभरी हाक आहे ही! पूरिया धनाश्रीने एकच मध्यम घेतला आणि तोही तीव्रच. पण, त्या तीव्र मध्यमाने कोमल ऋषभ-धैवताला करुणावतार बनवून टाकले आहे. कारुण्याला तीव्र मध्यमाने दृढ निर्धार दिला आहे. श्रोत्यांचा कितीही दुष्ट स्वभाव असला तरी त्याला पाझर फोडण्याची क्षमता या पुरिया धनाश्रीत आहे. पुरिया धनाश्रीच्या ’मरेग’ या स्वररचनेतच हे कारुण्य साठले आहे.

कांभोजी थाट

नंतर येते कांभोजी मेलावली, ठुमकत ठुमकत आणि सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचत. पुष्टस्तनी, नितंबीनी, षोडशबाला कांभोजी योग्यांच्या मनालाही भुरळ घालण्याकरिता की काय मध्यम आणि निषाद कोमल घेऊनच ती नटत मुरडत येते. हृदयाचे ठायी वसणारा मध्यम तर मेंदूचे ठायी वसणारा निषाद दोन्ही कोमल म्हणून दोन्हींना ती भुरळ घालते. तिचे नावच ‘कांभोजी’ आहे. तीव्र ऋषभ आणि गंधाराच्या जोडीला आपल्या कोमलांगाने भुरळ घालणारा मध्यम तर पंचम-धैवतांना डोक्यावरील कारुण्याने न्हाणारा निषाद असा साज कांभोजी मेलाचा. सार्‍या ठुमर्‍या, कजर्‍या, लावण्या आणि श्रृंगार कवने याच कांभोजीत रंगतात आणि पावन होतात. कोमल मध्यम-निषादाचा विलोभनीय श्रृंगार पाहायचा असेल, तर कांभोजी मेलात प्रवेश करा. झिंझोटी, खंबावती, रागेश्वरी, नारायणी इत्यादी मधुर प्रकार खमाज थाटातील होत. ’बंगाली शुद्धसालंका कांभोजी मधुमाधवी’ असे रागनिरुपणात वर्णन आहे. सौराष्ट्री किंवा सोरठी, तिलककामोद इत्यादी प्रकाराने ‘कांभोजी’ नटली आहे.


’सायंश्रृगांरपूर्णां मदनसहचरी’ अशी ही रागिणी आहे. अशा तर्‍हेने सकाळपासून रात्रीच्या दुसर्‍या प्रहरापर्यंत रसिकांची मने रिझवीत कांभोजी रागिणी आपली वैजयंती (जयजयवंती) माला भगवंताच्या गळ्यात घालून मध्यरात्रीत प्रवेश करते. मध्यरात्रीनंतर कांभोजीचे सूत्र आपल्या हातात घेणारी आसावरी आपल्या सख्यांसह वर्तमान भगवंताच्या दरबारात प्रवेश करते. कोमल निषाद, मध्यम आणि कोमलधैवत गंधाराने युक्त अशी आसावरी मेलरागिणी. आपल्या साजणाकरिता श्रृंगार करून नटणारी प्रियाराधिणी आसावरी! ऋषभच काय तो तीव्र, बाकी सारे कोमल. पण, कोमल ऋषभाने सजणारी आसावरीही प्रभूसाठी प्रातःकाळपासून आसुसते.

करले सिंगार, चतुर अलबेली साजन के घर जाना होगा।
न्हाले धोले सीस गुंथाले फिर वहां से नहीं आना होगा,करले सिंगार।
मिट्टी ओढावन, मिट्टी बिछावन, मिट्टी का सिरहाना होगा।
कहत कबीर, सुनो भाई साधो, मिट्टी में मिल जाना होगा।
करले सिंगार चतुर अलबेली साजन के घर जाना होगा।

अशी ही सर्व कोमलांगी स्वरसम्राज्ञी आसावरी प्रियाराधना करीत प्रियातच विलीन होण्याच्या इच्छेने त्याच्या दरबारात प्रवेशते आणि दरबारी बनते. प्रिया पाहण्यास आतुर होते आणि आपला घुंगट फेकते, ’घुंघट का पट खोल तो को पिया मिलेंगे। शून्य महल में दियना बारिले आसन से मत डोल। कहे कबीर आनंद भयो हैं बाजत अनहत ढोल।’ अशी ही दरबारी आपल्या प्रियात अनाहत नादाच्या ढोलवादनात एकरूप होते आणि स्वतःच प्रिया बनते.

मालकोसी


मध्यरात्री आता आपला अंमल श्रोत्यांवर गाजवू लागते. मालकोसी आणि कोसिकानडा रात्रीचा हा तिसरा प्रहर आपल्या अधिक्षेपात घेतात. कोमल गंधार, कोमल मध्यम, कोमल धैवत आणि कोमल निषाद या स्वरांचे साम्राज्य सुरू होते. भव्य धीरगंभीर आणि एका अनोळख्या आर्त प्रदेशात नेण्याचे सामर्थ्य असलेली मालकोसी. याच्या धीरगंभीर प्रकृतीमुळे मालकोसिला कोणी नर राग मानतात. हे सार्थच आहे. येथे चांचल्य, अवखळपणा, नाचण्या, ठुमकण्याला वाव नाही. गजगती धारण करणारी मालकोसी. स्वर कसे पिळवटून एकात एक जीव करून ओढायचे. मालकोसित असल्या धीरगंभीर स्वरांमुळे तसलेच धीरगंभीर वातावरण उत्पन्न होते. मालकंस म्हणावा बडे गुलामअली खां यांनीच. ती आर्त पिळण, ते भव्य अवगाहन आणि ती निस्तब्ध गंभीर समाधी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य मालकंसाच्या कोमल परंतु गंभीर स्वरातच आहे.

सर्व कोमल परंतु तितकेच धीरगंभीर स्वर निद्रेऐवजी ध्यानावस्था श्रोत्यांवर अंमल करतात आणि असल्या अवस्थेत पहाटेचा कोंबडा आरवतो आणि म्हणतो ’प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषःकाल हा’ देशिकार वेलावलीचे साम्राज्य सुरू होते. ललनांच्या भूपाळ्या लगेच सुरू होतात. आज ललनांना सडासंमार्जन करताना भूपाळ्या म्हणता येणार नाहीत. कारण, भूपाली राग गाण्याचा समय सध्या पहाटेपासून उड्डाण करून सायंकाळच्या पलीकडील प्रांतात गेला आहे. आई उठली की लहान मुले उठणारच. त्यांना हिंदोळ्यावर झुलवून अंगाई गीत म्हणण्याकरिता हिंदोल साकारतो. हिंदोलामुळे मुले झोपतात, तर भैरवामुळे माणसे सुखनिद्रेतून जागी होतात. हिंदोलाच्या स्वरांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, झोप न येणार्‍याला झोप येऊ शकते. लेखकाने हा प्रयोग केला आहे. निद्रानाश या रोगाकरिता हिंदोलाचा उपयोग होण्यासारखा आहे. सारेच तीव्र स्वर पण गुंगी आणणारे. मालकोसितील जे स्वर कोमल आहेत, तेच स्वर हिंदोलात तीव्र आहेत. पण, फलभेद परस्परविरूद्ध. मालकंसातील कोमल स्वर श्रोत्यांना सावधानतेच्या परमअवस्थेला म्हणजे ध्यानावस्थेला घेऊन जातात. ध्यानावस्था एक पूर्ण चेतनावस्था आणि सारेच स्वर तीव्र असूनही निद्रा-राज्यात नेणारा हिंदोल. परस्परविरूद्ध वाटणारे गुण एवढा विरोधाभास ‘ग म ध नी’ या स्वरांच्या कोमल-तीव्रतेमधून उत्पन्न झाला आहे.

यानंतर भैरवाचे राज्य सुरू होते. ’जागो मोहन प्यारे’चे स्वर सनईच्या हळुवार किन्नरीतून कानावर रेंगाळतात. आळस झडतो आणि निद्रावश माणूस ’कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती’ करीत ’पादस्पर्श क्षमस्व मे’ असे म्हणीत भूमिमातेला वंदन करतो. सकाळची नित्य कामे करायची असतात आणि त्याकरिता मायेने उत्साह देणारी रागिणी हवी असते. त्याकरिता वेलावली पुढे सरसावते. घरची कामे आटोपून बाहेर कामाला जायचे असते; तेव्हा घरच्याच मायेत गुंतून कसे चालेल? घरचे मायापाश सोडलेच पाहिजेत. हे कार्य ‘तोडीमेल’ व्यवस्थितपणे करतो. तीव्र मध्यम, तीव्र निषाद सार्‍या कोमल स्वरांच्या भावना व्यर्थ करून कर्तव्यकठोर बनवितात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ’निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी। इंद्रियांसवडी लपू नको॥’ बायकोच्या पदराआड लपणारा जसा शूर होऊ शकत नाही; तद्वत इंद्रियांचे कारण करून त्यामागे स्वतःचे स्वत्व गमविणारा लंपट शूर बनू शकत नाही. इंद्रियांच्या मागे लपणारे खोटे आणि व्यर्थ जीवन जगतात.


 
- योगीराज हरकरे

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121